महिला नूतन हायस्कूलला अजिंक्यपद

रिजुल पाठकने १५ चौकार व एका षटकाराच्या ७० चेंडूत ९२ धावांच्या जोरावर तसेच सार्थक देसाईने ३२ धावात ४ बळींच्या बळावर दक्षिण गोवा विभाग विजेत्या महिला नूतन हायस्कूलने उत्तर गोवा विजेत्या शारदा मंदिरचा ३६ धावांनी पराभूत गोवा क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या १४ वर्षाखालील अध्यक्षीय करंडक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

कांपाल साग मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात महिला नूतन हायस्कूलने प्रथम फलंदाजी करीत ४० षटकांत ८ गडी बाद २३६ धावा केल्या. त्यात रिजुल पाठक ९२, श्रीधर केणी ३२, प्रफुल्ल घाडगे १४, विस्मय फळगावकरने ११ धावा केल्या. शारदा मंदिरच्या निहान खवंटेने ४५ धावांत ३ तर मानस केळुसकर, अक्षत जैन, आदिराज गावणेकरने प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना शारदा मंदिरचा डाव ३९.५ षटकांत २०० धावांत कोसळला. त्याच्या अथर्व सराफने सर्वाधिक ८२ धावा केल्या. तर निहान खवंटे ४४ व आदिराज गावणेकरने १२ धावांचे योगदान दिले. महिला नूतन हायस्कूलच्या सार्थक देसाईने ३२ धावांत ४, प्रफुल्ल घाडगेने ३७ धावांत ३ तर रिजुल पाठक व समर्थ राणेने प्रत्येकी एक गडी बाद केला. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज स्मिथ दळवी, अष्टपैलू नेहान खवंटे ( दोन्ही शारदा मंदिर), उत्कृष्ट गोलंदाज प्रफुल्ल घाडगे, सामनावीर रिजुल पाठक ( दोन्ही महिला नूतन) यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.