ब्रेकिंग न्यूज़
मुंग्यांची रांग

मुंग्यांची रांग

 प्रा. जयप्रभू कांबळे
‘मन मे लड्डू फुटा’ या जाहिरातीतल्या माणसासारखा चेहरा करून तो म्हणाला, ‘‘आपण फार काळ इथे टिकणार नाही. इथे कुणाला कुणाचा पायपोस नसतो. हे सगळे मायावी आहे. फेकमफाक आहे’’
तो फ्लॅटवर पोहोचला. पोरांनी सगळं साहित्य विस्कटलेलं. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर तुटून पडलेली पोरं त्याला दिसली. त्याने बॅग फेकली. तो नुस्ता सोफ्यावर पडून राहिला. मोबाईलच्या मालकीसाठी दोन्ही पोरं एकमेकांचे केस धरून उपडू लागली. गालावरची सालं काढू लागली. पण मोबाईल काही केल्या सोडीनात. तो ओरडला. त्याने मोबाईल काढून घेण्याची त्यांना तंबी दिली आणि पुन्हा सोफ्यावर आला. ‘‘आपणही असेच करायचो, लहान असताना. आईचं दूध आपल्यालाच जास्त पिता यावं म्हणून लहान बहिणीला मारायचो. तिला बाजूला करायचो. तिला पोटभर दूध कधीच पिऊ द्यायचो नाही. आज पोरं आईच्या दुधासाठी भांडत नाहीत, मोबाईलसाठी भांडतात. आपण खूपच अलंकारिक बोलत असल्याची त्याला जाणीव झाली आणि तो नुस्ता शांत राहून मोबाळलेली पोरं पाहू लागला.
मोबाईलमध्ये जसं दिसतं तशी पोरं करायची. एकमेकांवर गुरगुरायची. मध्येच ‘ओ शीट’ म्हणायची. पोरगं म्हणालं ‘‘अगं लेफ्टला घे.’’  तेवढ्यात पोरगी म्हणाली ‘‘अरे राईटला घे.’’ मग असं काहीवेळ लेफ्ट-राईट चाललं. त्याने मोबाईलपासून पोरांना मोकळं केलं. बॅगमध्ये असणारी कॅडबरी वाटून दिली. पुन्हा सोफ्यावर आला. कपड्याच्या बटणांना हात घातला आणि सोफ्यावरच लवंडला. डोळे लागेनात. ‘‘आपण पोरांचं बालपण खाल्लं. या शहरातल्या गर्दीत त्यांना कुठेही मिक्स होऊ दिलं नाही. मित्र-मैत्रिणी जोडू दिल्या नाहीत आणि अवतीभोवती होतं तरी कोण? कोण आहे या शहरात त्यांच्याशी खेळणारं. त्यांच्याशी बोलणारं.’’ विचारांचे चक्र त्याच्या डोक्यात घुसळत होते. आपण लहान होतो, तेव्हा गावात असं नव्हतं. गावातल्या गल्लीत साताठ पोरं जमली की सगळं गाव हुंदडून यायची. माळरान पालथी घालायची. शेणकुटं गोळा करायची. लाकडं गोळा करायचीत. ओढे- नाले पालथी घालायचीत. इथं पालथी घालायला काय आहे? बोर्डला लावलेला चार्जर, चार्जरला जोडलेला मोबाईल एवढंच. इतकंच. होय इतकंच म्हणत त्याने डोळे झाकले.
तो उठला तेव्हा सायंकाळचे सात वाजले होते. तिने चहा आणून दिला. चहा देतानाच ती म्हणाली, ‘‘दूध संपलंय. दूध पावडर घातली आहे.’’ दूध पावडर हा शब्द ऐकताच त्याला काय वाटले कुणास ठाऊक. तो विलक्षण हसला. तो हसला मनातल्या मनात विलक्षण. विलक्षण हसला आणि मग पुन्हा मोठ्याने हसला. मग पुन्हा मोठ्याने हसला. ती म्हणाली, ‘‘काय वेड लागलं का? हसायला काय झालंय, दूध पावडर काय पहिल्यांदाच घातली आहे का? ’’ तो म्हणाला ‘‘अगं तसं नाही. आज गाईच्या दुधाची पावडर उद्या…? त्याला अवघडल्यागत झाले. तोंडातून शब्द फुटेना. तीच म्हणाली मग ‘‘कळलं तुमचं शहाणपण. चहा घ्या, थंड होतोय.’’  तो भानावर आला आणि त्याने चहा संपवला. आपण त्याला ग्लोबल काळातला आधुनिक अश्‍वत्थामा असल्याचा भास झाला.
