गणेश चतुर्थी विशेष – मोदे भरिले मोदक

गणेश चतुर्थी विशेष – मोदे भरिले मोदक

– संकलन : सौ. अनुजा अ. पंडित
गणेशचतुर्थी हा आपल्याकडे मांगल्याने नटलेला, प्रचंड उत्साहाने भरलेला दिवस असतो. या दिवशी अनेक घरांतून मांगल्याचे साक्षात प्रतीक असलेल्या विघ्नहर्त्या गणेशाची स्थापना वा पूजा होते. कुणाकडे गणपती दीड दिवस असतो तर कुणाकडे पाच दिवस, नऊ, अकरा किंवा एकवीस दिवसांचासुद्धा असतो. घरोघरी उत्साहाचं वातावरण असतं. घरातील लहान मुलं व मोठी माणसं एकत्र येऊन सजावट करतात. हा एक कौटुंबिक आनंदसोहळाच असतो. साधारणपणे हरितालिकेपासूनच घरात धार्मिक वातावरण असते. हरितालिका हा कडकडीत उपवासाचा दिवस.
गणेशचतुर्थी, ऋषिपंचमी, मग गौरी बसतात. त्यामुळे घरच्या बाईला काही ना काही गोडधोड करावंच लागतं. घरात पाहुणा आलेल्या गणेशदेवाला रोज प्रसाद दाखवावा लागतो. हाच प्रसाद नंतर घरी आलेल्या लोकांना वाटला जातो. प्रसादात गणपतीबाप्पाचा आवडता खाऊ असलेला मोदक हवाच. मोद म्हणजे आनंद देणारं. ते मोदक गणपतीचा प्रिय प्रसाद. कोकणात तांदळाच्या उकडीतील पारीमध्ये गूळ-खोबर्‍याचं पुरण करून मोदक केले जातात. गव्हाची पारी असलेले मोदक तळूनही तयार करतात. परंतु उकडीच्या मोदकांची चव न्यारीच. मोदक बनवणं हे कौशल्याचं काम आहे यात वाद नाही. आपण वापरतो ते सर्व पदार्थ चांगले हवेत. मोदकांसाठी सुवासिक तांदळाची ताजीच पिठी असावी. गूळ पिवळा व चवीला गोड असावा. साजूक तूप आदल्या दिवशी कढवून ठेवावं. नारळ खवताना बारीक चव पडेल अशा तर्‍हेने खवून घ्यावा. गूळ व थोडी साखर घातल्याने सारण चांगलं बनतं. खवलेला नारळ जेवढा असेल त्याच्या निम्म्याहून थोडं जास्त गूळ घ्यावं. जायफळ, वेलदोडे पूड, भाजलेल्या खसखशीची पूड, थोडा खवा व ड्रायफ्रूट चिरून घातल्यास सारण चवदार बनते. गणपती आणि मोदक हे एक अतूट समीकरण आहे. तांदळाचे, रव्याचे, सुक्यामेव्याचे, तळलेले, आमरसाचे असे विविध प्रकारचे मोदक हल्ली तयार मिळतात म्हणून घरी बनविण्याकडे बायकांचा कल नसतो. परंतु विकतचे नक्कीच महाग पडतात. पुन्हा स्वतः केलेला पदार्थ वाढताना जास्त आनंद मिळतो नाही का? उकडीचे मोदक नाहीच जमले तर तळलेले करायला अगदीच सोपे आहेत. तर आता पाहूया मोदकाचे विविध प्रकार.
उकडीचे मोदक
साहित्य (पारीसाठी): दोन वाट्या तांदळाची पिठी, दोन टी-स्पून पातळ तूप, तेल किंवा लोणी, अडीच वाट्या पाणी, चिमूटभर मीठ.
गुळाच्या सारणासाठी: चार वाट्या ओलं खोबरं, दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ, दोन टेबल-स्पून साखर, पाव वाटी काजूचे तुकडे, एक टेबल-स्पून भाजून कुटलेली खसखस, एक टी-स्पून वेलची व जायफळाची पूड.
कृती: आधी सारण भरून घ्यावं. एका जाड बुडाच्या पातेल्यात गूळ, खोबरं आणि साखर एकत्र करून घट्टसर होईपर्यंत ते शिजवावं. खाली उतरवून गार होऊ द्यावं. नंतर त्यात काजूचे तुकडे, खसखस आणि वेलची-जायफळाची पूड घालून ढवळावं आणि ते सारण मोदकात भरावं.
