ब्रेकिंग न्यूज़

मुंबई इंडियन्स ‘प्ले ऑफ’मध्ये दाखल

>> सुपर ओव्हर’मध्ये सनरायझर्स हैदराबादवर केली मात

थरारक लढतीत मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ‘सुपर ओव्हर’मध्ये काल गुरुवारी पराभव केला. या विजयासह मुंबईने इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील ‘प्ले ऑफ’मध्ये पात्रता मिळविली. चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्सनंतर प्ले ऑफसाठी पात्र ठरणारा मुंबई हा तिसरा संघ ठरला.
विजयासाठी मुंबईने हैदराबादसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी सात धावांची आवश्यकता असताना मनीष पांडेने षटकार ठोकत सामना बरोबरीत आणला. या बरोबरीमुळे सामन्याचा निकाल देण्यासाठी सुपर ओव्हरचा वापर करावा लागला. संघ पराभवाच्या छायेत असताना हैदराबादकडून मनीष पांडेने एकाकी झुंज देताना केवळ ४७ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७१ धावांची खेळी केली.

सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजीची जबाबदारी मलिंगावर टाकण्यात आली. मनीष पांडे व मोहम्मद नबी हैदराबादसाठी फलंदाजीला उतरले. या षटकातील पहिल्याच चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या नादात पांडे बाद झाला. दुसर्‍या चेंडूवर मार्टिन गप्टिलने एक धाव घेतल्यानंतर तिसर्‍या चेंडूवर नबीने षटकार खेचला. परंतु, पुढच्याच चेंडूवर बुमराहने नबीचा त्रिफळा उडवून हैदराबादला ८ धावांत रोखले. ९ धावांची आवश्यकता असताना मुंबईने हार्दिक पंड्या व पोलार्डला उतरवले तर हैदराबादने राशिद खानकडे चेंडू सोपविला. त्यांना राशिदकडून चमत्काराची अपेक्षा होती. परंतु, हार्दिकने पहिलाच चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावत मुंबईचा विजय सुकर केला. दुसर्‍या चेंडूवर एक धाव घेत त्याने पोलार्डला स्ट्राईक दिली. तिसर्‍या चेंडूवर पोलार्डने दोन धावा घेताना मुंबईला प्ले ऑफमध्ये नेले.

तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. तब्बल दोन वर्षांपूर्वी वानखेडेवर अखेरच्या वेळी नाणेफेक जिंकणार्‍या कर्णधाराने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक यांनी मुंबईला समाधानकारक सुरुवात दिली. पॉवरप्लेच्या पहिल्या काही षटकांत मध्यमगती गोलंदाजांना मुंबईने लक्ष्य केले. परंतु, फिरकीपटू येताच त्यांची धावगती मंदावली. डावखुरा मध्यमगती गोलंदाज खलिल अहमदला फ्रंटफूटवरून ‘पूल’चा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा बाद झाला. मिड ऑनवर नबीने त्याचा सोपा झेल घेतला. रोहितने ५ चौकरासह १८ चेंडूत २४ धावा केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवच्या साथीने क्विंटन डी कॉकने मुंबईचा डाव पुढे नेला आणि अर्धशतकी भागीदारी केली. खेळपट्टी फिरकी तसेच मध्यमगती गोलंदाजांना काही प्रमाणात साथ देत असल्याचे जाणून डी कॉकने आपल्या नैसर्गिक आक्रमकतेला काही प्रमाणात मुरड घातली. तर दुसर्‍या टोकाने सूर्यकुमारने अधिक धोका पत्करणे पसंत केले. याच प्रयत्नात तो बाद झाला. त्याने ३ चौकार आणि १ षटकार खेचत २३ धावा केल्या. विंडीजचा स्फोटक फलंदाज इविन लुईसला मोठी खेळी करता आली नाही. काही चेंडू वाया घालविल्यानंतर आलेल्या दबावामुळे मोठा फटक खेळण्याच्या नागात डीप मिडविकेटवर शंकरकडे झेल देऊन त्याने तंबूची वाट धरली. हार्दिकने केवळ १० चेंडूंत १८ धावांची खेळी केली. यात प्रत्येकी एक चौकार व षटकाराचा समावेश होता. एका टोकाने गडी बाद होत असताना सलामीवीर डी कॉकने मात्र संयम राखत ४७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे १० वे आयपीएल अर्धशतक ठरले. कायरन पोलार्डकडून मोठ्या फटक्यांची मुंबईकरांना अपेक्षा होती, पण तो १० धावा काढून बाद झाला. क्विंटन डी कॉक याने नाबाद ६९ धावा केल्या. यात खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले. खलिल अहमदने सर्वाधिक ३ बळी टिपले. परंतु, यासाठी त्याला ४० धावा मोजाव्या लागल्या. तर भुवनेश्‍वर कुमार आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. राशिद खानने प्रभावी मारा करत आपल्या चार षटकांत केवळ २१ धावा दिल्या.
या सामन्यासाठी मुंबईने संघात एकही बदल केला नाही. दुसरीकडे हैदराबादच्या संघाने २ बदल केले. विश्‍वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परतलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या जागी त्यांनी न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलला खेळविले तसेच स्विंग गोलंदाज संदीप शर्माला बाहेर बसवून बासिल थम्पीला संघात घेतले.

धावफलक
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा झे. नबी गो. खलिल २४, क्विंटन डी कॉक नाबाद ६९ (५८ चेंडू, ६ चौकार, २ षटकार), सूर्यकुमार यादव झे. राशिद गो. खलिल २३, इविन लुईस झे. शंकर गो. नबी १, हार्दिक पंड्या झे. नबी गो. भुवनेश्‍वर १८, कायरन पोलार्ड झे. अभिषेक गो. खलिल १०, कृणाल पंड्या नाबाद ९, अवांतर ८, एकूण २० षटकांत ५ बाद १६२
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ४-०-२९-१, खलिल अहमद ४-०-४२-३, मोहम्मद नबी ४-०-२४-१, राशिद खान ४-०-२१-०, बासिल थम्पी ४-०-४०-०
सनरायझर्स हैदराबाद ः वृध्दिमान साहा झे. लुईस गो. बुमराह २५, मार्टिन गप्टिल पायचीत गो. बुमराह १५, मनीष पांडे नाबाद ७१, केन विल्यमसन पायचीत गो. कृणाल ३, विजय शंकर झे. पोलार्ड गो. कृणाल १२, अभिषेक शर्मा झे. डी कॉक गो. हार्दिक २, मोहम्मद नबी झे. यादव गो. हार्दिक ३१, राशिद खान नाबाद ०, अवांतर ३, एकूण २० षटकांत ६ बाद १६२
गोलंदाजी ः बरिंदर सरन २-०-२४-०, लसिथ मलिंगा ४-०-४३-०, जसप्रीत बुमराह ४-०-३१-२, राहुल चहर ४-०-२१-०, कृणाल पंड्या ४-०-२२-२, हार्दिक पंड्या २-०-२०-२