महिलांना रात्रपाळीवर काम करण्यास मान्यता

महिलांना रात्रपाळीवर काम करण्यास मान्यता

>> मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

>> पावसाळी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक

राज्यातील महिलांना रात्रपाळीला काम करता यावे यासाठी कारखानेविषयक कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती घडवून आणण्याच्या प्रस्तावाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या दुरुस्तीनुसार महिलांना रात्री ७ ते सकाळी ६ ह्या शिफ्टमध्ये काम करता येईल. मात्र, त्यासाठी रात्रपाळीत काम करणार्‍या महिलांना आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची अट असेल, असे काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री व कारखाने आणि बाष्पक खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची तिसरी बैठक काल बुधवारी पार पडली. त्यावेळी कारखाने कायद्यात दुरुस्ती करण्यावर निर्णय झाला. वरील दुरुस्तीनुसार आठवड्याचे कामकाजाचे तास ६० वरून ७२ असे वाढण्यात येतील. तसेच तीन महिन्यांच्या काळातील ओव्हर टाईमचे तास ७५ तासांवरून १२५ तास असे वाढवण्यात येणार असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. जास्त तासांद्वारे कारखान्यातील उत्पादन वाढावे या उद्देशाने ही दुरुस्ती करण्याचा निर्णय सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे, असे सरदेसाई म्हणाले.

पावसाळी अधिवेशनात
दुरुस्ती विधेयक येणार
विधानसभेच्या येत्या अधिवेशनात दुरुस्ती विधेयक येणार आहे. कारखाने कायद्याचे कलम ६६ दुरुस्त केले जाईल. पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून सुरू होणार आहे. सध्या उद्योगांमध्ये रात्रीच्यावेळी महिलांसाठी शिफ्ट नाही. विधानसभेत दुरुस्ती विधेयक संमत होऊन त्यासंबंधीची अधिसूचना जारी झाल्यानंतर महिलांना रात्रपाळीवर काम करण्यास मिळणार आहे. मात्र, महिलांना रात्रीच्यावेळी काम करण्यास अनुमती देण्यापूर्वी संबंधित उद्योगाकडे वाहतूक व्यवस्था व अन्य सुविधा आहेत की नाही हे कारखाने व बाष्पक निरीक्षकालय तपासून पाहणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
कारखान्यांचे उत्पादन वाढल्यास ह्या कारखान्यांना ऊर्जितावस्था प्राप्त होणार असून त्याद्वारे सर्वांचाच फायदा होणार असल्याचे सरदेसाई यांनी यावेळी नमूद केले. त्याशिवाय त्याद्वारे ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ हे उद्दिष्टही साध्य होणार असल्याचे मंत्री सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

टॅक्सीवाल्यांच्या प्रश्‍नावरही चर्चा
दरम्यान, राज्यातील टॅक्सीचालकांनी ‘गोवा माईल्स’ ह्या ऍपधारीत टॅक्सी सेवेला विरोध केल्याने निर्माण झालेल्या समस्येवर योग्य तो तोडगा काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. टॅक्सी सेवेवर तोडगा काढण्यासाठी बैठकीत सुमारे तासभर विविध पर्यायांवर चर्चा झाली. काही मंत्र्यांनी त्यांची मते मांडली. विविध पर्याय स्वीकारूया. केवळ गोवा माईल्स हा एकच पर्याय नको, असा मुद्दा काही मंत्र्यांनी मांडला. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना गोवा माईल्स सेवा आपली वाटत नाही. या सेवेखाली काही टॅक्सी चालकांनी नोंदणी केली आहे. मात्र, गोवा माईल्सवर हल्ले होत असल्याने वातावरण बिघडले आहे. यामुळे पर्यटनावर परिणाम होण्याची भीती काही मंत्र्यांनी व्यक्त केली. या समस्येवर टॅक्सी चालकांशी चर्चा करून लवकरच काय तो तोडगा काढण्याचा निर्णय घेण्याचे ठरले आहे.