मोठी हॉटेल्स, हाऊसिंग सोसायट्यांचा कचरा नोव्हेंबरपासून उचलणार नाही

>> पणजी महापौर उदय मडकईकर यांची माहिती

पणजी महानगरपालिका क्षेत्रातील मोठी हॉटेल्स, मोठ्या हाउसिंग सोसायट्यांमधील ओला कचरा येत्या नोव्हेंबर महिन्यापासून उचलण्यात येणार नाही. संबंधितांनी ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची तरतूद केली पाहिजे. त्यांना महानगरपालिका प्रशासन आवश्यक सहकार्य देणार आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी काल दिली.

राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचनेप्रमाणे मोठी हॉटेल, मोठ्या हाउसिंग सोसायट्यांनी ओला कचर्‍याच्या विल्हेवाटीची सुविधा निर्माण केली पाहिजे. महानगरपालिका प्रशासनाने आठ महिन्यांपूर्वी मोठ्या हाउसिंग सोसायटीच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन याबाबत माहिती दिलेली आहे. महानगरपालिकेने शहरातील १० मोठ्या हॉटेलमधील ओला कचरा उचलणे बंद केले आहे. पाटो, आल्तिनो पणजी येथील सरकारी वसाहतीमध्ये ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती मडकईकर यांनी दिली.

तीन कचरा प्रक्रिया
प्रकल्पांसाठी प्रयत्न
महानगरपालिका प्रशासने शहरात कचर्‍यावर प्रक्रिया करणारे तीन प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. हिरा पेट्रोल पंपजवळ १० टन कचरा विल्हेवाट प्रकल्प, मार्केटमध्ये ५ टनाचा कचरा विल्हेवाट प्रकल्प आणि पाटो येथे ५ टनाचा कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारला जाणार आहे. बायंगिणी येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी तीन ते चार वर्षे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात लहान लहान प्रकल्प उभारल्यानंतर ओला कचरा विल्हेवाटीच्या समस्येवर तोडगा निघू शकतो, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.