ब्रेकिंग न्यूज़

मांसाहार आणि आयुर्वेद

  • डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

गरम हवामानात खूप वेळ मांस तसेच राहिले तर ते कुजू लागते व अशा मांसाशनापासून उलटी, अतिसार, प्रवाहिका, शीतपित्त, ज्वर व्याधी होण्याची शक्यता असते. डुक्कर, बैल यांच्या शरीरात टीनिया या जातीचा कृमी किंवा सिस्ट असू शकतात. असे मांस नीट न शिजवता खाल्ल्यास मनुष्याला कृमीरोग उत्पन्न होऊ शकतो.

आहारपद्धतीमध्ये मांसाहार व शाकाहार असे प्रमुख दोन वर्ग आहेत. मांसाहारी वर्गातील लोक अन्य मांसाहारी प्राण्याप्रमाणे केवळ मांसाहार करत नाहीत तर शाकाहारही सेवन करतात. भारताखेरीज जगातल्या अन्य राष्ट्रांमधील लोक बहुदा मांसाहारीच आहेत. भारतात मात्र काही समाज केवळ शाकाहारच सेवन करणारा आहे. शरीर पोषणाच्या दृष्टिकोनातून आयुर्वेदाने मांसाहाराचे महत्त्व नाकारलेले नाही. बर्‍याच जणांचा समज आहे की आयुर्वेदामध्ये फक्त शाकाहाराचेच महत्त्व सांगितलेले आहे किंवा शाकाहार अन्नच सेवन करायला सांगितले आहे. पण तसे नाही.

कोणतेही द्रव्य शरीरावर काय परिणाम करील हे ठरवताना आयुर्वेदाने त्या द्रव्याचा, रस-वीर्य-विपाक-प्रभाव, त्यामध्ये असणारे गुरू, लघु आदी गुणांचे सामान्य-विशेष सिद्धांतानुसार परीक्षण करून त्या द्रव्यांचे वर्णन केले आहे. आहार घटकांच्या संदर्भात सामान्य – विशेष ठरविण्यासाठी त्यांचे पृथःकरण करून अर्वाचीन शास्त्राने काढलेले निष्कर्ष (द्रव्यामधील प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्धत्व, खनिजे, व्हिटामिन इत्यादी) हे आयुर्वेदीय सामान्य-विशेष सिद्धान्ताला उपबृहक होय. मात्र त्याचबरोबर या घटकांचा शरीरावर होणारा परिणाम ठरविण्यासाठी व्यक्तीची पचनशख्ती – शरीराची गरज सात्म्यासात्म्य याचा विचार करणे अत्यंत आवश्यक ठरते.

मांसाहार ः
* शरीर पुष्ट करण्यासाठी मांसाहारासारखे दुसरे अन्य कोणतेच साधन नाही. प्रत्यक्ष मांसापेक्षा मांसरस मनाला आनंद देणारा, बृहण, बलवर्धन करणारा आहे.
* कृश मनुष्याला, रोगातून बरा झालेल्याला, शुक्रक्षय झालेल्याला आणि बल, वर्ण चांगला होण्यासाठी मांसरस हा अमृताप्रमाणे कार्य करतो.
* मांसरसाच्या नित्य सेवनाने स्वर चांगला होतो.
* बुद्धी तीव्र होऊन सर्व इंद्रियांचे बल सुधारते आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते.
प्रकार – आयुर्वेदामध्ये मांसवर्गातील प्राण्यांचे ८ प्रमुख प्रकारात वर्णन केलेले आहे.
१) मृग ः हरीण जाती – निरनिराळी हरणे उदा. सांबर, कुरंग, इ.
२) विष्किर ः जमीन विस्कटून खाणारे प्राणी उदा. कोंबडा, लावा इ.
३) प्रतुदपक्षी ः चोचीने टोचून खाणारे पक्षी उदा. कबुतर इ.
४) बिलेशय ः बिळात राहणारे प्राणी. उदा. मुंगुस इ.
५) प्रसह प्राणी व पक्षी ः खाद्य ओढून घेऊन खाणारे उदा. गाय, गाढव, कुत्रा, कावळा, सिंह, घोडा इ.
६) महामृग ः गवा, रेडा इ. मोठे प्राणी
७) जलचर पक्षी ः पाण्यात राहणारे हंस, बगळा इ.
८) जलचर प्राणी – कासव, खेकडा, मासे इ.

