मुख्यमंत्री पार्सेकरांची आता खरी कसोटी

0
106

– रमेश सावईकर
मनोहर पर्रीकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून समावेश झाल्याचे निश्‍चित झाल्यानंतर लागलीच राज्याचे मुख्यमंत्रीपद कुणाला मिळते याबद्दलच्या विषयावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले. तथापि सत्ताधारी भाजपांत एकोपा असल्याचे सिद्ध करून दाखविण्याचा प्रकार घडला आणि गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर यांची बिनविरोध निवड झाली. मांद्रे मतदारसंघातून माजी केंद्रिय मंत्री ऍड. रमाकांत खलप यांचा पराभव करून लक्ष्मीकांत पार्सेकर निवडून आले होते. गोव्याचे भाग्यविधाते कै. भाऊसाहेब बांदोडकर यांनी मांद्रे मतदारसंघातून विजय संपादन केला होता. आता पार्सेकर मुख्यमंत्री बनल्याने मांद्रे मतदारसंघाला दुसर्‍यांदा मुख्यमंत्री लाभला. बहुजन समाजाच्या नेत्याकडे मुख्यमंत्रिपद गेल्याने या समाजाची उन्नती होईल म्हणून बहुजनसमाज आनंदी झाला आहे. पार्सेकर यांची आतापर्यंतची एकूण राजकीय कारकीर्द पाहता त्यांनी फार मोठी झेप घेतली आहे. आपल्या गावात शिक्षणासाठी मोलाचे कार्य करून त्यांनी आपली समाजाप्रती असलेली तळमळ, आत्मियता दाखवून दिली आहे. प्रारंभीच्या काळात त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला, तोच मुळी अशिक्षित असलेल्या आपल्या गावातील युवा पिढीला सुशिक्षित बनविण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे! अर्थात त्यांचे शिक्षणक्षेत्रातील हे स्वप्न पूर्णत्वास गेले. मुख्यमंत्री पार्सेकर यांचा पिंड हा समाजसेवकाचा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार त्यांच्यावर झाल्याने देशाप्रती जाज्वल्याभिमान, प्रखर निष्ठा नि भक्ती हे भाव त्यांच्या ठायी आपसुकच भिनलेले आहेत.
गोवा राज्याच्या भाजपाध्यक्षापासून ते आमदार, मंत्री नि आता मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. त्यामुळे जनतेशी संवाद, पक्षसंघटना, राज्याचा विकास याबाबतची त्यांची मते-विचार पक्के! आता त्या विचारांना मूर्त रूप देऊन राज्याला पुढील प्रगतीपथावर नेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. अनुभवाच्या जोरावर नि लोकांच्या पाठिंब्यावर ही जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील अशी अपेक्षा बाळगू या!
जेवढे पद मोठे, तेवढी जबाबदारी मोठी. एखादी भूमिका घेण्यापूर्वी संबंधित विषयाचा काय परिणाम होईल याचा सर्वंकष विचार करूनच निर्णयाप्रत यायला हवे, याची जाणीव ठेवून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना या पदाची धुरा सांभाळावी लागेल. सध्या राज्यातील एकूण परिस्थिती पाहता, राज्य कठीण समस्यांच्या काळातून पुढे जात आहे. अनेक ज्वलंत प्रश्‍न जनतेला भेडसावत आहेत. त्यातून मार्ग काढताना सावधगिरी बाळगावी लागेल. नव्या मुख्यमंत्र्यांना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे मार्गदर्शन लाभेल. त्यामुळे एक उत्तम राजकीय मार्गदर्शक म्हणून पार्सेकर यांना पर्रीकरांना गुरूस्थानी मानावे लागेल. कारण पक्षांतर्गत एकसंघता कायम आहे असे वरकरणी वाटत असले तरी अंतर्गत खदखद पूर्णपणे शमणार नाही. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसौझा यांनी परदेश दौर्‍यावरून परतल्यानंतर थोडी नाखुशीची भावना व्यक्त करून मुख्यमंत्रीपदावर आपला हक्क असल्याचे सूतोवाच केले होते. पण भाजपा केंद्रिय समितीचा मुख्यमंत्री निवडीबाबतचा निर्णय हा अगोदरच पक्का झाल्याने डिसौझांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
राज्याचे मुख्यमंत्रीपद आपल्या समाजाला मिळावे अशी दृढ इच्छा कॅथोलिक समाजाची राहिलेली आहे. त्यांच्या समाजाचा मुख्यमंत्री असतो त्यावेळी दक्षिण गोव्यातील नेतेही नरम भूमिका घेतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. वास्तविक धार्मिक संघटना, संस्थांना राजकीय क्षेत्रात हक्काने सक्रीय होण्याची गरज नसते. पण दुर्दैवाने गोव्यात तसे नाही. राज्यांतील प्रत्येक महत्त्वाच्या धोरणांविषयी, प्रकल्प, उद्योगांविषयी चर्च संस्थेची आपली वेगळी भूमिका असते आणि मंत्रिमंडळातील कॅथोलिक मंत्री व आमदार या संस्थेच्या भूमिकेला कोणत्याच परिस्थितीत विरोध करू शकत नाही. प्राथमिक शिक्षण माध्यमप्रश्नी याची प्रचिती आलेली आहे. अखेर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनाही चर्चपुढे नमते घ्यावे लागले. या पार्श्‍वभूमीवर विचार करता नवे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या शिरी चढविला गेलेला राजमुकूट हा ‘काटेरी’ आहे. त्यांना आपली सारी बुद्धिमत्ता, पक्ष संघटना कौशल्य, कर्तबगारी पणाला लावावी लागेल. अर्थात तेही तेवढेच कणखर आहेत. परिस्थितीपुढे नमते घेऊन कर्तव्यापासून दूर जाणारे नाहीत.
