मानवी त्वचेची रचना

मानवी त्वचेची रचना

  • डॉ. अनुपमा कुडचडकर
    त्वचारोग तज्ज्ञ (हेल्थवे हॉ. ओल्ड गोवा)

तळहातावरची व तळपायाची त्वचा इतर अवयवांवरील त्वचेपेक्षा जाड असते. त्यामुळे हातांनी कुठलीही कामं करता येतात आणि पायांनी कितीही आणि कुठेही चालता येतं.

‘त्वचा’ हा आपल्या शरीराचा सर्वांत मोठा अवयव असून त्वचा हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही, कारण शरीरात होणार्‍या कित्येक आजारांचा परिणाम त्वचेवर दिसून येत असतो. त्वचेमुळे शरीरातले संपूर्ण अवयव सुरक्षित रीतीने झाकलेले असतात. आपली त्वचा हा एकमेव अवयव असा आहे की जो आपल्या शरीराचे हवेत होणार्‍या बदलांपासून, तसेच जंतू-केमिकल्स- किटाणूंपासून आपल्या शरीराला संरक्षण देतो. त्वचेचे सर्वांत मोठे कार्य आहे सुरक्षितता.

त्वचेचे एकावर एक असे सात थर असतात. हे थर दर महिन्याला वर-वर येत असतात आणि वरचे थर आपोआप निघून जाऊन खालचे थर वर येतात. त्यामुळे त्वचा निरोगी राहते. या थरांमुळे त्वचेतून जंतु वा किटाणु शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. कधी शरीराला इजा झालीच तर मग या थरांना दुखापत होऊन जंतूंना आत प्रवेश करायला सोपं जातं आणि तेव्हा त्वचेवर इन्फेक्शन होऊ शकतं. त्वचेवर बारीक छिद्र असतात. केसांच्या छिद्रांमधून केस बाहेर येतात. घाम येणार्‍या छिद्रांमधून त्वचेखाली असलेल्या घामाच्या ग्रंथींमध्ये तयार होणारा घाम बाहेर येतो. गरमीच्या दिवसात शरीराचे तापमान वाढू नये म्हणून घामाच्या ग्रंथी सतत त्वचेवर घाम आणत असतात. त्यामुळे शरीराचे तापमान वाढत नाही. थंडीच्या दिवसात थंडी वाजून शरीराचं तापमान वाढतं. अशा प्रकारे त्वचा आपल्या शरीराचं तापमान बाहेरच्या बदलत्या तापमानाशी संतुलन राखून ठेवते.

आपली त्वचा ड-जीवनसत्व तयार करते. जेव्हा आपण उन्हात बसतो त्यावेळी त्वचेमध्ये हे विटामिन-डी तयार होत असतं. हल्लीचे तरुण-तरुणी उन्हात जास्त जात नसल्याने कित्येकांना विटामीन-डीची कमतरता होते. त्यामुळे त्यांची हाडं दुखायला लागतात आणि ऑस्टिओपोरोसिसमुळे मग त्यांची हाडं ठिसूळ होऊ शकतात. म्हणूनच रोज सकाळी सात ते दहावाजेपर्यंत येणारी सूर्यकिरणं काही वेळ नियमितपणे त्वचेवर घ्यावीत. त्वचा आपल्या शरीराचं कडक सूर्यकिरणांपासून रक्षणही करते.

त्वचेचे दोन भाग असतात- वरचा भाग- त्याला ‘एपिडरमीस’ म्हणतात. त्यामध्ये त्वचेचे सात थर असतात. त्यांची रचना एकदम घट्ट असते. त्यामुळे त्वचेमध्ये जंतू सहजासहजी आत शिरू शकत नाहीत. हे थर प्रथिनांचे बनलेले असतात. त्वचेवर येणारा तेलकट पदार्थ ज्याला आपण ‘सीबम्’ म्हणतो तो त्वचेमध्ये असलेल्या तेलाच्या ग्रंथींद्वारे तयार केला जातो. या तेलाच्या थरामुळे त्वचा मऊ व मुलायम असते. त्वचेच्या खालच्या भागाला ‘डरमीस’ म्हणतात. या भागामध्ये घामाच्या ग्रंथी, तेलाच्या ग्रंथी, केसांची मुळं, रक्तवाहिन्या, मज्जातंतू इ.चा समावेश होतो.

केसांच्या मुळांमधून केसांची वाढ होत असते. डोक्यावरचे केस जाड, मजबूत व लांब असतात. शरीरातील इतर भागांवरचे केस छोटे व नाजूक असतात. त्वचेमध्ये मेलॅनोसाईट्‌स नावाच्या पेशी असतात. त्वचेला रंग देण्याचे काम या पेशी करतात. ज्यांच्या त्वचेमध्ये या पेशींचे प्रमाण जास्त त्यांच्या त्वचेचा रंग जरा गडद असतो. उन्हात गेल्यावर या पेशी रंग जास्त प्रमाणात तयार करतात. त्यामुळे त्वचेचा रंग जरा काळसर होतो. त्वचेखाली इलास्टिक आणि कोलॅजन नावाचा तंतू असतो ज्यामुळे त्वचा कडक राहते. जेव्हा हे तंतू नाजुक होतात तेव्हा त्वचेवर सुरकुत्या दिसायला लागतात. तळहातावरची व तळपायाची त्वचा इतर अवयवांवरील त्वचेपेक्षा जाड असते. त्यामुळे हातांनी कुठलीही कामं करता येतात आणि पायांनी कितीही आणि कुठेही चालता येतं.

त्वचेच्या प्रत्येक भागाची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. त्वचेच्या कुठल्याही भागाचं काम बदललं किंवा बिघडलं तर त्वचेचे आजार सुरू व्हायला वेळ लागत नाही.