जांगल मांस ः
यापैकी मृग, विष्किर, प्रतुद या प्रकारातील प्राणी जांगल वर्गातील आहेत. त्यामुळे त्यांचे मांस पचायला लघु, धातुवर्धक, वृष्य, अग्निदीपन करणारे व किंचित वाच-पित्तकर आहेत.
सामान्यतः या वर्गातील प्राणी व पक्षी खूप चपळ असतात. इकडे-तिकडे खूप हिंडतात व रुक्ष हलके धान्य खातात.
आजकाल ब्रॉयलर या प्रकारचे जे चिकन मिळते त्या कोंबड्यांना खुराड्यात कोंडून ठेवले जाते. उन्हा-पावसात हिंडूफिरूही देत नाहीत, त्यामुळे त्यांचे मांस व अशा कोंबड्यांची अंडी आमदोष निर्माण करणारी तयार होतात. या प्रकारच्या आहाराने योग्य पोषण होत नाही.

आनूप मांस ः
* महामृग, जलचर पक्षी व जलचर प्राणी हे आनूप देशात सापडतात. त्यामुळे त्यांचे मांस स्निग्ध, गुरू, मांसपुष्टी करणारे व कफप्रकोप करणारे असते.
* बिलेशय व प्रसह पक्षी, प्राणी साधारण देशात सापडतात. त्या प्राण्यांचे मांस कोणत्या दोषाचा प्रकोप करते हे त्या त्या प्राण्यांच्या आहार-विहार यावर अवलंबून असते.
* पाण्यातील किंवा समुद्रातील मासे निरनिराळ्या प्रकारचे शेवाळे, वनस्पती खाऊन जगतात. म्हणूनच मासे सेवन केल्याने धातुसौष्ठव वाढीला मदत होत नाही. उलट मासे खाल्ल्याने शरीरात किट्टनिर्मिती अधिक प्रमाणात होते, म्हणून अतिप्रमाणात मासे सेवन केल्यास कुष्ठासारखे व्याधी उत्पन्न होतात.
* कोशस्थ प्राण्यांचे मांस – शंख, शिंपी यातील प्राण्यांचे मांस मधुर, शीत, स्निग्ध, शुक्रकर, वृण्य, बल्य असून वातपित्तकर आहे.
* बिलेशय मांस – गोधा इत्यादी मांस मधुर, धातुवर्धक, मलावष्टंभकर, मूत्रशोषक, उष्णवीर्य व म्हणून पित्तकर आहे. हे मांस तमकश्‍वास, कास व वात यावर उपयोगी आहे.

