ब्रेकिंग न्यूज़

मानकुराद लागवडीचे प्रमाण राज्यात वाढविणार ः सरदेसाई

गोव्यातील प्रसिद्ध मानकुराद आंब्याचे पीक वाढवण्याची गरज असून त्यासाठी कृषी खाते राज्यभरात मोठ्या प्रमाणात मानकुराद आंब्याची लागवड करणार असल्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी काल मडगाव येथे सांगितले. काल जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मडगाव रवींद्र भवन येथे मानकुराद आंब्यांच्या कलमांची लागवड केल्यानंतर ते बोलत होते.

सध्या गोव्यात मानकुराद आंब्याचे पीक फारच कमी येत आहे. त्यामुळे गोमंतकीयांना सिंधुदुर्गातून येणार्‍या मानकुराद आंब्यावर अवलंबून रहावे लागत असल्याचे ते म्हणाले. बाहेरून येणार्‍या मानकुराद आंबा पिकवण्यासाठी रसायनाचा वापर करण्यात येत असतो, असे सरदेसाई म्हणाले. कृषी खात्यातर्फे आम्ही राज्यात मानकुराद आंब्याचे पीक वाढवण्यासाठी प्रयत्नरत असून त्यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणात मानकुराद आंब्यांच्या कलमांची लागवड केली जाईल. ही झाडे लावल्याने पर्यावरणालाही त्याचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.