मुंबई इंडियन्सने चेन्नईला नमविले

कर्णधार रोहित शर्माचे दमदार अर्धशतक आणि मलिंगासह इतर गोलंदाजांच्या सूत्रबद्ध मार्‍याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला ४६ धावांनी पराभूत करीत आयपीएलच्या १२व्या पर्वात आपल्या ७व्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे मुंबईने ११ सामन्यांतून १४ गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे.

मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज संघ पूर्णपणे ढेपाळला. त्याला सर्व गड्यांच्या मोबदल्यात १७.४ षट्‌कांत १०९ धावांपर्यंतच मजल मारता आली. मुरली विजय (३८), ड्‌वेन ब्राव्हो (२०) आणि मिचेल सँटनर (२२) वगळता इतर फलंदाजांनी पूर्ण निराशा केली. मुंबईच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांना खेळपट्टीवर जास्तवेळ स्थिरावता आले नाही. मुंबईतर्फे लसिथ मलिंगाने भेदक गोलंदाजी करताना ३७ धावांत सर्वाधिक ४ बळी मिळविले. कृणाल पंड्या व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ तर हार्दिक पंड्या व अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

चेन्नई सुपर किंग्जचा नियमित कर्णधार महेंद्रसिंह धोनीला या सामन्यात विश्रांती देण्यात आली. त्यामुळे संघाचे नेतृत्व डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने केले. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. मुंबईने मिळालेल्या संधीचा लाभ उठविताताना आक्रमक सुरुवात केली होती. त्यामुळे मुंबई मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते. परंतु दीपक चहर व मिचेल सँटनरसह ड्‌वेन ब्राव्होने अचूक टप्प्याची गोलंदाजी करीत त्यांना ४ बाद १५५ धावांवर रोखले. दीपक चहरने क्विंटन डी कॉकला यष्ट्यांमागे अंबाती रायुडूकरवी झेलबाद करीत चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने एव्हिन लुईसच्या साथीत दुसर्‍या विकेटसाठी ७५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सँटनरने ही जोडी फोडताना एव्हिन लुईसला (३२) ब्राव्होकरवी झेलबाद केले.

लगेच कृणाल पंड्याही केवळ १ धाव जोडून इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तर ६ चौकार व ३ षट्‌कारांसह ४८ चेंडूत ६७ धावांची कर्णधारी खेळी केलेला रोहितही सँटनरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर हार्दिक पंड्या (नाबाद २३) व कीरॉन पोलार्ड (नाबाद १३) यांनी काहीशी संयमी फलंदाजी केल्याने मुंबई इंडियन्सला चेन्नईसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवता आले. चेन्नईकडून मिचेल सँटनरने २ तर दीपक चहर व इम्रान ताहिर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

धावफलक,
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा झे. मुरली विजय गो. मिचेल सँटनर ६७, क्विंटन डी कॉक झे. अंबाती रायुडू गो. दीपक चहर १५, एव्हिन लुईस झे. ड्‌वेन ब्राव्हो गो. मिचेल सँटनर ३२, कृणाल पंड्या झे. मिचेल सँटनर गो. इम्रान ताहिर १, हार्दिक पंड्या नाबाद २३, कीरॉन पोलार्ड नाबाद १३.
अवांतर ः ४. एकूण २० षट्‌कांत ४ बाद १५५
गडी बाद होण्याचा क्रम ः १-२४ (क्विंटन डी कॉक २.४), २-९९ (इर्विन लुईस १२.१), ३-१०१ (कृणाल पंड्या १३.१), ४-१२२ (रोहित शर्मा १६.२)
गोलंदाजी ः दीपक चहर ४/०/४६/१, हरभजन सिंग ४/०/२३/०, इम्रान ताहीर ४/०/३७/१, ड्वेन ब्राव्हो ४/०/३५/०, मिचेल सँटनर ४/०/१३/२.
चेन्नई सुपर किंग्ज ः मुरली विजय झे. सूर्यकुमार यादव गो. जसप्रीत बुमराह ३८, शेन वॉटसन झे. राहुल चहर गो. लसिथ मलिंगा ८, सुरेश रैना झे. सूर्यकुमार यादव गो. हार्दिक पंड्या २, अंबाती रायुडू त्रिफळाचित गो. कृणाल पंड्या ०, केदार जाधव त्रिफळाचित गो. कृणाल पंड्या ६, ध्रुव शौरी झे. राहुल चहर गो. अनुकूल रॉय ५, ड्वेन ब्राव्हो झे. व गो. लसिथ मलिंगा २०, मिचेल सँटनर झे. कीरॉन पोलार्ड गो. लसिथ मलिंगा २२, दीपक चहर झे. कृणाल पंड्या गो. जसप्रीत बुमराह ०, हरभजन सिंग झे. हार्दिक पंड्या गो. लसिथ मलिंगा १, इम्रान ताहिर नाबाद ०.
अवांतर ः ६. एकूण १७.४ षट्‌कांत सर्वबाद १०९ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-९ (शेन वॉटसन ०.५), २-२२ (सुरेश रैना ३.१), ३-३४ (अंबाती रायुडू ४.३), ४-४५ (केदार जाधव ७.२), ५-६० (ध्रुव शौरी १०), ६-६६ (मुरली विजय ११.४), ७-९९ (ड्वेन ब्राव्हो १६), ८-१०१ (दीपक चहर १६.३), ९-१०३ (हरभजन सिंग १७.२), १०-१०९ (मिचेल सँटनर १७.४)गोलंदाजी ः लसिथ मलिंगा ३.४/०/३७/४, कृणाल पंड्या ३/०/७/२, हार्दिक पंड्या २/०/२२/१, जसप्रीत बुमराह ३/०/१०/२, राहुल चहर ४/०/२१/०, अनुकूल रॉय २/०/११/१.