ब्रेकिंग न्यूज़
माहिती, शक्ती आणि प्रेम

माहिती, शक्ती आणि प्रेम

माणसाचे जे ठरावीक जीवन असते, त्या जीवनात तो प्रत्येक क्षणाला अनेक अनुभवातून जातो. प्रत्येक क्षणाला माणसाच्या हातून बर्‍याच चांगल्या गोष्टी घडतात तर काही वाईटही. पण माणसाने एकदा कुठली चूक केली तर ती चूक म्हणून पचून जाते. परंतु तीच चूक परत-परत आपल्या हाताने तो करीत सुटला तर मात्र ती चूक नाही, ती त्याची मस्ती ठरते. आमची जी जगण्याची ठरावीक पद्धत असते त्या पद्धतीत प्रथम बालपण, नंतर तरुणपण आणि त्यानंतर म्हातारपण असतं. हे म्हातारपण म्हणजे आम्ही खूप काही पावसाळे अनुभवतो. प्रत्येक माणूस स्वतःचे जीवन कसे मजेत घालवायचे याचाच विचार करत असतो. आणि त्याकरता तो खूप मेहनत घेतो. कारण शेवटी मेहनत ही लागतेच. कोणी एका रात्रीत मोठा झाला… असे आम्ही कुठेही बघितलेले नाही. जेव्हा माणूस मेहनत घेतो तेव्हा त्या माणसाकरता- माहिती, शक्ती आणि प्रेम या तीनही गोष्टी महत्त्वाच्या असतात. या तीनही गोष्टींमध्ये ताळमेळ साधला पाहिजे. नाहीतर काही बरे-वाईट घडू शकते आणि ह्याचा परिणाम आमच्या सुंदर जीवनावर होऊ शकतो.
माहिती आणि प्रेम ह्या गोष्टींकडे जर आम्ही नजर फिरवली तर असे दिसेल की फक्त माहिती असून आपले काम पूर्ण होत नाही. आमच्या हृदयात दुसर्‍या माणसांबद्दल प्रेम असणं तितकंच महत्त्वाचं असतं. नाहीतर आम्ही खूप शिकलो आणि खूप वाचन केलं, आमच्याकडे भरभरून माहिती आहे पण आमच्याकडे दुसर्‍याबद्दल प्रेम नसेल तर आमच्या माहितीचा परिणाम दुसर्‍यावर घातक ठरू शकतो. एक साधे उदाहरण म्हणजे- आजच्या काळात थोडे सोशल मिडीयावर दुसर्‍याचे नाव खराब करण्यासाठी नवे-नवे खेळ खेळत असतात. त्यांच्याकडे सोशल मिडीयाबद्दल सगळीच माहिती असते पण त्यांच्या मनात दुसर्‍याबद्दल प्रेम नसते, ती भावना नसते. नाव खराब करणे म्हणजे किती वाईट आहे आणि ते योग्यही नाही हे त्यांना कळत नसते.
तसेच आणखी एक गोष्ट म्हणजे – काही देश दुसर्‍या देशावर हल्ला करतात. त्यांच्याकडे मोठ-मोठी शस्त्रे वा दुसर्‍या गोष्टी ज्या हल्ला करायला वापरल्या जातात, त्या भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा त्या गोष्टी वा मिसाईल दुसर्‍या देशावर टाकतात तेव्हा त्या देशाच्या सामान्य नागरिकांचा मृत्यू होऊन ते संपून जातात. ह्यावेळी मिसाईल टाकणार्‍या देशाकडे माहिती होती पण दुसर्‍या देशाबद्दल प्रेम नव्हते, हे यातून सिद्ध होते.
दुसरीकडे माहितीही तितकीच महत्त्वाची. फक्त प्रेम असले म्हणून त्याच्या साहाय्याने आमचे जीवन फुलेल असे नाही. एका बाजूने आमच्याकडे फार प्रेम आहे पण आमच्याकडे वाचन नाही, माहिती नाही, कुठलाच अभ्यास नाही… तर आमच्या हातून काही वाईट घटना घडण्याची शक्यता आहे. एक साधारण गोष्ट म्हणजे – एके काळी एक लहान पक्षाचे पिलू मोटारिवर आपटले. त्याला खूप दुखापत झाली. त्या मोटारीच्या माणसाने त्याला पाणी पाजलं, खायला घातलं. पण त्या माणसाला हे माहीत नव्हते की किती खायला घालायचं, किती पाणी पाजायचं? ह्या सर्व गोष्टींची माहिती त्याच्याकडे नव्हती. ते खाल्लेलं त्याला पचेल की नाही हे त्याला माहीत नव्हतं. पण त्याला त्या पक्षाबद्दल फार प्रेम वाटत होतं. पण पचन न झाल्याने त्या पिलाने आपला प्राण सोडला.
म्हणजे काय की… इकडे खूप प्रेम आम्हांला दिसून आलं पण त्या माणसाकडे फार माहिती नव्हती आणि त्याच्याकडून अशा तर्‍हेची घटना घडली. ह्यासाठी प्रेमासोबत माहितीही तितकीच महत्त्वाची आहे. कुठलीही गोष्ट कमी किंवा जास्त असणे म्हणजे आम्हांला त्रास.
हे झाले प्रेम आणि माहितीबद्दल, पण ह्याच्याबरोबर आमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे शक्ती. ही शक्ती असणे तितकीच महत्त्वाची गोष्ट. शक्ती म्हणजे आमचे आरोग्य. आमचे आरोग्य चांगले राहणे तितकेच महत्त्वाचे. आमच्याकडे माहिती आहे, प्रेमही आहे पण आरोग्य जर आम्हांला साथ देत नसेल तर आम्ही काहीही करू शकत नाही. माहिती म्हणजे आमच्या बुद्धीचा विकास, प्रेम म्हणजे हृदयाचा विकास आणि शक्ती म्हणजे आमचे आरोग्य. माहिती, शक्ती आणि प्रेम ह्या तिनही गोष्टींचा विकास जर एकसारखा झाला तर जीवन नक्कीच फुलेल… हे लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे.