ब्रेकिंग न्यूज़

माविननी राजीनामा द्यावा : कॉंग्रेस

मेरशीचे पंच प्रकाश नाईक यांना संशयास्पदरित्या आलेल्या मृत्युप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी मंत्री माविन गुदिन्हो यांचे बंधू व्हिल्सन गुदिन्हो यांच्याविषयी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे मंत्री गुदिन्हो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.
प्रकाश नाईक यांच्या मृत्यू प्रकरणाची निःष्पक्षपणे चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी माविन गुदिन्हो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे हेच योग्य ठरणार असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश नाईक यांनी मृत्युपूर्वी पाठवलेल्या वॉट्‌सऍप मॅसेजद्वारे व्हिल्सन गुदिन्हो यांचे नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे व्हिल्सन गुदिन्हो यांची चौकशी होण्याची गरज असून ती निःष्पक्षपातीपणे व्हायची असेल तर त्यासाठी पंचायत खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे गिरीश चोडणकर यांनी काल पाठवलेल्या पत्रकातून म्हटले आहे.

पोलीस या प्रकरणी करीत असलेल्या तपासकामावर कॉंग्रेस पक्षाचे लक्ष होते. आता या मृत्यू प्रकरणात मंत्री माविन गुदिन्हो यांचे बंधू व्हिल्सन गुदिन्हो यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाऊ लागले असल्याने आता माविन गुदिन्हो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे हेच शहापणाचे ठरणार असल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे.
माविन गुदिन्हो यांनी एक तर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.