ब्रेकिंग न्यूज़

माया आटली

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा अश्वमेध रोखायचा या एकमेव उद्देशाने एकत्र आलेल्या बसपा – सपा युतीचे अखेर बारा वाजले आहेत. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी पक्षाच्या चिंतन बैठकीनंतर, समाजवादी पक्षाशी गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेली युती संपुष्टात आली असल्याचे काल औपचारिकरीत्या जाहीर केले. अर्थात, हे अपेक्षितच होते, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये या युतीची डाळ काही शिजली नाही. त्यामुळे त्या अपयशाचे खापर एकमेकांवर फोडणे निवडणूक निकालानंतरच सुरू झालेले होते. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील ऐंशीपैकी ६२ जागा भाजपाच्या पारड्यात गेल्या. युती असूनही बसपाला १०, तर सपाला फक्त ५ जागा मिळाल्या. त्यामुळे मायावतींनी या अपयशाचे खापर सपावर फोडून टाकले आहे. खरे तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मायावतींच्या बसपाला उत्तर प्रदेशात भोपळाही फोडता आलेला नव्हता. त्या तुलनेत यावेळी दहा जागा बसपाने जिंकल्या, परंतु याचे थोडे श्रेय सपाला द्यायची त्यांची तयारी नाही. सपाला केवळ पाचच जागा मिळाल्या, यावरून भाजपाच्या विरोधात ज्या आक्रमकपणे काम करायला हवे होते, ते सपा नेत्यांनी केले नाही, त्यामुळेच पराभव वाट्याला आल्याचे मायावतींचे म्हणणे आहे. निवडणुकीपूर्वी आलेले बुआ – भतीजा प्रेमाचे उमाळे एव्हाना आटले आहेत. आपले जुने वैर विसरायला त्या तयार नाहीत. समाजवादी पक्षाने आपल्याविरुद्ध कसे वेळोवेळी षड्‌यंत्र केले. सन २०१२ ते २०१७ या काळात समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशामध्ये सरकार असताना बसपाची गळचेपी कशी केली गेली, राज्यात दलितांवर कसकसा अन्याय केला गेला, आरक्षणाला कसे धुडकावले गेले, कायदा व सुव्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजले वगैरे पाढा मायावतींनी वाचला आहे. पक्षाच्या अडीच तास चाललेल्या चिंतन बैठकीमध्ये अर्धा तास मायावती फक्त सपाविरुद्ध आग ओकत होत्या, यावरून आपल्या भतीजावरील त्यांचे प्रेम कसे आटले ते कळून चुकते. बिगर यादव मागासवर्गीय समाजाची समाजवादी पक्षाने सदैव उपेक्षा केल्याचे मायावती आता म्हणत आहेत. याचा अर्थ अर्थात स्पष्ट आहे. मायावती आपली पारंपरिक मतपेढी पुन्हा आपल्या पाठीशी राहावी यासाठी धडपडू लागल्या आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या अकरा जागांसाठी पोटनिवडणुका व्हायच्या आहेत, त्याची ही तयारी आहे. आपली मतपेढी आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी समाजवादी पक्ष दलित, मुसलमान यांच्याविरुद्ध कसा आहे याचा पाढा त्या आता वाचताना दिसत आहेत. खरे म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी मायावतींनी हातमिळवणी केली होती ती केवळ दिल्लीवर नजर ठेवून. पंतप्रधानपदाचे स्वप्न त्या पाहात होत्या. भाजपाच्या जागा कमी होतील, उत्तर प्रदेशची जनता सपा – बसपाला साथ देईल आणि तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांच्या मदतीने पंतप्रधानपदावर दावेदारी करता येईल असा त्यांचा होरा होता. मायावतींची स्वप्ने धुळीला मिळाली आहेत. खरे तर २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात सपा – बसपाची एकत्रित टक्केवारी भाजपच्या खालोखाल होती. भाजपाला तेव्हा ४३.३ टक्के मते मिळाली होती, तर सपा – बसपाला जागा जरी मिळालेल्या नसल्या तरी त्यांची एकत्रित मते ४२ टक्के होती. त्यातच मध्यंतरी झालेल्या गोरखपूर व फूलपूरच्या पोटनिवडणुकांतील यशाने सपा – बसपा हुरळून गेले होते. पण लोकसभेच्या निवडणुकीत जातीची गणिते कामी आली नाहीत आणि मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाने उत्तर प्रदेश पुन्हा एकदा सर केला. त्यामुळे आता पुन्हा सपाचे लोढणे गळ्यात ठेवणे मायावतींना गरजेचे वाटत नाही. त्यामुळे यापुढील लहान-मोठ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केलेला आहे. बिगर यादव दलित व मुसलमान मतांचे ध्रुवीकरण करण्याचा मायावतींचा सतत प्रयत्न राहिला आहे. गेल्या निवडणुकीतही मुसलमान उमेदवारांना उमेदवारी देऊ नका असे अखिलेश आपल्याला सांगत होते असा दावा मायावतींनी केलेला आहे. पक्षाच्या बैठकीमध्ये दलित नेत्यांनी पक्षाच्या खराब कामगिरीचे अपश्रेय सपाशी केलेल्या हातमिळवणीला दिल्याने पुन्हा एकदा वेगळे होऊन आपल्या पारंपरिक मतपेढीवरच लक्ष केंद्रित करण्याचे मायावतींचे इरादे दिसतात. मायावतींना सपाशी काडीमोड घेताना तो चांगल्या प्रकारे घेता आला असता, परंतु विधानसभा निवडणुकीत सपाशीच दोन हात करायचे आहेत, त्यामुळे पुन्हा त्या सपावर तुटून पडल्या आहेत. समाजवादी पक्षाविषयी जी गरळ मायावती ओकत आहेत, ते पाहता गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी त्या पक्षाशी केलेली हातमिळवणी केवळ मतलबी होती हे सिद्ध होते. जनतेच्या हिताखातर आपण एकत्र आलो होतो असे त्या सांगत असल्या तरी अशा मतलबी राजकारणामध्ये ‘जनहित’ हा नुसता देखावा असतो. स्वार्थ साधण्यासाठी वाट्टेल त्या तडजोडी करायच्या आणि त्या साधल्या नाहीत की वेगळे व्हायचे ही आजच्या राजकारणातील सामान्य रीतच आहे!