ब्रेकिंग न्यूज़

मान, पाठ, कंबर व गुडघेदुखी

  • डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

वर्षा ऋतूमध्ये शरीरबल कमी असल्याने योगासने करावीत. यामध्ये आसनांपैकी पद्मासन, पश्‍चिमोत्तानासन, सर्वांगासन, शलशासन, भुजंगासन, पादहस्तासन, चक्रासन उपयोगी आहेत. त्याचप्रमाणे अनेक आसनांनी युक्त असे ‘सूर्यनमस्कार’ हे शास्त्रशुद्ध पद्धतीनी घातल्यास सर्व प्रकारच्या दुखण्यावर उत्तम उपाय आहे.

कोणत्याही पेनकिलरने दुखणे बरे होत नसते, फक्त तात्पुरता आराम मिळू शकतो व त्याचबरोबर काही दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे वेदनेसाठी स्वतःच्या मनाने कोणतेच औषधोपचार न करता योग्य त्या वैद्यांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार करावेत.

गर्भारपणात व पुढे बाळंतपणात मणक्यांचे व ओटीपोटाचे स्नायू सैल होतात. मग नंतरच्या सहा ते बारा आठवड्यांत हे स्नायू हळुहळू परत घट्ट व्हायला लागतात. या कालावधीत या स्नायूंना योग्य तो आराम व व्यायाम न मिळण्याने कंबरदुखी उद्भवते.

उन्हाळ्याच्या गरमीने, तप्त सूर्याने त्रस्त झालेला जनसमुदाय वर्षा ऋतूच्या आगमनाने सुखावला असला तरी आता सततच्या कोसळणार्‍या पावसाने झोडपला गेलेला माणूस आता परत त्रस्त झालेला आहे, असे काहीसे चित्र सर्वत्र दिसते. सततच्या कोसळणार्‍या पावसाच्या सरींनी वातावरण कोंदट होऊन निरुत्साह दाटलेला आहे. वातावरणातील अधिक प्रमाणाचे शैत्य (थंडी)मुळे वाताचा प्रकोप होताना दिसत आहे. त्याचा दुष्परिणाम म्हणन दवाखान्यात कंबरदुखी, सांधेदुखी, मानदुखी, पाय दुखणे थोडक्यात वेदना हे कारण घेऊन येताना रुग्ण दिसतात. सकाळी दवाखान्यात आल्यावर पाहिले, ३०% तरी पेशंट हे वेदनेने त्रस्त असतात. बाहेरही रुग्णांची आपापसात कुजबूज चाललेली ऐकू येते. काही मानदुखीने तर काही संधीवाताने त्रस्त. यात बरेचसे पस्तीस – चाळीसीतले व त्यापुढचे असतात. बरेच रुग्ण पेनकिलर, स्टिरॉईड, कॅल्शियमचा कोर्स करून आलेले असतात. रुग्णांचीही आपापसात चर्चा असते, पेनकिलरने तात्पुरते बरे वाटते. पण ऍसिडिटीही वाढते व नंतर ‘येरे माझ्या मागल्या’.
या प्रकारच्या वेदना आयुर्वेदिक उपायांनी ससह्य होतील का? मग काय करावे लागेल? ऋतुचर्या पालन, वाताचे शमन, पंचकर्माने शरीरशुद्धी, दुखणे अंगावर काढत बसू नये. स्वतः डॉक्टर बनून पेनकिलर स्वतःच्या मर्जीनुसार हवी तशी, हवी तेवढी व कधीही घेऊ नये. कोणत्याही पेनकिलरने दुखणे बरे होत नसते, फक्त तात्पुरता आराम मिळू शकतो व त्याचबरोबर काही दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे वेदनेसाठी स्वतःच्या मनाने कोणतेच औषधोपचार न करता योग्य त्या वैद्यांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार करावेत.
मानदुखी – मानदुखीचे विशेष म्हणजे मान ही अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजी-आजोबांपर्यंत कुणाचीही दुखू शकते. हे दुखणेही अगदी सौम्य ते जीवघेण्या कळा येईपर्यंत असू शकते. कारणेही वेगवेगळी असतात. मानेचे कुठलेही दुखणे हे मणके, शिरा व स्नायूंवर परिणाम करतात.