उकडीसाठी: दुसर्‍या जाड बुडाच्या भांड्यात पाणी उकळावं. त्यात इच्छेनुसार तूप, तेल किंवा लोणी आणि चिमूटभर मीठ घालावं. त्यातील अर्धी वाटी पाणी बाजूला ठेवून उरलेल्या उकळत्या पाण्यात तांदळाचं पीठ वैरावं. लगेच ढवळून गॅस बारीक करून भांड्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. उकड कोरडी वाटल्यास काढून ठेवलेल्या पाण्याचा शिपका मारावा. नंतर उकड खाली उतरावी. जरा वेळानं वाफ जिरल्यावर उकड परातीत घेऊन चांगली मऊ मळावी. तिचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची पातळ पारी करावी. यात सारणाचा गोळा भरून पारीच्या काठाला जवळजवळ चुण्या (मुरवर्‍या) पाडाव्यात. नंतर सर्व मुरवर्‍या एकत्र करून कळीदार मोदक तयार करावा. असे सात-आठ मोदक तयार झाले की ते वाफवावेत. मोदक वाफवण्यासाठी स्टेनलेस स्टील किंवा ऍल्युमिनियमची चाळणी तोंडावर बसेल अशा भांड्यात पाणी उकळून ठेवावं. चाळणीत स्वच्छ पातळ कापड अथवा प्लास्टीकचा जाड कागद घालून त्यावर मोदक मांडावेत. ही चाळणी भांड्यावर ठेवून वर झाकण ठेवावं आणि दहा-पंधरा मिनिटे वाफवावेत. मोदकाचा रंग मूळच्या रंगापेक्षा किंचित काळपट झाला की मोदक तयार झाले असे समजावे.
गुजरातात मात्र उकडीचे किंवा कणकेचे मोदक गणपतीपुढे ठेवण्यात येत नाहीत. गुजरातेतील गणपतीला माव्याच्या मोदकांचाच नैवेद्य दाखवला जातो.
माव्याचे मोदक
साहित्य: एक किलो मावा, एक किलो साखर, अर्धी वाटी काजू तुकडा, पाव वाटी बदामाचे काप, चवीपुरत्या चारोळ्या, पाव चमचा केशर, दोन चमचे वेलदोडा पूड.
कृती: मावा हाताने मोडून घ्यावा. नंतर गॅसवर पसरट पातेलं ठेवून त्यात मावा घालावा. नंतर साखर घालून चांगले खमंग होईपर्यंत परतावे. पाव कप गरम दुधात केशर घालून ते त्यात टाकावे. माव्याचा रंग लाल होईपर्यंत परतावे. याचा खमंग वास यायला लागली की पातेले आचेवरून खाली उतरावे. नंतर त्यात काजू, बदाम, वेलदोडा पूड, चारोळी घालावी. याचे मोदक करण्याचा साचा बाजारात मिळतो.
तळलेले मोदक
साहित्य: एक वाटी गव्हाचे पीठ (आटा), एक वाटी मैदा, सुके खोबरे, खसखस, पिठी साखर (दळलेली साखर), बेदाणे, चारोळी, तळण्यासाठी तूप.
कृती: मैदा आणि आटा एकत्र करून पोळ्यांसाठी करतात तशी कणीक मळून घ्यावी. सुके खोबरे किसून ते तव्यावर थोडे चुरचुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे. त्यात पिठीसाखर, बेदाणे, खसखस, चारोळी घालून मिक्सरवर बारीक खिरापतीसारखं सारण करून घ्यावं. कणकेची मोदकाला करतात त्याप्रमाणे पारी करून त्यात सारण घालून मोदक करावेत. कढईत तूप घेऊन मंद विस्तवावर मोदक तळून काढावेत. चवीला छान लागतात.
नारळाच्या दुधातले मोदक
साहित्य: एक कप पिठी, एक कप पाणी, अर्धा कप नारळाचं दूध, पाव चमचा मीठ (तेल नको).
कृती: एका नारळाचा चव घेऊन त्यात थोडं गरम पाणी घालून अर्धा कप घट्ट दूध काढावं व उकडीसाठी वापरावं. दूध काढल्यावर निघालेला चव घ्यावा. तो दोन कप असल्यास एक कप मऊ गूळ, पाव कप साखर, अर्धा कप खवा, दोन चमचे भाजलेल्या खसखशीची पूड इत्यादी घालून सारण बनवावं. सैल वाटल्यास एक चमचा तांदळाची पिठी घालावी. हे मोदक अतिशय चविष्ट लागतात.
