मोन्सेरात, वाल्मिकी आज उमेदवारी दाखल करणार

गोवा विधानसभेच्या पणजी पोट निवडणुकीसाठी आज शुक्रवार २६ एप्रिल रोजी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार बाबूश मोन्सेरात आणि आम आदमी पार्टीचे उमेदवार वाल्मिकी नाईक उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.

पणजी पोटनिवडणुकीसाठी २२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. भाजपने अद्यापपर्यंत उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. भाजपची उमेदवारी उत्पल पर्रीकर यांना निश्‍चित झालेली आहे. गोवा सुरक्षा मंचाकडून शुक्रवारी पोट निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार मोन्सेरात शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर येथील निवडणूक अधिकार्‍याकडे उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. उमेदवारी अर्ज सादर करताना शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
आपचे उमेदवार वाल्मिकी नाईक उमेदवारी अर्ज शुक्रवारी सादर करणार आहेत, अशी माहिती आपचे राज्य समन्वयक एल्वीस गोम्स यांनी दिली. विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीत वाल्मिकी नाईक यांनी पणजी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.
गोवा सुरक्षा मंचातर्फे सुभाष वेलिंगकर निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.