मोटरस्पोर्टस् महासंघाकडून जेहानची शिफारस नाही

 

भारतीय मोटरस्पोर्टस् महासंघाने अर्जुन पुरस्कारासाठी प्रतिभावान खेळाडू जेहान दारुवाला याचे नाव न पाठवल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. महासंघाने मात्र ‘त्याचा योग्य वेळी सन्मान होईल’ असे सांगत आपल्या निर्णयाचे केविलवाणे समर्थन केेले आहे. महासंघाने ऑफ रोड रेसर ऐश्‍वर्या पिसे, बायकर सीएस संतोष व २०१६ सालचा आशिया मॅक्स कार्टिंग चँपियन शहान अली मोहसीन यांची नावे देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी पाठवली आहेत.

दारुवाला याने मागी चार वर्षांत अनेक विक्रम मोडत सनसनाटी कामगिरी केली आहे. सलग तीन वर्षे अर्जुन पुरस्कारापासून वंचित राहिल्यानंतर मागील वर्षी गौरव गिल याने अर्जुन पुरस्कार मिळवत भारतीय मोटरस्पोर्टस्‌ची पुरस्कारापासून वंचित राहण्याची मालिका खंडित केली होती.

‘जेहान याच्या नावाची चर्चा झाली होती. भारतीय मोटरस्पोर्टस् जगतातील तो स्टार खेळाडू आहे. भविष्यात फॉर्म्युला वनमध्ये भारताचा कोणी ड्रायव्हर दिसू शकतो तर तो जेहान आहे. नारायण कार्तिकेयन व करुण चांढोक यांच्यानंतरचा तो फॉर्म्युला वनमधील तिसरा भारतीय असेल. त्याची वेळ नक्कीच येईल, असे महासंघाचे उपाध्यक्ष शिवू शिवप्पा यांनी सांगितले.
अकबर इब्राहिम यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.