आंब्याचे मोदक
साहित्य (पारीसाठी): दीड कप पिठी, दीड कप पाणी, दीड चमचा तूप, अर्धा चमचा मीठ, अर्धा कप आंब्याचा पल्प (गाळलेला घ्या.)
कृती: पाणी उकळून त्यात पल्प, तूप, मीठ घाला. उकड तयार करा. सारणासाठी तीन कप नारळाचा चव, दीड कप साखर, पाऊण कप आंब्याचा पल्प, चिमूटभर केशरपूड हे सारण शिजवा. शेवटी केशर घाला. मोदक तयार करून वाफवा.
रव्याचे मोदक
साहित्य: दोन चमचे तूप, एक कप रवा (बारीक), दीड कप दूध व पाणी एकत्र करून.
कृती: तुपात रवा किंचित भाजून त्यात दूध, पाणी, थोडं मीठ, दोन चमचे पिठीसाखर घालून शिरा तयार करा. चांगलं मळून त्यात सारण भरून मोदक बनवून वाफवा.
रंगीत मोदक
साहित्य: ५०० ग्रॅम बासमती तांदळाची पिठी, एक मोठा नारळ, साखर, तीन-चार पेढे, पाच-सहा वेलदोड्याची पूड, पाच-सहा काजू, अर्धा चमचा रोझ इसेन्स, मीठ, एक लहान वेलची केळे, हिरवा, पिवळा व लाल रंग.
कृती: प्रथम सारण तयार करून घ्यावे. ओले खोबरे एखाद्या छोट्या पातेलीने मोजून घ्यावे. दोन पातेल्या खोबरे असेल तर एक पातेली साखर तयार करावी. नंतर साखर व खोबरे एकत्र करून जरा शिजवून घ्यावे व खाली उतरावे. त्यात वेलदोड्याची पूड, काजूचे काप, रोझ इसेन्स, कुस्करलेले पेढे व केळ्याचे काप घालावेत. तांदळाचे पीठ एखाद्या पातेलीने मोजून घ्यावे. एका मोठ्या पातेल्यात पिठाइतके पाणी मोजून घ्यावे. चवीसाठी थोडे पीठ घालावे व उलथण्याच्या टोकाने ढवळावे. नंतर गॅसवर ठेवून चांगली वाफ आणावी. आणखी दोनचार वाफा काढाव्यात. उकड शिजल्यावर पातेले खाली उतरवून ठेवावे. त्यावर झाकण ठेवावे.
एका तासाने दोन मोदकाला घेतो तेवढी उकड काढून घ्यावी. त्याचे तीन भाग करावेत. प्रत्येक भागात पिवळा, हिरवा, लाल रंग घालून ते मळावे व बाजूला ठेवावे. दुसर्‍या ताटात थोडी उकड काढून घ्यावी. तेलाच्या हाताने मळून घ्यावी. एका मोदकासाठी घेतो तेवढी उकड हातात घ्यावी. रंगीत गोळ्यांपैकी प्रत्येक रंगाची वाटाण्याएवढी गोळी करावी. ती हाताने लांबट करून पांढर्‍या गोळ्याला चिकटवावी. नंतर नेहमीप्रमाणे पिठाच्या गोळ्याला वाटीसारखा आकार देऊन त्यात सारण भरावे. नंतर कडा चिमटीने बंद करून मोदकाचा आकार द्यावा. असे साताठ मोदक झाले की ते मोदक पात्रातील चाळणीवर एक ओला कपडा घालून त्यावर मांडावे. मोदकपात्रातील पाण्याला उकळी आली की मग मोदकाची चाळणी त्यात ठेवून झाकण ठेवावे. पाचसात मिनिटे वाफवावे. नंतर मोदक बाहेर काढावे.
छान्याचे मोदक
उकड नेहमीप्रमाणे बनवावी.
सारणासाठी: घरी तयार केलेले पनीर एक कप, पाऊण कप पिठीसाखर, ओले खोबरे पाऊण कप, केशर किंवा केशरी रंग, वेलदोड्याची पूड अर्धा चमचा, दोन टेबल-स्पून दुधाची पावडर, अर्धा कप जाड साखर.
