ब्रेकिंग न्यूज़
माओवाद्यांशी संबंधांवरून महाराष्ट्र पोलिसांचे ५ राज्यांत अटकसत्र
Hyderabad: Revolutionary writer P Varavara Rao after a medical chek-up following his arrest by the Pune police in connection with the Bhima Koregaon case, in Hyderabad on Tuesday, Aug 26, 2018. (PTI Photo) (PTI8_28_2018_000173B)

माओवाद्यांशी संबंधांवरून महाराष्ट्र पोलिसांचे ५ राज्यांत अटकसत्र

>> गोव्यातही एकाच्या घराची झडती ः पंतप्रधान मोदींच्या हत्या कटाशी संबंधांचा संशय

माओवाद्यांशी संबंध असल्याचा संशय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माओवादी हत्या करणार असल्याच्या दाव्याच्या आधारावर काल पुणे पोलिसांनी पाच राज्यांमध्ये संबंधित संशयितांच्या ठिकाणांवर छापे मारून तेलगुतील सुप्रसिद्ध कवी पी. वरावर राव, गौतम नवलखा, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, अनू भारद्वाज यांच्यासह काही अन्य कार्यकर्त्यांना अटक केली. या प्रकरणी गोव्यातही साखळी येथील गोवा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये सेवेत असलेल्या आनंद तेलतुंबडे यांच्या निवासस्थानाचीही पोलिसांनी झडती घेतली. मात्र तेलतुंबडे पोलिसांना सापडले नाहीत. सर्व संशयितांना स्थानिक न्यायालयांनी पोलीस कोठडी दिली असून नंतर त्यांना पुणे पोलिसांकडे दिले जाणार आहे. माओवाद्यांचा राजीव गांधी यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट होता असा पोलिसांचा दावा आहे.

दरम्यान, भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून त्यांच्याशी संबंधित हे अटकसत्र असल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणे असल्याचे वृत्त आहे.
पुणे येथून पी. वरावर आंना अटक केल्यानंतर त्यांच्या हैदराबाद येथील घरावरही पोलिसांनी छापा मारला. अनू नवलखा यांना दिल्लीत अटक करून त्यांना साकेत न्यायालयासमोर उभे करण्यात आले. त्यांना नंतर महाराष्ट्र पोलिसांच्या हवाली करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नवलखा यांच्या घरातून बॅग, लॅपटॉप व काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

सरकारविरोधी भूमिकेमुळे
अटक ः परेरा
वकील असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना फरिदाबाद येथे अटक करण्यात आली असून पुणे पोलिसांनी त्यांना तेथील न्यायालयासमोर उपस्थित केले. भारद्वाज यांच्या बदरपूर येथील घरावरही छापा मारण्यात आला. त्यांच्या मुलीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरुण परेरा यांना पुण्यातून अटक करण्यात आली असून त्यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. आपण काही प्रकरणांमध्ये सरकारविरोधात काम केल्याने आपल्याला अटक केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच पोलिसांची ही कृती म्हणजे मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचे ते म्हणाले.
व्हर्नोन गोन्साल्विस यांना मुंबई येथे तर स्टॉन स्वामी यांना झारखंडमध्ये रांची येथे अटक करण्यात आली आहे. पुणे येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजिलेल्या एल्गार परिषदेसंदर्भातील माओवादी कार्यकर्त्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या परिषदेमुळेच भीमा कोरेगाव दंगल घडल्याचा आरोप आहे. तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रमाणेच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचाही माओवाद्यांचा कट होता असा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे या अटकांमुळे या कटाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या अटक सत्राविषयी पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

एप्रिलमध्येही कारवाई
दरम्यान, पुणे पोलिसांनी गेल्या एप्रिलमध्येही मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली येथे छापे टाकून नक्षली साहित्य ताब्यात घेतले होते. तसेच नंतर संबंधितांनाही अटकही झाली होती.

माहिती देण्यास पोलिससांचा नकार
या माओवाद्यांना त्यांच्या बेकायदेशीर नक्षली कारवायांशी संबंधित असल्याच्या कारणावरून संबंधित कायद्याखाली अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र याविषयी तपशील सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.

पत्रातील नावामुळे
वरावर यांना अटक
गेल्या जूनमध्ये एल्गार परिषदेशी संबंधित ५ जणांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडील पत्रात वरावर राव यांचे नाव आढळले होते असा दावा पोलिसांनी केला आहे. राव यांना त्यांच्या हैदराबादमधील घरातून अटक करण्यात आली. त्या आधी त्यांच्या दोन मुलींच्या घरांचीही झडती घेण्यात आली. तसेच एका पत्रकाराच्या घराचीही झडती घेण्यात आली. हैदराबादचे पोलीस उपायुक्त विश्‍वप्रसाद यांनी पुणे पोलिसांच्या या कारवाईला दुजोरी दिला. स्थानिक पोलिसांनी या कारवाईसाठी पुणे पोलिसांना सहकार्य केल्याचे सांगितले.

दरम्यान, गेल्या २ ऑगस्ट रोजी पुण्याचे तत्कालीन संयुक्त पोलीस आयुक्त रविंद्र कदम यांनी भीमा कोरेगाव दंगलीशी कोणतेही माओवादी संबंध असल्याचे आढळून आले नसल्याची माहिती दिली होती.

अटकांचा अनेकांकडून निषेध
नामवंत वकील प्रशांत भूषण यांनी या अटकांमुळे देशातील सत्ताधार्‍यांची हुकुमशाही प्रवृत्ती उघड झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा प्रकार म्हणजे आणीबाणी घोषित झाल्यासारखाच आहे. आपल्या हक्कांसाठी सरकारविरोधात बोलणार्‍या सर्वांच्याच मागे सत्ताधारी लागले आहेत असे भूषण यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप
करावा ः रामचंद्र गुहा
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या अशा कारवायांमुळे याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी प्रतिक्रिया नामवंत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी दिली आहे.

आणिबाणी लागू
होणार ः अरुंधती रॉय
सुप्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी याप्रकरणी निषेध करताना देशात आता आणिबाणी लागू होणार अशी टिप्पणी केली. भाकपचे नेते प्रकाश करात यांनीही याप्रकरणी निषेध केला आहे.

नवलखांना आजपर्यंत
दिल्लीबाहेर न नेण्याचा आदेश
नवलखा यांना दिल्लीत काल दुपारी त्यांच्या घरी अटक करण्यात आली असली तरी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना किमान बुधवारपर्यंत दिल्लीबाहेर नेण्यात येऊ नये असा आदेश दिला आहे. नवलखा यांच्यावतीने त्यांच्या वकील वारिशा फरसात यांनी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली असून त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने हा आदेश दिला.

प्रा. तेलतुंबडेंच्या साखळीतील
खोलीवर पोलिसांचा छापा

पुणे पोलिसांच्या एका पथकाने माओवाद्यांचे समर्थक असल्याच्या संशयातून साखळी येथील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या साखळी येथील खोलीवर काल सकाळी छापा घातला. प्रा. तेलतुंबडे खोलीवर सापडू शकले नाहीत. त्यांच्या खोलीला कुलूप असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलीस पथकाने खोलीचे कुलूप उघडून आत प्रवेश करून खोलीची झडती घेतली, अशी माहिती डिचोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय दळवी यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव प्रकरण, माओवाद्यांचे समर्थक असल्याच्या संशयावरून देशभरात विविध ठिकाणी काल एकाच वेळी छापे घातले. त्यात प्रा. तेलतुंबडे यांच्या नावाचा समावेश आहे. पुणे पोलिसांनी काही कागदपत्रे व इतर साहित्य ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये दोन वर्षांपासून प्रा. तेलतुंबडे डेटा एनालिसिस हा विषय शिकवतात. सोमवारी संध्याकाळी प्रा. तेलतुंबडे मुंबईला रवाना झाले. त्यामुळे पुणे पोलिसांच्या पथकाला सापडू शकले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुणे पोलिसांच्या गुन्हा विभागाचे अधिकारी निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पुणे पोलिसांच्या पथकाला डिचोली पोलिसांनी साहाय्य केले.