‘मासिक पाळी’मध्ये योगासन

‘मासिक पाळी’मध्ये योगासन

  • डॉ. सुरज स. पाटलेकर
    (श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव)

पोटावर/ओटीपोटावर जास्त भार येणारी आसने जसे की पाठ मागे करणे, पुष्कळ वेळ उभे राहणे, शरीर पिळवटणे इतर मासिक पाळीच्या वेळी करू नयेत. विशेषकरून वेदना जर खूप असतील तर कोणतीच आसने नकोत.

मासिक पाळीमध्ये योगासन करावे की नाही हा सध्या एक वादग्रस्त विषय झाला आहे. दुर्दैवाने आपण सारासार विचार करणे कमी करून केवळ प्रसिद्धीच्या तंत्रांना बळी पडत असल्याचा परिणाम. मासिक पाळी हे अतिशय नैसर्गिक पण खूप नाजूक चक्र असते. यात महत्वाचे असते की महिलांनी त्या काळात काळजी घेतली पाहिजे. ज्या काळजी घेत नाहीत त्यांना अनियमित पाळी, कष्टाने पाळी किंवा पाळी न येणे यांसारख्या समस्या भेडसावतात. पाळीवर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य पण अवलंबून असते. म्हणूनच संवेदनशील अश्या ह्या गोष्टीची जाणीवतापूर्वक काळजी घेतली पाहिजे जेणेकरून महिलांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकून राहील.

मात्र सध्या या गोष्टींचा विचार केला जात नाही कारण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करायची हीच गोष्ट विचित्र पद्धतीने भिनलेली असते. काहींच्या मनात अपराधी, नकारार्थी व अस्वच्छतेपणाची भावनादेखील असते. कदाचित ज्या समाजात, परिवारात राहतात त्यामुळे हे असेल. हेदेखील गैरच. मासिक पाळीमधल्या रक्तस्राव वाढलेल्या अवस्थेत ध्यान, अनुलोम-विलोम, उज्जयी, भ्रामरी, शीत्कारी, शीतलीसारखे प्राणायाम मदत करू शकतात; असे काही तज्ज्ञ सांगतात.
जर जास्त त्रासदायक नसेल तर काही योगासने मासिक पाळीमध्ये येणारी वेदना, पाठ दुखणे, रागरंग बदलत राहणे, संतापणे, नैराश्य, चिडचिड व इतर तक्रारी कमी करतात.

उलटे/पालथे निजून करायचे योगासन मासिक पाळीमध्ये करण्यास मात्र मनाई आहे. ह्याचे कारण असे की अपान वायु हा अधोगामी (शरीराच्या खालच्या दिशेला राहणारा व वाहणारा) म्हणजेच मणिपूर चक्र ते मूलाधार चक्र ह्या दिशेने वाहतो. तसेच शीर्षासन/सर्वांगासन सारखे योगासने केल्यामुळे हा अपान वायु जो विटाळ शरीराच्या बाहेर काढणारा असतो तो विरुद्ध दिशेला जातो आणि ह्याच्यामुळे रक्तसंचय होऊन मासिक पाळी अनियमित किवा त्रासदायक होते. रक्तस्राव उलट वाढतो. त्यानंतर भविष्यात पुनरुत्पादन/संततीप्राप्ती संबंधीचा त्रास होऊ शकतो.

पोटावर/ओटीपोटावर जास्त भार येणारी आसने जसे की पाठ मागे करणे, पुष्कळ वेळ उभे राहणे, शरीर पिळवटणे इतर मासिक पाळीच्या वेळी करू नयेत. विशेषकरून वेदना जर खूप असतील तर कोणतीच आसने नकोत. कारण असे केल्यामुळे हे अवयव अधिकच आखडले जातात आणि दाब वाढल्यामुळे वेदना वाढतात. अशा अवस्थेत शारीरिक आणि मानसिक बळ जरुरीचे असते ज्याची कमतरता जाणवते. पॉवर योगा, विज्ञासा अशा गोष्टींची कितीही जाहिरातबाजी झाली तरी त्या करू नयेत. सूर्यनमस्कार, भस्त्रिका, कपालभाती हे शरीराची उष्णता वाढवणारेसुद्धा जास्त रक्तस्राव आणि वेदना असताना न केलेले बरे. सरसकट सांगायचे झाल्यास; पाळीच्या काळात योगासने, प्राणायाम, व्यायाम या गोष्टी वर्ज्य कराव्यात हे आरोग्याच्या दृष्टीने उचित आहे. तरीही शंका वाटत असेल तेथे आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानेच वागावे.