पर्रीकर हे संरक्षणमंत्री बनले ही गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. गोव्याची शान ते वाढवतील यात शंकाच नाही. कॉंग्रेस पक्षाचे विरोधी नेते प्रतापसिंग राणे, गोवा प्रदेश कॉंग्रेसाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले. अपवाद फक्त राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचा! गोव्याची परिस्थिती हाताळण्यात पर्रीकरांना अपयश आल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिल्लीत नेले, असा जावईशोध नाईक यांनी लावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्रीकर यांची बुद्धिमत्ता, कर्तव्यदक्षता, हुशारी, चाणाक्षपणा, निर्णयक्षमता आदी गुणांची पारख झाल्यानेच त्यांनी पर्रीकर यांना देशाचे संरक्षणमंत्री बनविले. हे सरळ साधे सोपे गणित आहे. केवळ राजकीय विरोधाच्या आकसापायी खासदार शांताराम नाईक काही बरळत असतील तर त्याचा अर्थ त्यांनाच ठावे!
गोव्यात सध्या दाबोळी विमानतळ विस्तार, नियोजित आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ, शिक्षण माध्यम धोरण, दाबोळी नजीकचा नौदल तळ, खाण अवलंबितांचा प्रश्न व इतर काही क्षेत्रातील ज्वलंत प्रश्न सोडविणे हे एक आव्हान आहे. दक्षिण गोव्यातील राजकीय विरोधक व दाबोळी समर्थकांनी मोपाला विरोध करण्याचा विडा उचलला आहे. उत्तर गोव्यातील जनतेचा मोपाला पूर्ण पाठिंबा आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मोपा विमानतळ प्रकल्पास चालना देत इच्छा प्रस्ताव मागविले होते. ही प्रक्रिया पुढे नेऊन मोपा साकारण्यासाठी पार्सेकरांना आपली शक्ती पणाला लावावी लागेल. मुख्यमंत्री पार्सेकर हे पेडणे तालुक्यातले असल्याने मोपा प्रकल्प साकारला तर पेडणे तालुक्याचा विकास होईल म्हणून मोपा विरोधकांपुढे कोणत्याही परिस्थितीत त्यांना नमते घेणे परवडणारे नाही. नौैदल तळ दाबोळीवरून हलविण्याचा विषय आता संरक्षणमंत्री पर्रीकर हाताळणार असल्याने मुख्यमंत्री पार्सेकर यांच्यावरचे ओझे हलके होईल.
खाणबंदीमुळे निर्माण झालेली खाण अवलंबितांची समस्या सोडवीत असताना सर्व साधक बाधक गोष्टींचा विचार मुख्यमंत्र्यांना करावा लागेल. राज्यातील भूसंपत्ती, जलस्रोत, पर्यावरण, वनसंपत्ती यांचे संवर्धन झाले तरच राज्याचा निभाव लागेल. पर्यटन उद्योगाला नवी दिशा देताना गोव्याच्या संस्कृतीवर घाला पडणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. परप्रांतियांपासून काढलेले उपद्रव, वाढती गुन्हेगारी असे अनेक प्रश्‍न हाताळणे म्हणजे एक आव्हान आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे आव्हान समर्थपणे पेलू शकले तरच गोव्याच्या प्रगतीची घोडदौड चालू राहील! मुख्यमंत्र्यांना यासाठी शुभेच्छा!