ब्रेकिंग न्यूज़
मुख्यमंत्री पर्रीकर पुन्हा अमेरिकेला रवाना

मुख्यमंत्री पर्रीकर पुन्हा अमेरिकेला रवाना

>> मुख्यमंत्रीपदाचा ताबा कुणाकडेही नाही ः अमेरिकेतूनच कारभार हाताळणार

मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये २३ ऑगस्टपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढील उपचारांसाठी पुन्हा अमेरिकेला काल मध्यरात्री रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अमेरिकेला जाताना मुख्यमंत्रिपदाचा ताबा कुणाकडेही दिलेला नाही. मुख्यमंत्री अमेरिकेतून कामकाज हाताळणार आहेत, अशी माहिती सीएमओ कार्यालयातील सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पहिल्यांदा अमेरिकेत उपचारांसाठी जाताना तीन सदस्यीय मंत्र्यांची समिती नियुक्ती केली होती. या समितीला खर्च करण्याबाबत ठराविक अधिकार दिले होते. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दुसर्‍यांदा अकरा दिवसांसाठी अमेरिकेला जाताना आपल्या कार्यालयातील प्रधान सचिवांना कामकाजाबाबत अधिकार दिले होते. मुख्यमंत्री पर्रीकर आताही कार्यालयाच्या माध्यमातून कामकाज हाताळणार आहेत.

पर्रीकर पुढील उपचारांसाठी पुन्हा अमेरिकेला जाणार असल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली आहे. पर्रीकर अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये अकरा दिवस उपचार घेऊन २२ ऑगस्टला राज्यात परतले होते. राज्यात परतल्यानंतर माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश यात्रेत भाग घेतला होता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी २३ ऑगस्टला प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल व्हावे लागले होते.

पर्रीकर यांना पचन क्रियेसंबंधीच्या तक्रारीवर पुढील उपचाराची गरज आहे, असे लीलावती हॉस्पिटलमधील एका अधिकार्‍याने मुंबईत वृत्तसंस्थेला सांगितले.
मुख्यमंत्री पर्रीकर उपचारासाठी तातडीने अमेरिकेला जाणार असल्याची माहिती मिळताच काल सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, प्रदेश सरचिटणीस सदानंद तानावडे, गाभा समितीचे सदस्य दत्ता खोलकर, संजीव देसाई आदी नेत्यांनी मुंबईत धाव घेऊन पर्रीकर यांच्याशी प्रशासकीय कारभारासंबंधीच्या विविध विषयावर यांच्याशी चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पर्रीकरांची प्रकृती ठीक ः कुंकळकर
पर्रीकर यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना पचन क्रियेविषयी समस्या जाणवत असल्याने पुढील उपचारार्थ अमेरिकेला जावे लागत आहे, अशी माहिती माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली.
पर्रीकर यांनी पुढील उपचारार्थ अमेरिकेत जाण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाची सर्व मंत्र्यांना माहिती दिली आहे. मुख्यमंत्री केवळ सात दिवसांसाठी जात असतील तर आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून पूर्वी प्रमाणे कारभार हाताळू शकतात. पर्रीकर यांच्या अनुपस्थित सुद्धा प्रशासकीय कामकाज पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे हाताळले जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
दरम्यान, भाजपचे मयेचे आमदार प्रवीण झांटये यांनी पर्रीकर यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली.

गाभा समिती सदस्यांचा दिल्लीचा बेत रद्द
मुख्यमंत्री पर्रीकर यांची मुंबईतील हॉस्पिटलमध्ये भेट घेण्यासाठी गेलेल्या भाजपच्या गाभा समितीने दिल्लीला जाण्याचा बेत रद्द केला आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना रात्री उशिरा दिली.

ढवळीकरांकडे ताबा नाही
पर्रीकर अमेरिकेत जाण्यापूर्वी ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा ताबा सुपूर्द करतील, अशी चर्चा वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि राजकीय पातळीवर सुरू होती. परंतु, ढवळीकर यांच्याकडे पदभार देण्यास सरकारमधील काही जणांनी आक्षेप घेतल्याने पर्रीकर यांनी कुणाकडेही ताबा न देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे.

गोव्यातील पर्यायी नेतृत्वावर आज
अमित शहांबरोबर दिल्लीत चर्चा
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत राज्यातील पर्यायी नेतृत्वाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या गाभा समितीचे सदस्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची नवी दिल्ली येथे आज (गुरूवारी) भेट घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी भाजप मुख्यालयात काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री पर्रीकर यांना उपचारासाठी पुन्हा अमेरिकेत जावे लागल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासनावर परिणाम होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. भाजप आघाडी सरकारमधील नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत प्रशासनावर परिणाम होत असल्याची जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. परंतु, याबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. पक्षाचे अध्यक्ष शहा यांच्याशी राज्यातील एकंदर राजकीय व प्रशासकीय विषयांवर चर्चा केली जाणार आहे. राज्याचे तात्पुरते नेतृत्व अन्य नेत्याकडे देण्याबाबत यावेळी चर्चा होऊ शकते. पर्यायी व्यवस्थेबाबत निर्णय घेताना आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना विश्‍वासात घेतले जाणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती ठीक आहे. कुठल्याही प्रकारचा गंभीर प्रश्‍न नाही. ते अमेरिकेला पुढील उपचार आणि शंकांचे निरसन करण्यासाठी गेले आहेत. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा किंवा त्यांच्या अनुपस्थितीत दुसर्‍याकडे तात्पुरता ताबा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायला हवा, असेही केंद्रीय मंत्री नाईक यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

आपण भाजपचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. पक्षाने आत्तापर्यंत दिलेल्या जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. या पुढेही पक्षाकडून देण्यात येणारी कुठलीही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आहे, असे नाईक यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय मंत्री संध्याकाळी उशिरा दिल्लीला रवाना झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पूर्णवेळ मुख्यमंत्री नेमा
अन्यथा आंदोलन ः कॉंग्रेसचा इशारा
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारार्थ पुन्हा अमेरिकेला जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाने पूर्णवेळ मुख्यमंत्री नियुक्त करण्याची मागणी काल केली आहे.
मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या राज्यातील अनुपस्थितीमुळे प्रशासन कोलमडले आहे.

राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरली आहे. भाजपचा मित्रपक्षावरसुध्दा विश्‍वास नाही, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.
राज्यपालांनी पूर्णवेळ मुख्यमंत्री नियुक्तीच्या मागणीची दखल न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिला आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करून प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दुसर्‍याकडे सोपविली पाहिजे. यामुळे नागरिकांची गैरसोय सुध्दा होणार नाही, असे चोडणकर यांनी सूचित केले आहे.