मुसळधार पावसाने झोडपल

>> वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी पडझड, वीजपुरवठा खंडित

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रूपांतर झाल्याने मंगळवारपासून राज्यात जोरदार पावसाबरोबरच वादळी वारा सुटला. परिणामी उत्तर गोव्यापासून दक्षिण गोव्यापर्यंत मंगळवारी रात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंत मोठी पडझड झाली. ‘निसर्ग’ वादळामुळे राजधानी पणजीसह सर्व शहरे तसेच ग्रामीण भागात मिळून राज्यभर शेकडो वृक्ष व झाडे उन्मळून पडली.

त्यामुळे वाहतुकीला अडथळा होण्याबरोबरच वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या. मात्र, राज्यात कुठेही जीवितहानी होण्याची घटना घडली नसल्याचे अग्निशामक दल व पोलीस सूत्रांनी माहिती देताना सांगितले.
वास्को शहरासह अन्य काही ठिकाणी झाडे वाहनांवर कोसळून वाहनांची मोडतोड होण्याच्या घटना घडल्या. वास्को येथे एक होंडा सिटी गाडी व मारूती गाडीवर झाड कोसळण्याची घटना घडली. तसेच दाबोळी येथे विमानतळ रस्त्यावर माड उन्मळून पडल्याने वाहतूक खोळंबली.

पणजी अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार मेरशी व ताळगाव येथे निवासी घरांवर वृक्ष कोसळला. तसेच मेरशी ते चिंबल या दरम्यान मारूती मंदिराजवळ वीज ट्रान्स्फॉर्मवर वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

हणजूण, पर्रा व हळदोणा येथे तीन ठिकाणी घरांवर झाडे कोसळली तर पिळर्ण येथे एका बांधकाम चालू असलेल्या घरावर झाड कोसळले. वेर्णे दांड्यावर येथे (वेर्णे सर्कलजवळ) एका घरावर वृक्ष कोसळला. दरम्यान, जोरदार पावसामुळे काल बांबोळी येथील महामार्गाच्या खालच्या भुयारी मार्गात प्रचंड पाणी शिरल्याने या भुयारी मार्गाला तळ्याचे रूप प्राप्त झाले हाते.

गोव्यात मोसमी पावसाचे उद्या आगमन
दरम्यान, मोसमी पावसाचे केरळमध्ये आगमन झालेले असून उद्या ५ जूनपर्यंत मान्सूनचे गोव्यात आगमन होणार असल्याचे हवामान खात्यातील सूत्रांनी सांगितले.

पणजीत ५ इंच पाऊस
राजधानी पणजी शहरात मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० या २४ तासांच्या काळात ५ इंच एवढा पाऊस झाल्याचे पणजी हवामान खात्यातील सूत्रांनी काल सांगितले. राज्यातील अन्य भागांतही ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या जोरामुळे मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. आज ४ रोजीही उत्तर व दक्षिण गोव्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता पणजी हवामान खात्याने व्यक्त केली आहे.