ब्रेकिंग न्यूज़
महिलांचा सन्मान हीच काळाची गरज!

महिलांचा सन्मान हीच काळाची गरज!

‘मी टू’ मोहीम भारतात आता कुठे सुरू झाली आहे, मूळ धरू लागली आहे, रुजू लागली आहे. पण जगभरात ही मोहीम खूप आधी सुरू झाल्याने समाज याबाबत बराच जागरूक झाला आहे, असं मी म्हणेन. प्रत्यक्षात महिलांना अशा अत्याचारांना समोरं जावं लागणं हीच खूप दुर्देवी बाब आहे. एकीकडे आपण देवीची, शक्तीची पूजा करतो तर दुसरीकडे एका महिलेवर अत्याचार करतो. हे मानवजातीला अजिबात शोभणारं नाही. ही मोहीम ङ्गक्त चित्रसृष्टीपुरती मर्यादित नाही. शाळेपासून अगदी आयटी क्षेत्रापर्यंत अशा गोष्टी घडत असतात. पण चित्रपटक्षेत्राला असलेल्या वलयामुळे इथे घडणार्‍या घटना खूप मोठ्या केल्या जातात. त्यांचा अधिक गवगवा होतो. अशा घटना वर्षानुवर्षं घडत आल्या आहेत. मी तर म्हणेन, घरातही असे अत्याचार होत असतात. पण संसार वाचवण्यासाठी महिला त्याबद्दल बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत. ङ्गिल्म इंडस्ट्रीचा ग्लॅमरशी असलेला संबंध लक्षात घेता या क्षेत्रातल्या घटना अतिशयोक्तीने सादर केल्यासारख्या वाटतात. ‘मी टू’ मोहिमेबद्दल मी आतापर्यंत जे ऐकलं, वाचलं आहे त्यावरून मला असं वाटत आहे.
‘मी टू’च्या माध्यमातून व्यक्त होणार्‍या महिला अनेक वर्षांनी बोलत आहेत. पण प्रत्यक्षात लैंगिक अत्याचारांबाबत स्त्रिया हतबल का झाल्या आहेत? मला याबाबत काहीच बोलायचं नाही, आता यावर काहीही होऊ शकणार नाही असे विचार महिलांच्या मनात का येतात? अशा विचारांना कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात? आपला समाज, त्याची मानसिकता यामुळे महिला पुढे यायला घाबरतात. हे बदलायला हवं. हे चित्र बदलण्यासाठी प्रत्येक स्तरातल्या स्त्रीच्या मनात आत्मविश्‍वास जागवला गेला पाहिजे. आपण सक्षम आहोत ही भावना त्यांच्या मनात रूजायला हवी. मी स्वत: एक मुलगी आहे. माझ्या बाबतीत असं काही घडलं तर मी अजिबात गप्प बसणार नाही आणि असे प्रसंग उघड करायला वेळही लावणार नाही. त्याच क्षणी मी बोलेन, व्यक्त होईन. तसं पाहायला गेलं तर महिला किती दिवसांनी, महिन्यांनी किंवा वर्षांनी बोलल्या याला ङ्गारसं महत्त्व देता कामा नये. त्या बोलत आहेत, पुढे येत आहेत हीच मोठी गोष्ट आहे. पण अशा घटना घडून बराच वेळ गेल्यानंतर त्यांचं महत्त्व कमी होऊ शकतं. आपल्या बोलण्याचा प्रभाव तितका पडेलच असं नाही. त्यामुळे तिथल्या तिथे व्यक्त होणं गरजेचं आहे. प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असते. त्याचप्रमाणे तुमच्या बाबतीत घडलेल्या अत्याचाराबाबत तातडीने व्यक्त व्हा. शांत बसू नका, घाबरू नका हेच मी सर्व महिलांना सांगू इच्छिते.
‘मी टू’च्या यशाबाबत मी म्हणेन की, सोशल मीडिया हे खूप प्रभावी माध्यम आहे. तरुण पिढी सोशल मीडियाशी अत्यंत जवळून जोडली गेली आहे. त्यामुळे त्यावर येणार्‍या गोष्टींकडे लगेच लक्ष वेधलं जातं. परिणामी, अशा मोहिमांनी निश्‍चितच ङ्गरक पडतो. वैयक्तिक बाबी उघड करण्यासाठी मी सोशल मीडियाचा वापर करत नसले तरी सामाजिक गोष्टींसाठी मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. आता आपल्याकडे बरीच जागरूकता निर्माण झाली आहे. महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव आहे. विविध माध्यमांमधून आपल्याला याची माहिती मिळत असते. मी एक अभिनेत्री आहे. मी साकारत असलेल्या भूमिकांमधून महिला सक्षमीकरणाचा विचार मांडण्याचा प्रयत्न करते. मालिकांमधून आपण हे बघतो. हिंदी चित्रपटांमध्येही महिलांच्या हक्कांबाबत, त्यांच्या लढ्याबाबत बोललं गेलं आहे. आपण सेलिब्रिटींच्या मुलाखती बघतो. वर्तमानपत्रांमधल्या बातम्या वाचतो. वेब चॅनेल्सवरही महिला सक्षमीकरणाशी संबंधित विषय हाताळले जातात. एकेमकींशी संवाद साधला जातो. त्यामुळे कायद्यांबाबत किंवा समाजात घडणार्‍या घटनांबाबत आपण अनभिज्ञ आहोत असं म्हणताच येणार नाही.
