मोदी मैदानात!

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील कळसाध्याय काल लिहिला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज काल आणि परवाच्या भव्य दिव्य शक्तिप्रदर्शनानंतर दाखल केला. गुरुवारचा भव्य रोड शो, त्यानंतरच्या गंगा आरतीला मोदींनी लावलेली उपस्थिती, त्यानंतरचे भाषण या सगळ्यातून आपल्या या निवडणुकीला हिंदुत्वाचे धार्मिक गंधलेपन मोदींनी पद्धतशीरपणे केलेले दिसले. वाराणसी म्हणजेच बनारस किंवा काशी ही पुरातन धार्मिक, आध्यात्मिक नगरी असल्याने ते स्वाभाविकही होते. वाराणसीमध्ये मोदींच्या विरोधात प्रियांका गांधी लढणार असल्याची हवा माध्यमांनी केली होती, परंतु कॉंग्रेसने अजय राय या गेल्या वेळच्याच उमेदवाराला पुन्हा उमेदवारी देऊन मोदींसमोरचे आव्हानच जणू संपुष्टात आणले आहे. २०१४ च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल मोठा गाजावाजा करून मोदींशी दोन हात करायला निवडणुकीत उतरले होते. तेव्हा त्यांनी दोन लाखांच्या आसपास मते मिळवली, परंतु मोदींनी त्यांच्यावर घेतलेली आघाडीच त्याहून मोठी म्हणजे तीन लाख ३७ हजार मतांची होती. मोदींना त्या निवडणुकीत तब्बल ५६.४० टक्के मते मिळाली होती. त्यावेळी तिसर्‍या स्थानी फेकल्या गेलेल्या अजय राय यांना अवघी पंच्याहत्तर हजार मते मिळाली होती. हेच अजय राय यावेळी पुन्हा मोदींच्या विरोधात कॉंग्रेसने उभे केले आहेत. यावेळी केजरीवाल मैदानात नाहीत आणि सपा – बसपा एकत्र आल्याने त्यांनी शालिनी यादव यांना उमेदवारी दिली आहे. थेट पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या मोदींपुढे आणि त्यांच्या हिंदुत्वाच्या कार्डापुढे यांची डाळ काशीसारख्या पुरातन धर्मक्षेत्री कितपत शिजणार? मोदी उमेदवारी अर्ज भरताना काल त्यांच्यासमवेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नितीश कुमार, प्रकाशसिंग बादल, उद्धव ठाकरे, रामविलास पास्वानादी सर्व नेतेही आवर्जून उपस्थित होते. गुरुवारच्या रोड शोच्या वेळीही मोदींच्या मागे भाजपाचे विविध जातींचे प्रतिनिधित्व करणारे नेते सहभागी होते. भाजपाकडून सगळी रणनीती किती विचारपूर्वक आखली जाते याची ही उदाहरणे आहेत. मोदी स्वतःच्या सरकारच्या पुनरागमनाविषयी आश्वस्त दिसतात. कार्यकर्त्यांना संबोधित करताना काल स्वतः मोदींनी आपल्याला नुसता विजय नको आहे, तर प्रत्येक बूथ जिंकायचा आहे अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. अगदी बूथ पातळीवरील शिस्तबद्ध नियोजन हे भाजपाचे राष्ट्रीय स्तरावरील एक बलस्थान राहिले आहे. भाजपच्या यशामध्ये नेहमीच त्याचा महत्त्वाचा वाटा असतो. देशात प्रथमच ‘प्रो इन्कम्बन्सी’ लाट असल्याचे काल मोदी म्हणाले. म्हणजे सत्तेत असलेल्याला तेथून उतरवण्यास सहसा मतदार उत्सुक असतात, परंतु आपल्याला पुन्हा सत्ता देण्यास मतदार उत्सुक आहेत असेच मोदींना म्हणायचे होते. त्यांचा हा विश्वास कितपत खरा ठरतो ते निकाल सांगतीलच, परंतु आपल्या प्रचाराची दिशा निवडणुकीच्या या अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांनी हिंदुत्व, भारतीयत्व आणि राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांभोवतीच केंद्रित केल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे. देश सुरक्षित ठेवायचा असेल तर त्यासाठी खंबीर, कणखर नेतृत्व हवे आणि ते आपणच देऊ शकतो असाच त्यांच्या काशीतील भाषणाचा एकूण सूर होता. गंगेच्या आरतीनंतरच्या भाषणात खुद्द काशीत विश्वनाथ मंदिरापाशी काही वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांचे स्मरण करून द्यायला मोदी विसरले नाहीत आणि ताज्या श्रीलंकेतील साखळी स्फोटांकडेही लक्ष वेधल्यावाचून राहिले नाहीत. बालाकोटचा त्यांनी संदर्भ दिला आणि काश्मीरमध्ये पुलवामात ४० जवान शहीद झाले, त्या बदल्यात त्या भागात हल्ल्यानंतर आतापावेतो ४२ दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचेही आवर्जून नमूद केले. आपल्या नेतृत्वाखाली देश कसली आगळीक सहन करणार नाही, ठोशास ठोसा देणारे आपण नेते आहोत हे त्यांना त्यातून अधोरेखित करायचे होते. २०१४ मध्ये ‘अच्छे दिन’ चा वायदा त्यांनी केला होता, परंतु यावेळी ‘अच्छे दिन’ ची जाहिरातबाजी ‘इंडिया शायनिंग’ अटलबिहारींवर उलटले तशी उलटू शकते याची पुरेपूर जाणीव असल्याने निवडणुकीच्या केंद्रस्थानी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दाच भाजपकडून ठेवला गेला आहे असे दिसते. गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचारमुक्त प्रशासन दिले म्हणावे तर विरोधक राफेलचा मुद्दा पुढे आणतील, मेक इन इंडिया, डिजिटल इंडियासारख्या विविध संकल्पांची यशस्वितता सांगावी, तर विरोधक त्यातील त्रुटी काढतील, नोटबंदी आणि जीएसटीवर बोलावे, तर विरोधक त्याचे अर्थव्यवस्थेवरील दुष्परिणाम अधोरेखित करतील, वाढलेल्या बेरोजगारीवर बोलतील हे भाजपला ठाऊक आहे. विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही आणि मोदींच्या प्रतिमेहून वरचढ नेताही नाही. त्यामुळे मोदींच्या खंबीर, कणखर नेतृत्वाची देशाला कशी पुन्हा गरज आहे, मोदींनी पाच वर्षांत केलेल्या कामांचे फळ दिसायला त्यांना आणखी अवधीची कशी गरज आहे यावर भाजपच्या प्रचाराचा भर राहिला आहे. त्याचा फायदा पक्षाला मिळणार की नाही हे शेवटी मतदारराजा सांगणार आहे!