महिन्याभरात म्हादईवर श्‍वेतपत्रिका काढा

>> अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा विरोधकांचा पत्रकार परिषदेत इशारा

म्हादईप्रश्‍नी गोवा सरकारने एका महिन्याच्या आत श्‍वेतपत्रिका काढावी. अन्यथा विरोधक राज्यातील जनतेला एकत्र करून राज्यव्यापी आंदोलन छेडतील, असा इशारा काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत दिला. कामत यांनी काल अन्य सहा विरोधी आमदारांसह पत्रकार परिषद घेतली.
यावेळी कामत म्हणाले, की गोवा सरकारने म्हादईप्रश्‍नी श्‍वेतपत्रिका काढून म्हादई लढ्यासंबंधी काय काय केले त्याची तपशीलवार माहिती द्यावी. ३० दिवसांच्या आत सरकारने ही श्‍वेतपत्रिका काढावी. म्हादईप्रश्‍नी गोवा सरकारला पूर्ण अपयश आल्याचा आरोप यावेळी कामत यांनी केला. गेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधी आमदारांनी एकत्र येऊन म्हादईप्रश्‍नी स्थगन प्रस्ताव आणला होता. पण सरकारने तो फेटाळला. त्यामुळे विधानसभेत म्हादई प्रश्‍नावर चर्चा करता आली नाही.

भीती खरी ठरली
सर्वोच्च न्यायालयाने म्हादई लवादाचा निवाडा अधिसूचित करण्यास मान्यता दिल्याने आम्हाला जी भीती वाटत होती ती आता खरी ठरली असल्याचे कामत म्हणाले. गोव्यासाठी हा काळा दिन असल्याचे कामत यांनी यावेळी नमूद केले. कर्नाटकला म्हादई नदीवर कोणतेही काम सुरू करण्यास मान्यता मिळू नये यासाठी स्थगिती मिळवण्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगणार्‍या राज्य सरकारने म्हादईप्रश्‍नी आपण कुठे कमी पडलो हे जनतेला सांगण्याची गरज असल्याचे कामत म्हणाले.

पाणी प्रकल्पांवर होणार
परिणाम ः ढवळीकर
मगो नेते सुदिन ढवळीकर हे यावेळी म्हणाले, की कर्नाटक सरकारने कळसा भंडुरा प्रकल्पाद्वारे पाणी वळवल्याने कळसा भंडुराच्या प्रवाहाचे ७०% एवढे पाणी कमी झाले आहे. आता दगडांमधून छोटासा प्रवाह वाहताना दिसत आहे. ही बाब गंभीर असून या प्रकारामळे बार्देश, तिसवाडी, फोंडा, धारबांदोडा व दक्षिण गोव्यातील काही पाणी प्रकल्पांवर परिणाम होणार असून त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची भीती आहे.

ही तर निसर्गसंपदेवर
आपत्ती ठरेल ः प्रतापसिंह
प्रतापसिंह राणे म्हणाले, की कळसा भंडुरा प्रकल्पाद्वारे पाणी वळवण्यात येणार असल्याने गोव्यातील संपूर्ण निसर्ग व पर्यावरणावर भयावह असा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेती व कुळागरांवर परिणाम होईल.

आमदार विजय सरदेसाई यांनी म्हादईप्रश्‍नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पूर्ण अपयश आल्याचा आरोप केला. कर्नाटकने ६० टक्के पाणी वळवले असताना जलसंसाधन मंत्री फिलीप नेरी रॉड्रीग्ज हे कर्नाटकला म्हादईचे एक थेंब पाणीही वळवू देणार नसल्याचे म्हणतात ते कसे काय, असा सवालही सरदेसाई यांनी यावेळी केला.