मास्टर ब्लास्टरचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

मास्टर ब्लास्टर विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा काल शुक्रवारी औपचारिकरीत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) प्रतिष्ठेच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला.

हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला सचिन हा भारताचा सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी बिशन सिंह बेदी (२००़९), कपिल देव (२००९), सुनील गावस्कर (२००९), अनिल कुंबळे (२०१५) आणि राहुल द्रविड (२०१८) यांना हा मान प्राप्त झाला होता. क्रिकेटमध्ये अनेक अनेक विक्रम पादाक्रांत केलेल्या सचिनला क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते. कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके नोंदविण्याचा विक्रमही सचिनच्या नावे आहे. तसेच शतकांचे शतक साजरे करणाराही तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
सचिनसह दक्षिण अफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड, ऑस्ट्रेलियाच्या माजी महिला वेगवान गोलंदाज कॅथरीनसह तीन जणांना शुक्रवारी आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.