कृती: जाड साखर व पनीर एकत्र वाटून घ्यावी. त्यात खोबरे, पिठीसाखर, रंग घालावा. सर्वात शेवटी दुधाची पावडर घालावी. सारण घट्टसर बनवावे. उकडीची पारी बनवून बेताच्या आकाराचे मोदक बनवून ते वाफवावे. सर्व्ह करण्यापूर्वी पांढर्‍या मोदकाच्या टोकाला केशरपाणी लावावे. मोदक आकर्षक दिसतील.
सुक्यामेव्याचे मोदक
साहित्य: एक वाटी खसखस, १५ ते १६ खारका, एक वाटी सुक्या कोबर्‍याचा कीस, २० बदाम, ५० ग्रॅम अक्रोडाचा चुरा, एक वाटी सायीसकट दूध, दोन वाट्या साखर, थोडी पिठीसाखर, चंदेरी गोळ्या व तूप.
कृती: खसखस, खारका व बदाम वेगवेगळे भिजत घालावे. साधारण तीन तासांनी खसखस गाळण्यात ओतून पाणी निथळावे. खारकेतील बिया काढून तुकडे करावे. बदामाची साले काढून तुकडे करावे. नंतर खसखस व थोडे दूध एकत्र करून मिक्सरच्या छोट्या भांड्यात वाटून घ्यावे. खारका व बदामाचे तुकडे थोडे दूध घालून वेगवेगळे वाटून घ्यावे. अक्रोडाचा चुरा व खोबर्‍याचा कीस मिक्सरवर वाटून घ्यावा. नंतर पिठीसाखर व चंदेरी गोळ्यांखेरीज इतर सर्व एकत्र करून गॅसवर ठेवावे. सतत हलवत राहावे. मिश्रण घट्ट झाल्यावर कडेने थोडे तूप सोडावे व गॅसवरून उतरावे. जरूरीप्रमाणे थोडी पिठीसाखर घालावी. छोट्या मोदकाच्या साच्याला पातळ तुपाचा हात फिरवून त्यात वरील मिश्रण थोडे थोडे घालून मोदक करावे. प्रत्येक मोदकावर एकेक चंदेरी गोळी लावावी.
तिळाचे मोदक
उकड वर दिल्याप्रमाणे बनवा.
सारणासाठी: अर्धा कप सुक्या खोबर्‍याचा कीस, अर्धा कप तीळ, अर्धा कप शेंगदाण्याचं बारीक कूट, एक कप मऊ गूळ, जायफळ पूड.
कृती: खोबरं, तीळ भाजून पूड करावी. सारण साहित्य एकत्र करावं. पारीत भरून मोदक बनवावे. हे मोदक खमंग लागतात.
पार्टीसाठी सोपे मोदक
साहित्य: एक स्लाईस केलेली ब्रेड, एक नारळ, दीड वाटी साखर, थोडी वेलदोड्याची पूड, अर्धा चमचा रोझ इसेन्स, थोडासा बेदाणा.
कृती: ओले खोबरे व साखर एकत्र करून शिजवून घ्यावे. त्यात वेलचीपूड, रोझ इसेन्स व बेदाणा घालून सारण तयार करावे. ब्रेडच्या स्लाईसच्या कडा सुरीने काढून टाकाव्यात. नंतर एकेक स्लाईस पाण्यात टाकावा. हाताने दाबून पाणी काढून टाकावे. नंतर वरील सारण एक चमचाभर घेऊन ब्रेडच्या स्लाईसवर ठेवावे. हाताने कडा जवळ आणून त्याला मोदकाचा आकार द्यावा. असे सर्व मोदक तयार करून थाळीत ठेवावे व अगदी आयत्या वेळी तळावेत. फार सुंदर लागतात.
नेपाळी मोदक
साहित्य: एक कप बारीक रवा, एक कप दूध, अर्धा कप पाणी, एक टेबल-स्पून बटर, अर्धा चमचा जाड कुटलेले मिरे, चिमूटभर मीठ.
सारणासाठी: एका नारळाचा चव, थोडं किसलेलं गाजर, ड्रायफ्रूट, बेदाणे, थोडा खवा इ.