तो सोफ्यावरून उठला. मग त्याने स्वत:चे लखलखीत सर्व्हिसिंग करून घेतले. आता त्याला फ्रेश वाटू लागले. मग त्याने लॅपटॉप ‘ऑन’ केला. कुठल्यातरी ऍपवर जाऊन काहीतरी मजकूर पोस्टाळला. व्हॉट्‌स ऑन युवर माईंड या ऍपच्या प्रेमळ विनंतीला त्याने प्रतिसाद दिला. तर त्याला भरमसाठ प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्या सगळ्या प्रतिक्रियांना उत्तरं देण्याइतपत त्याच्याकडे वेळ नव्हता. परंतु हा सगळा प्रकार त्याला गमतीशीर वाटला. ‘मन मे लड्डू फुटा’ या जाहिरातीतल्या माणसासारखा चेहरा करून तो म्हणाला, ‘‘आपण फार काळ इथे टिकणार नाही. इथे कुणाला कुणाचा पायपोस नसतो. हे सगळे मायावी आहे. फेकम्‌फाक आहे’’ पण एका मतावर तो ठाम राहिला. टाईमपासाचे यासारखे दुसरे साधन नाही. थोड्याच वेळात त्याने लॅपटॉपला टाटा केला आणि तो फाईलीत शिरला. अगदी आटोपशीर केलेल्या फाईल त्याने पाहिल्या. आपली सर्टिफिकेट पाहिली.
कोणत्यातरी सेमिनारला तो गेला होता. मग त्याचे सत्र सुरू झाले. त्याने पेपर वाचला. मग पुन्हा दोन पेपर वाचले. मग पेपर वाचून संपले. मग सत्राचे अध्यक्ष बोलू लागले. मग ज्याने पेपर वाचलेला होता, त्यातल्या एका पेपरवाल्याचे खूप कौतुक झाले. त्याला कितीतरी भाषा येत होत्या. शिवाय विविध धर्मातले ग्रंथही त्याने अभ्यासल्याचे कळले आणि मग सत्राध्यक्ष म्हणाले ‘‘आता अमुक- अमुक सर जादूचे प्रयोग करून दाखवतील.’’ मग ते सर उठले. त्यांनी खिशातून पहिल्यांदा रूमाल काढला आणि तो पुन्हा खिशात घातला. जाताना रूमालात काहीच नव्हते, जेव्हा खिशातून रूमाल बाहेर काढला, तेव्हा त्यातून दहा रूपये निघाले. मग त्यांनी आणि काय काय काढून दाखवले. सर्वांनी जोरदार टाळ्यांचा पाऊस पाडला. अशा जादू करणार्‍या सरांसोबत निबंध वाचल्याने त्याने स्वत:चे कौतुक केले आणि घरचा रस्ता धरला. घरचा रस्ता धरण्यापूर्वी त्याने जोरदार स्वत:च्या कानाखाली वाजवून घेतल्या. त्या वाजवताना त्याला हसावे की रडावे काहीच कळेना.
तो भानावर आला, तेव्हा त्याला एक पत्र दाराशी सापडले. ते तसेच पडून होते. लोक अजून पत्र पाठवितात याच्यावर त्याचा विश्‍वास बसेना. पण ते पत्रच होते. त्याचा कवितेवरचा लेख मराठीतल्या एका ख्यातनाम नियतकालिकासाठी स्वीकारल्याचा मजकूर त्यात होता. त्याला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. तो म्हणाला, ‘‘का बरे त्या संपादकांनी पत्रच पाठवले असेल. एखादा एसएमएस किंवा मेल पाठवता आला नसता का? आपल्या अक्षरांवर एवढे प्रेम हा संपादक का बरे करत असेल. बाहेर बटबटीतपणा वाढतो आहे हे खरे आहे पण आतून उगवणारे कोंब अजून मेलेले नाहीत. ते वाढताहेत.’’ कित्येकवेळा त्याने पत्र पाहिले. पुन्हा पुन्हा वाचले. मग शेवटून वाचले आणि पत्रातून बाहेर पडून त्याने रस्ता पाहिला तर मुंग्यांसारखी वाहनांची रांग त्याला दिसली. हॉर्नच्या आवाजाने त्याचा वैताग वाढवला. आता त्याच्या डोक्यात मुग्यांची रांग होती आणि रस्त्यावर वाहने… पण पत्र काही त्याच्या डोळ्यांसमोरून हटेना.