मोन्सेरात यांच्यावरील आरोप निश्‍चितीचा निर्णय ३ जून रोजी

>> अल्पवयीन युवतीवरील कथित बलात्कारप्रकरण

पणजी जिल्हा न्यायालय् माजी मंत्री तथा पोट निवडणुकीतील कॉँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरातवर अल्पवयीन युवतीवर कथित बलात्कार प्रकरणी आरोप निश्‍चितीबाबत ३ जून २०१९ रोजी निर्णय घेणार आहे.

न्यायालयात या कथित बलात्कार प्रकरणातील आरोप निश्‍चितीवर काल सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणी आरोप निश्‍चितीवर युक्तिवाद पूर्ण झाला आहे. सुनावणीच्या वेळी न्यायालयात बाबूश मोन्सेरात यांची उपस्थिती होती. २०१६ मध्ये एका अल्पवयीन युवतीने माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. गोवा पोलिसांच्या महिला पोलीस विभागाने या प्रकरणी मोन्सेरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना या प्रकरणी अटक करून जामिनावर सुटका केली होती. पोलिसांनी जुलै २०१८ मध्ये न्यायालयात मोन्सेरात यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

आपल्या सावत्र आईने मोन्सेरात यांच्याशी हातमिळवणी करून आपणाला त्यांना विकल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आपणावर बलात्कार करण्यात आला, अशी तक्रार पोलीस स्टेशनवर नोंदविली.

बाबूश मोन्सेरात यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या त्या युवतीने तपासाच्या वेळी सहा वेळा आपली जबानी बदलली आहे. त्यामुळे तिच्या वक्तव्यावर विश्‍वास ठेवला जाऊ शकत नाही. न्यायालयासमोर सुध्दा दोन वेगवेगळे जबाब दिलेले आहेत. त्या युवतीच्या वयाबाबत सुध्दा वाद आहे. या कथित बलात्कार प्रकरणातून मोन्सेरात यांची सुटका करावी, अशी याचना न्यायालयाकडे करण्यात आली आहे, असे मोन्सेरात यांचे वकील ऍड. दामोदर धोंड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.