योग्य मांस ः
नुकत्याच मारलेल्या प्राण्याचे शुद्ध, ताजे मांस खावे.
मृग मांसामध्ये ऐण जातीच्या हरणाचे; पक्षीमांसामध्ये लावा पक्षी; बिलेशय मांसामध्ये गोधा मांस; मत्स्य मांसामध्ये रोहित, आनूप वसामध्ये चुलुकी वसा, अश्‍व, कुरंग, कपोत, तित्तीर यांचेही मांस श्रेष्ठ आहे.
अयोग्य मांस ः
खूप वाळलेले, नासलेले, रोगाने पीडित-विषारी द्रव्ये खाल्ल्याने व सर्पदंशाने मेलेल्या प्राण्याचे मांस, विषारी पदार्थांनी दूषित झालेले, शस्त्राने मारलेल्या प्राण्याचे मांस खूप वेळ झाल्यानंतर खाऊ नये.
तसेच अतिवृद्ध, अतिकृश, अत्यंत लहान व अयोग्य आहारावर पोषण केलेल्या प्राण्यांचे मांस खाऊ नये.
याखेरीज प्राण्यांना जर राजयक्ष्मा ऍक्टिनोमायकोसिस किंवा फंगस, डिस्टोमम हेपॅटिकम किंवा लिव्हर फ्लू हे रोग झाले असल्यास त्यांचे मांस खाऊ नये.
जो प्राणी रोगी असेल त्यामध्ये पुढील लक्षणे दिसतात….
– असा पशू हळुहळू चालतो. त्याची त्वचा निःसत्व, रुक्ष, डोळे शुष्क व मलीन असतात. त्याचा श्‍वासोच्छ्वास कष्टाने चालतो. त्याला ज्वर असल्यास कान, पाय व स्तन गरम असतात. त्याचा राजयक्ष्मा झाला असल्यास त्याच्या मानेजवळच पोटात गाठी होतात. त्याची जीभ रुक्ष, भेगा पडलेली, फार लाळ येणारी असते. अशा पशुचे मांस सेवन करू नये.

वाळलेले शुष्क मांस खाल्ल्याने अरुची, प्रतिश्याय, विषदूषित किंवा रोगाने पीडित मांससेवनाने मृत्यू येतो. अगदी लहान वयाच्या प्राण्यांच्या मांससेवनाने उलट्या होतात. अतिवृद्ध प्राण्यांच्या मांससेवनाने सर्दी, खोकला, दमा होतो. मांस पचपचीत असेल तर उत्क्लेश होतो.
मांसाचे गुण ः
– शाकाहारी प्राण्यांच्या मांसापेक्षा मांसाहारी प्राण्यांचे मांस पचनाला हलके असते व म्हणूनच राजयक्ष्मासारख्या व्याधीमध्ये असे मांस देण्यास सांगितले आहे.
– मोकळ्या जागेत हिंडणार्‍या प्राण्यांचे मांस हलके असते; तर ठाणबंद प्राण्यांचे मांस पचायला जड व अभिष्यंदी असते.
– मांडी, डोके, खांदा येथील मांस क्रमाने अधिकाधिक गुरू असते.
– मादीचे मांस लघु व नराचे गुरू असते.
– संस्कारामुळे लघु मांसही गुरू किंवा गुरू मांसही लघू बनवता येते.
– अग्निबलाचा विचार करून मांसाहाराची मात्रा ठरवावी.
मांसामध्ये प्रथिने, स्नेह, लवण, जल असते तसेच त्यात लोह, पोटॅशियम आणि फॉस्फरस ही खनिजे असतात.
गाय – प्रथिने – २१.४, चरबी – ५.२.
बकरी – प्रथिने – १७.११, चरबी – ५.७७
डुक्कर – प्रथिने – १४.५, चरबी – २०.०८
कोंबडी – प्रथिने १९.७२, चरबी – १.४२

मांसोत्पन्न व्याधी ः
– गरम हवामानात खूप वेळ मांस तसेच राहिले तर ते कुजू लागते व अशा मांसाशनापासून उलटी, अतिसार, प्रवाहिका, शीतपित्त, ज्वर व्याधी होण्याची शक्यता असते.
– डुक्कर, बैल यांच्या शरीरात टीनिया या जातीचा कृमी किंवा सिस्ट असू शकतात. असे मांस नीट न शिजवता खाल्ल्यास मनुष्याला कृमीरोग उत्पन्न होऊ शकतो.
– याशिवाय सालमोनेला किंवा बॅसिलस बोटुलिनम् या कृमींनी मांस विषारी होऊ शकते. असे विषयुक्त मांस सेवन केल्यास सर्दी, अतिसार, विसूचिका, क्वचित मृत्यूदेखील येऊ शकतो.
हे टाळण्यासाठी कोणत्याही प्राण्यापासून मांस मिळविण्यासाठी त्याची हत्या करण्यापूर्वी पशुपरीक्षण व निरीक्षण करावे.