मानदुखीची कारणे
– र्झेीींीीरश्र म्हणजे एका विशिष्ट स्थितीत मान बराच वेळपर्यंत राहिल्याने. ज्यांना सारखे खाली वाकून काम करावे लागते, उदाहरणार्थ सध्याचे मुख्य कारण म्हणते सतत कॉम्प्युटरवर काम करणे, लिहिणे, वाचणे, टायपिंग करणे तसेच भरतकाम, शिवणकाम वगैरे. एकाच गटाच्या स्नायूंवर सारखा कामाचा बोजा पडतो व ते थकतात, दुखावतात व मान दुखते.
– ज्या स्नायूंची नियमित हालचाल होत नाही, त्यांना कमी पोषण मिळते व ते दुखू लागतात.
– मणक्यांची झीज. वयाच्या चाळीशीनंतर हाडे ठिसूळ होतात व मानदुखीचे प्रमाण वाढते.
– इजा झाल्यामुळे अथवा मार लागल्यामुळे.
– जंतूंचा प्रादुर्भाव झाल्यामुळेही मानदुखीचा त्रास होऊ शकतो.

पाठ व कंबरदुखी
सर्वसाधारणपणे आढळणारा असा हा आजार आहे. ८०% लोकांना पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास कधी ना कधीतरी होतोच. कधी तो तात्पुरता स्वरुपाचा असतो तर पाच- दहा टक्के लोकांना मात्र त्याचा दीर्घकाळ सामना करावा लागतो व काहीवेळा शस्त्रक्रिया देखील करून घ्यावी लागते.

पाठ व कंबरदुखीची कारणे
– बसण्याची, उभे राहण्याची आणि वाकण्याची चुकीची पद्धत.
– व्यायामाचा अभाव.
– वयोमानानुसार मणक्यांची होणारी झीज.
– ‘ड’ जीवनसत्व, कॅल्शियम यांची कमतरता असणे.
– जास्त वजन उचलणे.
– मानसिक तणाव, व्यवसायिक तणाव उदा. सॉफ्टवेअर इंजिनियर, शिक्षक, खुर्चीवर बसून काम करणारे कर्मचारी.
यात स्त्रीया व कंबरदुखी यांचे नाते अतुट आहे. प्रत्येक तीन स्त्रीयांमध्ये एका स्त्रीला या विकाराचा सामना करावा लागतो.
– गर्भारपणात व पुढे बाळंतपणात मणक्यांचे व ओटीपोटाचे स्नायू सैल होतात. मग नंतरच्या सहा ते बारा आठवड्यांत हे स्नायू हळुहळू परत घट्ट व्हायला लागतात. या कालावधीत या स्नायूंना योग्य तो आराम व व्यायाम न मिळण्याने कंबरदुखी उद्भवते.
– वारंवार गर्भारपण आले, तर स्नायूंना घट्ट होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही व दुखणे अधिक तीव्र व त्रासदायक होते.
– सतत पुढे वाकून केर काढणे, एका जागी मांडी घालून बराचवेळ कपडे धुणे, सारखे उभे राहून काम करणे.
– चाळीस वर्षांच्या सुमारास स्त्रियांमधील इस्ट्रोेजन कमी होते व यामुळे हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाणही कमी होते व तिथे पोकळी निर्माण होते.
– शारीरिक व्यायामाचा अभाव.

गुडघेदुखी
– वयोमानानुसार जशी हाडांची झीज होते, तशाच गुडघ्यातील लवचिक कुर्चा कडक व ठिसूळ बनतात. त्यामुळे किरकोळ स्वरुपाचा मार लागला तरी त्या फाटतात व दुखण्यास सुरवात होते.

