ब्रेकिंग न्यूज़

मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीेचे चेअरमन व्हावे : महापौर

पणजी स्मार्ट सिटीचे चेअरमन स्वयंदीपपाल चौधरी हे गेल्या दोन वर्षांपासून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पणजीत कोणती विकासकामे झाली याची माहिती देऊ शकलेले नसून अशातच या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी पणजीचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहू शकत नसल्याचे सांगून ती बैठकच काल रद्द केल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांची त्या पदावरून हकालपट्टी करावी व पणजी स्मार्ट सिटीचे स्वत: चेअरमन व्हावे, अशी मागणी पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली.

सोमवारी आमदार बाबुश मोन्सेर्रात व पणजी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेसंबंधी झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. ह्या बैठकीसाठी स्मार्ट सिटीचे चेअरमन स्वयंदीपपाल चौधरी यांना निमंत्रित करण्यात आले होते. पणजीतील लोक ह्या बैठकीला हजर राहणार होते असे उदय मडकईकर यांनी सांगितले.
पणजी शहरात स्मार्ट सिटी योजनेखाली कोणकोणती विकासकामे झाली आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे पणजीतील नागरिक बाबुश मोन्सेर्रात यांना सांगू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर वरील बैठक बोलावण्यात आली होती, असे मडकईकर म्हणाले. मात्र चौधरी यांनी शेवटच्या क्षणी आपण या बैठकीला हजर राहू शकत नसल्याचे कळवल्याने ही महत्वाची बैठक रद्द करावी लागल्याचे मडकईकर म्हणाले.

नागरिकांकडून मोन्सेरात यांना विचारणा
विविध बिगर सरकारी संघटनाही पणजी स्मार्ट सिटीच्या कामांवरुन पणजी महापालिका व आमदार बाबुश मोन्सेर्रात यांना प्रश्‍न विचारू लागल्या आहेत. ह्या योजनेखाली नक्की कोणती कामे झालेली आहेत. किती ठिकाणी अद्याप काम चालू आहे, किती ठिकाणी ते पूर्ण झालेले आहे व किती ठिकाणी सुरू व्हायचे आहे ते जाणून घेण्याची इच्छा काही बिगर सरकारी संघटना व पणजीतील नागरिकांनी केली आहे. ह्या पार्श्‍वभूमीवरच ही बैठक बोलावण्यात आली होती, असे मडकईकर यानी स्पष्ट केले.

१८० कोटी रु.च्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांपेक्षा पणजीच्या कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी ह्या योजनेखाली बायंगिणी येथे कचरा प्रकल्प उभा करता आला असता असेही मडकईकर म्हणाले.