मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील युुसुफ मेमनचा मृत्यू

१९९३ साली झालेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि फरार असलेल्या टायगर मेमनचा भाऊ युसुफ मेमनचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील कारागृहात युसूफ मेमनचा मृत्यू झाला. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समजू शकले नाही, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली. शवविच्छेदनासाठी मृतदेह धुळे येथे पाठवण्यात आला. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिले आहे. युसुफ मेमनला २००७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात त्याला मुंबईमधील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले. नंतर नाशिक जेलमध्ये त्याला शिफ्ट करण्यात आले होते. युसुफ मेमनवर मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचण्याचा आरोप होता.