कृती: थोड्या तुपावर नारळाचा चव व गाजराचा किस घालून परता. मग आपल्या आवडीनुसार साखर, खवा, ड्रायफ्रूट घाला व सारण तयार करा. ते गार होऊद्या. दूध, पाणी, बटर, मिरीपूड व मीठ घालून ते उकळा. थोड्या तुपावर रवा भाजा. लाल करू नका. त्यात दूध, पाणी घालून वाफ आणा. त्यात थोडा नारळाचा चव घाला व हे मिश्रण छान मळून घ्या. त्याचे एकसारखे लिंबाएवढे गोळे बनवा. (त्या मोदकांना वर टोक नसतं.) तळू घ्या. हा पदार्थ मिर्‍यांमुळे वेगळा लागतो.
मिल्क पावडरचे आकर्षक मोदक
साहित्य: २०० ग्रॅम मिल्क पावडर, २०० ग्रॅम आयसिंग शुगर, २०० ग्रॅम बाजारी खोबरे कीस, साताठ वेलदोड्याची पूड, अर्था चमचा रोझ इसेन्स व चंदेरी गोळ्या.
कृती: मिल्क पावडर, आयसिंग शुगर व खोबर्‍याचा कीस एकत्र करावा. त्यात वेलदोड्याची पूड व रोझ इसेन्स घालावा. त्यात डावभर दूध घालून मळावे. गरज वाटल्यास आणखी थोडे दूध घालावे.
शाही मोदक
सारणासाठी साहित्य: अर्धा कप खवलेलं खोबरं, अर्धा कप रवा, पाव कप बेसन, थोडं साजूक तूप, अर्धा कप खवा, बदाम, काजू, चारोळी, किसमिस, वेलदोडे पूड, कंडेन्स्ड मिल्क इ.
कृती: तुपावर रवा व बेसन एकदम भाजा. रंग पिवळाच राहिला पाहिजे. गरम असतानाच त्यात बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्‌स, खोबरे घाला. थोडं थोडं कंडेन्स्ड मिल्क घाला. रवा भाजून गार करून घाला.
पारीसाठी: पाव किलो मैदा, मुटका वळेपर्यंत वनस्पती तूप, अर्धा चमचा बेकिंग पावडर व चिमूटभर मीठ घालून सर्व घट्ट भिजवा. एक कप साखर व पाव कप पाण्याचा पाक करा. त्यात केशर घाला. पिठाची पारी बनवून सारण भरून मोदक तयार करा. सोनेरी रंगावर तळून घ्या. केशरी पाकात घाला. तूप लावलेल्या ताटात काढा. पाक घट्ट हवा. सारणात कंडेन्स्ड मिल्क घातल्यामुळे जास्तीची साखर घालू नका. जर पाकात घालायचे नसतील तर सारणात थोडी पिठीसाखर घाला.
मोतीचूर मोदक
साहित्य: मोतीचूर लाडवाचा मोकळा चुरा २ वाटी, तळणासाठी तूप, पिठीसाखर चार चमचे, जायफळ पूड पाव चमचा, रवा दोन वाटी, चिमूटभर मीठ, काजू तुकडे दोन चमचे, पिस्ता तुकडे दोन चमचे, रवा भिजवण्यापुरते दूध.
कृती: रव्यात मीठ व मोहन (एक डाव तुपाचे) घालून दुधाने घट्ट भिजवा. बाऊलमध्ये मोतीचूर चुर्‍यात पिठीसाखर, काजू, पिस्ता तुकडे व जायफळ पूड टाकून एकत्र कालवा. रवा चांगला मळून त्याची पाती लाटा व त्यात सारण भरून मोदक बनवा आणि गॅसवर कढईत गरम तुपात तळा. हे मोदक तळण्याआधी वाफवून मग तळले तर खमंग होतात.
चायनीज मोदक
साहित्य: पाव किलो मैदा, एकशे पंचवीस मिलीलिटर पाणी, थोडं मीठ, दोन चमचे तिळाचे तेल.
सारणासाठी: गाजर, कोबी, मशरूम्स, फ्लॉवर, बिन्स, पातीचे कांदे असे सर्व बारीक चिरून थोेडं थोडं घ्या. थोडे मक्याचे दाणे (अमेरिकन कॉर्न) घ्या.
कृती: थोड्या तिळाच्या तेलावर कांदा, हिरव्या मिरच्या घालून परता. सर्व भाज्या घालून सारण तयार करा. कॉर्नफ्लोअर वापरून पातळ पुर्‍या लाटून, त्यात सारण भरून मोदक तयार करा. वाफवा. या मोदकाला वर टोक नसतं.

Leave a Reply