गुडघेदुखीची कारणेे
– स्थूलतेचे अफाट वाढणारे प्रमाण.
– गुडघ्यावर अतिव भर टाकणार्‍या क्रिया.
– गुडघ्याची नियमित योग्य प्रमाणात हालचाल न करणे. उदा. महिलावर्ग पूर्ण दिवस उभ्याने काम करतात. ओटा सिस्टम, खुर्ची, कमोड, कार ही संस्कृती झपाट्याने पसरत आहे. म्हणजेच गुडघ्याच्या पूर्ण हालचालींना वाव न मिळणे.
– बसण्याची योग्य ती आसनपद्धती न वापरणे.
– फास्ट फूड, जंक फूड इत्यादी अहितकारक आहार सेवनाने होणारे प्रचंड कुपोषण.
– चुकीच्यावेळी चुकीची व्यायाम पद्धत.
– वार्धक्याची चाहूल म्हणून गुडघेदुखीकडे दुर्लक्ष करणे.
वरील दिलेल्या त्या त्या कारणांनी जरी मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी म्हणजे वेदना उत्पन्न होत असल्या तरी पावसाळ्यात स्वभावतः वाताची वृद्धी होते व योग्य ती काळजी न घेतल्याने, रोगाची कारणे तशीच चालू राहिल्याने हा वात जास्त बळावतो व या ऋतूत दुखण्याने रुग्ण तसेच निरोगी मनुष्यही त्रस्त होतो.

मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखीवर उपचार
कोणत्याही दुखण्यावर विजय मिळवायचा असल्यास प्रथम ज्या ज्या कारणांनी दुखणे सुरू झाले आहे, त्या कारणांचा परिहार करावा. नंतर पंचकर्मांद्वारे शरीरशुद्धी करावी. वेदना या रोगात वाताचे प्रमुख कार्य असल्याने ‘स्नेहनाला’ जे ‘मसाज’ म्हणून प्रचलित आहे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच पंचकर्मांपैकी ‘बस्ती’ हा उपक्रम वाताच्या शमनासाठी वरदानच आहे.

अभ्यंग- अभ्यंग म्हणजे पूर्ण शरीरास तेल लावून, तेल शरीरात जिरवणे. आयुर्वेदाप्रमाणे अभ्यंग ही रोज नित्यकर्मात करावयाची गोष्ट आहे. जसे रथाच्या, गाडीच्या चाकाच्या आसाभोवती सतत तेल सोडावे लागते, तसेच शरीररुपी रथास सांध्यांच्या ठिकाणी नियमित तेल जिरवावे लागते. कोठेही दुखत असल्यास तेथे वातदोष वाढलेला असतो. तैलाभ्यंगामुळे वातदोष कमी होऊन वेदना कमी होतात.
– अस्थीचा संबंध वाताशी आहे. मसाज केल्याने अस्थीधातूतील वाताचे शमन होते. अस्थिंची झीज होत नाही, अस्थिसंधी, मांस व स्नायू यांचे पोषण होते. पर्यायाने शरीराची दृढता वाढते.
– मेद कमी होण्यास मदत होते म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते, व्यायामासाठी ताकद मिळते.
– नेहमी मसाज घेणार्‍यास पाठदुखी, कंबरदुखी, गुडघ्याचे विकार टाळता येतात. हे विकार झालेले असल्यास आंतरस्नेहन व बाह्यतः मसाज करून बरे करता येऊ शकतात.
साधारणतः नियमित मसाजासाठी तिळ तेलाचा वापर करावा. दुखीवर मसाज करण्यासाठी संस्कारीत तिळाच्या तेलाचा वापर करावा. त्यासाठी नारायण तेल, महानारायण तेल, बलांतेल, सहचर तेल, चंदनवसालाक्षादी तेल, विषगर्भ तेलाचा वापर होऊ शकतो.
स्वतःच स्वतःचा मसाज करता येतो. तेल लावण्याची क्रिया ही अनुलोम गती म्हणजे शरीरावरच्या लव (केसांच्या) दिशेने करावी. सांध्यांवर व पोटावर गोलाकार करावी.
– स्नेहानंतर स्वेदन करावे. प्ररंडमूल, रास्ना, दशमूल, निर्गुंडी इत्यादी वातघ्न द्रव्यांच्या क्वाथाचे सहाय्याने नाडी स्वेद करावा.

बस्ति- बस्ति हा उपक्रम वातासाठी वा वातप्रधान दोषांसाठी केला जातो. बस्ती हा अधोमार्गावर कार्यकारी असा उपक्रम. पक्वाशय हे वाताचे विशेष स्थान. या ठिकाणच्या वातावर विजय मिळवला की सर्व शरीरातील वातविकार जिंकता येतात. बस्ती हा अनेकविध औषधी द्रव्यांच्या संयोगाने दोषांचे शोधन करतो तसेच शमनही करतो.
– वर्षा ऋतूमध्ये वाढलेल्या वाताचे शोधन करण्यासाठी वैद्याच्या सल्ल्याने निरुह – अनुवासन बस्ती उपक्रम करून घ्यावा.
– वर्षा ऋतूमध्ये रोज स्नेह बस्ती घेण्यानेही खूप फायदा होतो.

