ब्रेकिंग न्यूज़

मेहबुबा मुफ्ती यांचा केंद्र सरकारला इशारा

घटनेतील कलम ३५ ए च्या रक्षणासाठी आपल्या पीपल्स डेमॉक्रेटिक पक्षाच्या (पीडीपी) कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन या पक्षाच्या नेत्या तथा माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी काल येथे केले. पक्षाच्या एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. हे कलम हटविण्याच्या विरोधात त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला. जम्मू काश्मीरमधील मूळ नागरिकांना या कलमामुळे मिळणारे खास अधिकार वरील कलम हटविले गेल्यास रद्द होणार असल्याचे मुफ्ती यांनी स्पष्ट केले. या कलमाशी छेडछाड करण्याचा कोणीही प्रयत्न केला तर त्या व्यक्तीचा हातच नव्हे तर त्या व्यक्तीच्या पूर्ण शरीराची राख होईल असा इशारा त्यांनी दिला. केंद्र सरकारला आमचा हा इशारा आहे असे त्या म्हणाल्या.

पीडीपीची आणि पक्षनेत्यांची छळणूक करण्याचे अनेक प्रयत्न केले जातील. कारण केंद्र सरकारला माहीत आहे की जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा व वेगळेपणाच्या रक्षणासाठी केवळ पीडीपी भक्कमपणे उभा राहील. केंद्र सरकार आपल्याला तुरूंगातही डांबू शकेल असा दावाही मुफ्ती यांनी केला. मोठ्या युद्धासाठी सज्ज रहा. निवडणुका येतात, जातात. मुक्तींना खुर्चीची हाव नव्हती. मी त्यांची कन्या आहे. जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाचे रक्षण करणे हे आमच्यासाठी आव्हान आहे. त्यासाठी आम्ही प्राणपणाने लढणार.’ या परिस्थितीत जम्मू-काश्मीरला पीडीपीची अधिक गरज असल्याचे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.

काश्मीरात द्वेष पसरविण्यात
यश येणार नाही : पंतप्रधान

जे कोणी काश्मीरमधील विकासकामांना अडथळा आणू पाहतात व राज्यात द्वेष निर्माण करू पाहतात त्यांच्या प्रयत्नांना कधीच यश येणार नाही असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना केले. जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण भागांमधील विकासकामांवर चर्चा करण्यासाठी गेल्या जूनमध्ये सरकारी अधिकारी तेथे गेले तेव्हा तेथील ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यावरून काश्मीरमधील लोक देशाच्या मुख्य प्रवाहात येण्यास किती उत्सूक आहेत ते दिसून आले आहे असे मोदी यांनी नमूद केले. काश्मीरींना सुशासन हवे आहे ही बाब यामधून जाणवली आहे. गोळ्या आणि बॉम्बच्या ताकदीपेक्षा विकासाची शक्ती मोठी आहे हे सुद्धा यातून स्पष्ट झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.