मी आजच्या पिढीची प्रतिनिधी आहे. त्यामुळे मला काहीच माहीत नाही असं मी म्हणूू शकत नाही. प्रत्येकाला सगळं काही माहीत असतं. मुद्दा एवढाच असतो की त्यावर कोणीच काही बोलत नाही. गप्प बसण्याला पसंती दिली जाते. हे बंद झालं पाहिजे. आता माझ्यापुरतं बोलायचं तर मी एक अभिनेत्री आहे. माझ्या मुलाखती घेतल्या जातात. पण त्यावेळी व्यक्त होताना मी या चित्रपटात काम केलं, अमुक एका अभिनेत्यासोबत काम करून मला खूप छान वाटलं. असा चित्रपट मिळाला, गोव्यात शूट करून खूप मजा आली एवढंच मोजकं बोलून उपयोगाचं नाही. मी वैयक्तिक पातळीवर जाऊन बोलेन. महिलांवर होणार्‍या अत्याचारासंदर्भात नेमकं काय करायला हवं हे सांगेन आणि तेच अपेक्षितही आहे. स्वत:पुरतं बोलायचं तर मी बाहेर जाऊन लोकांना मदत करते. रस्ता ओलांडतानाही मी मदत केली आहे. म्हणजे ‘मी टू’च्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल. सगळ्या गोष्टी प्राथमिक स्तरापासून घडायला हव्यात तरच या मोहिमेला काही अर्थ उरेल. मी ङ्गक्त मुलाखती देऊन गप्प बसणार नाही तर वैयक्तिक पातळीवर मी कोणाला कशी मदत करू शकते, याचा विचार करेन. त्याच मार्गाने पुढे जाईन. बघ्यांच्या गर्दीतली एक होणं मला आवडणार नाही. एक माणूस म्हणून मला लोकांना मदत करायला आवडेल. समाजातल्या प्रत्येकापर्यंत हा विचार पोहोचायला हवा. प्रत्येकाने एकमेकांना अशी मदत करायला हवी. असं झालं तर समाजात बदल घडायला वेळ लागणार नाही.
आतापर्यंत आपण ‘मी टू’च्या सकारात्मक बाबींवर बोललो. यामुळे महिलांना व्यासपीठ मिळालं यात शंका नाही. पण मीडियासमोर आलेल्या या चळवळीलाच ‘मी टू’ म्हणायचं का? तर नाही. कारण आज खेडोपाड्यात महिलांवर अत्याचार होत आहेत. अनेकींपर्यंत ही मोहीम पोहोचलेली नाही. हा वर्ग खूप मोठा आहे. इंग्रजी कळतही नसलेल्या महिलांचं काय? त्यांना कोण आधार देणार? त्या कधी व्यक्त होणार? या महिलांनाही ‘मी टू’ म्हणण्याची संधी मिळायला नको का? ‘मी टू’ ङ्गक्त एक सुरुवात आहे. हे एक व्यासपीठ आहे. पण ङ्गक्त ‘मी टू’चा हात पकडून पुढे जाण्यापेक्षा त्याची घरापासून सुरुवात होऊ द्या. महिलांचा सन्मान ही काळाची गरज आहे. कोणत्याची मोहिमेचा हॅशटॅग ‘वूमेन रिस्पेक्ट’ असाच असायला हवा, असं मला वाटतं. महिलांना मान देण्याबाबत प्रत्येकाने आग्रही असायला हवं. ‘मी टू’सारख्या मोहिमांबद्दल बोलताना मला आणखी एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे महिलांच्या प्रगतीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेतली आहे. भारतापुरता विचार करायचा झाला तर शिक्षणाला आपण खूप प्राधान्य द्यायला हवं. आपल्या देशातल्या मुली, महिला विविध क्षेत्रांमध्ये भारताचं नाव उज्ज्वल करत आहेत. क्रीडाक्षेत्रही याला अपवाद नाही. अगदी खेड्यापाड्यातून आलेल्या मुलीही देशाला पदकं मिळवून देत आहेत. भारताची प्रतिनिधी म्हणून मला काहीतरी चांगलं काम करायची इच्छा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचावण्यासाठी मला पुढाकार घ्यायचा आहे. भारतातल्या महिला आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतात तेव्हा त्यांना खाली खेचायचा प्रयत्न कोणी करत असेल असं मला वाटत नाही.
महिला अत्याचाराबाबत बोलताना पुरुषी मानसिकतेचा विषय टाळून चालणार नाही. पुरुषांंची मानसिकता बदलणार की नाही हे मी ‘मी टू’वरचा लेख लिहिताना सांगू शकत नाही. मी म्हणेन की, पुरुषी मानसिकता बदलू शकते. पण येणारा काळच हे ठरवू शकेल. अर्थात ती बदलली तर चांगलंच आहे. पण नाही बदलली तर आपण किमान तशी आशा तरी बाळगू शकतो. अर्थात ती बदलावी असं माझं वैयक्तिक मत आहे. ‘मी टू’ मोहीम उद्या पुरुषही सुरू करू शकतात. त्यामुळे महिला असो वा पुरुष, प्रत्येकाने एकमेकांचा आदर करायला हवा.