पादाभ्यंग- पायांच्या तळव्यांना संस्कारीत तेल किंवा तूप लावून चोळणे. चोळण्यासाठी काश्याची वाटी वापरल्यास उत्तम. याने पायांच्या टाचा दुखणे तसेच पाय दुखणे आदी लक्षणे नाहीशी होतात.

कटिबस्ति, जानुबस्ति
ही स्थानिक चिकित्सा आहे. यामध्ये उडीदाच्या पीठाचे एक पाळे करून ते पाळे गुडघ्यावर किंवा कंबरेवर गोलाकार तयार केले जाते. हे पाळे साधारण २ अंगुल उंच असते. या पाळ्यामुळे तयार झालेल्या खोलगट भागामध्ये सुखोष्ण सिद्धतैल घातले जाते.

विविध औषधी कल्प
औषधांमध्ये गुग्गुळ कल्प हे महत्त्वाचे आहेत. गुग्गुळ हे उत्तम वातघ्न आहेत.
– रास्ना, दशमूल, एरंडमूल, गुडूची, अल्लानक, कारस्कर, वत्सनाभ, त्रिकडू, त्रिफला ही उत्तम वातघ्न द्रव्ये आहेत.
कल्पामध्ये योगराज, गुग्गुळ, कैशोर गुग्गुळ, अमृतागुग्गुळ, रास्ना गुग्गुळ, सिंहनार गुग्गुळ, महारास्नादि काढा, दशमूलांचा काढा, हिंगाष्टक चूर्ण, वातविध्वंस आदी महत्त्वाचे कल्प आहेत. हे कल्प आयुर्वेदतज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावेत.

आहारामध्ये पथ्य व अपथ्य
पथ्य- गहू, तांदूळ, मूग, तूर, कुळीथ, मसूर, मटकी, ज्वारी.
दूधी भोपळा, तोंडली, भेंडी, पडवळ, कोहळा.
दूध, तूप, लोणी.
आले, लसूण, हिंग, सूंठ, दालचिनी, तमालपत्र, मिरी, लवंग.
– सगळ्यात पथ्यकर म्हणजे गरम पाणी.
– रोज आहारात साजूक तुपाचा समावेश करावा.
– चपाती किंवा भाकरीचे पीठ मळताना एक चमचा एरंडेल तेलाचे मोहन टाकावे. गरम असतानाच ती चपाती किंवा भाकरी खावी.

अपथ्यकर- चवळी, वाल, वाटाणा, पावटे, छोले, मटार, गवार, कारले, चिंच, आंबट दही, कोल्ड्रिंग, इडली-डोसा, आंबलेले पदार्थ, फ्रिजमधील पदार्थ, शिळे अन्न.
– दिवसा झोपणे, रात्री जागरण, अतिव्यायाम किंवा अजिबात व्यायाम न करणे यानेही वातवृद्धी होऊन त्रास वाढतो.
मानेचे दुखणे, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखीवर पूर्ण उपचार- योगविद्या.
– औषधोपचाराबरोबर पन्नास टक्के दुखणे हे योग्य पद्धतीच्या व्यायामाने किंवा योगासनाने बरे होतात.
– योगविद्या ही शरीर, मन व बुद्धी या सर्व स्तरांवर कार्य करत असल्याने ही परीपूर्ण चिकित्सा होय.
तसेच वर्षा ऋतूमध्ये शरीरबल कमी असल्याने योगासने करावीत. यामध्ये आसनांपैकी पद्मासन, पश्‍चिमोत्तानासन, सर्वांगासन, शलशासन, भुजंगासन, पादहस्तासन, चक्रासन उपयोगी आहेत. त्याचप्रमाणे अनेक आसनांनी युक्त असे ‘सूर्यनमस्कार’ हे शास्त्रशुद्ध पद्धतीनी घातल्यास सर्व प्रकारच्या दुखण्यावर उत्तम उपाय आहे.
बौद्धिक व मानसिक ताणतणावाबरोबरच दुखणे असल्यास ध्यानधारणा, शवासन यांसारखे दुसरे औषध नाही.