मोदी २.०

नरेंद्र मोदी पुन्हा एकवार आपल्या स्वप्नातील नव्या भारताचे नवे संकल्प घेऊन दिल्लीच्या तख्तावर विराजमान होणार आहेत. त्यांची पहिली पाच वर्षे प्रशासनाच्या पारंपरिक पद्धती बदलण्यात आणि शिस्त लावण्यात गेली. कॉर्पोरेट क्षेत्रातील कार्यसंस्कृती आपल्या सरकारमध्ये आणण्याचा प्रयत्न मोदींनी या पहिल्या पाच वर्षांत केल्याचे दिसले. त्यासाठी माहिती तंत्रज्ञानासारख्या आधुनिक साधनांची आणि ब्रँडिंगच्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत त्यांनी घेतली. सरकारचा, त्याच्या विविध खात्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा आणि वर्षानुवर्षे साचलेली अडगळ, जळमटे, कोळिष्टके दूर सारून प्रशासनाला एक नवा चकचकीत चेहरा देण्याचा प्रयत्न त्यांनी या पाच वर्षांमध्ये केला. पॅकेजिंगचे महत्त्व जाणणार्‍या व्यवस्थापनशास्त्रातील तज्ज्ञांनी त्यांची आणि त्यांच्या सरकारची ही नवी प्रतिमा घडविण्यात त्यांना सक्रिय साह्य केले. त्यातूनच डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया वगैरे वगैरे मोहिमांचा प्रारंभ झाला. आधुनिक व्यवस्थापनशास्त्रानुसार आद्याक्षरे आणि संक्षेपांच्या शाब्दिक खेळातून सरकारच्या योजनांना आकर्षकता प्राप्त करून दिली गेली. परंतु तेवढ्यावर मोदी थांबले नाहीत. आपल्या मंत्र्यांना आणि अधिकार्‍यांना त्यांनी जबाबदेही बनवले. त्यांच्या कार्याचे वेळोवेळी अहवाल देण्यास भाग पाडले. खासदारांनाही त्यांनी गाव दत्तक घेण्यासारख्या योजनांतून कामाला लावले. हा सगळा एका नव्या कार्यसंस्कृतीचा प्रारंभ होता. ज्या ज्या घोषणा मोदींनी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी केल्या, त्यांची पूर्तता झाली का हा प्रश्न अर्थातच विचारला गेलाच, परंतु तरी देखील ‘मोदींना आणखी पाच वर्षे द्यायला काय हरकत आहे?’ हाच विचार देशाच्या जनमानसात रुजला आणि मतदानयंत्रातून प्रकटला. असे भरभक्कम बहुमत जनतेने मोदींना आज पुन्हा एकदा दिलेले आहे की मनात येईल तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी कोणीही आडकाठी करू शकणार नाही ही त्या सुस्पष्ट बहुमताची आज ताकद आहे. अर्थातच हे बहुमत फार मोठी जबाबदारीही घेऊन आलेले आहे. मोदींपुढे अनेक आव्हाने या घडीला उभी आहेत. सर्वांत पहिले आहे ते भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे. संथ बनलेला विकास दर, मंदावलेली गुंतवणूक, जनतेची घटलेली क्रयशक्ती, या सगळ्याला चालना देणारी सकारात्मक पावले त्यांच्या सरकारला उचलावी लागणार आहेत आणि आकड्यांची पुनर्मांडणी करून नव्हे, तर जगाला स्वीकारार्ह अशा पद्धतीने वाढत्या विकास दराचा लेखाजोखा कालांतराने सादर करावा लागणार आहे. आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदींनी भारताची प्रतिमा जगभरामध्ये उंचावली, परंतु त्याचा प्रत्यक्ष आर्थिक फायदा या देशाला मिळवून देण्याची वेळ आता आलेली आहे. नोटबंदीने गेलेले रोजगार, जीएसटीचे झालेले दुष्परिणाम, या सगळ्यातून देशाला बाहेर काढून नवे लक्षावधी रोजगार निर्माण करायचे आहेत. शेतकर्‍यांचे प्रश्न आहेत, उद्योजकांचे प्रश्न आहेत. या सगळ्याला मोदींना आपल्या या कार्यकाळात सामोरे जावे लागणार आहे. आपल्या पहिल्या कार्यकाळात विदेशातील काळ्या पैशाविरुद्ध मोहीम त्यांनी राबवली, परंतु ती अधुरीच राहिली. बडे बडे लुटारू देश लुटून पळून गेले. त्यांना परत आणायचे आहे, सजा द्यायची आहे. आपल्या पहिल्या कार्यकाळात ‘सूट बूट की सरकार’ ही प्रतिमा वेळीच पुसून काढून मोदींनी उज्वला योजना, आयुष्मान भारत, जनधन, पीएम किसान, सौभाग्य, स्वच्छ भारत, दीनदयाळ ग्रामज्योती सारख्या कित्येक योजनांतून मूलगामी प्रश्नांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्या सार्‍या योजनांना तळागाळापर्यंत पोहोचवून दीनदुर्बलांचा उत्कर्ष साधायचा आहे. देशांतर्गत सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये हे सरकार खंबीरपणे आणि कणखर रीतीने कार्यरत राहील आणि दहशतवादाचा बीमोड करील असा जो विश्वास काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्धच्या ठोशास ठोसा नीतीने देशात जागलेला आहे, तो सार्थ ठरवण्याची जबाबदारीही या सरकारवर आहे. सर्जिकल स्ट्राइक, बालाकोटने पाकिस्तान, चीनसारख्या देशांना बसलेली जरब कायम राहील आणि पुन्हा कुरापतखोरीला हे देश धजावणार नाहीत याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याने आयसिस उंबरठ्यावर आल्याचे दिसले. अशा कल्पनेपलीकडच्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी देशाला सज्ज करावे लागणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेपासून राष्ट्रविकासापर्यंत अनेक तर्‍हेची अनेक पदरी आव्हाने मोदींच्या या दुसर्‍या कारकिर्दीपुढे आ वासून उभी आहेत. कोणत्याही सरकारपुढे ती असतातच, परंतु त्यांना सामोरे जाण्याची हिंमत आणि कुवत या पंतप्रधानामध्ये आहे असा विश्वास या घडीला देशाच्या जनतेला निश्‍चितपणे आहे आणि देशाचा हा दृढ विश्वास हीच मोदींची सर्वांत जमेची बाजू आहे. ह्या भरवशाला तडा जाणार नाही हे त्यांना आणि त्यांच्या पक्षातील खालपासून वरपर्यंतच्या नेत्यांना पाहावे लागेल. शिखर गाठणे सोपे असते, परंतु त्यावर टिकून राहणे कठीण असते. लोकप्रियतेच्या शिखरावर टिकायचे असेल, जनतेचा वि श्वास सार्थ ठरवायचा असेल तर मोदी २.० ने आता वेग पकडावाच लागेल!