महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री सावंत प्रचार करणार

>> ५ दिवस सहभाग ः बहुतेक मंत्रीही जाणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे बहुतेक मंत्री, आमदार आणि भाजपचे स्थानिक ज्येष्ठ नेते, माजी आमदार महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत १० ते १५ ऑक्टोबर दरम्यान निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी काल दिली.

भाजपच्या गोवा विभागाकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पनवेल, कोंकण व इतर विभागात प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत सांगली, मिरज, सातारा, कराड आदी भागातील भाजपच्या प्रचार सभांमध्ये सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे पाच दिवसांच्या प्रचारानंतर गोव्यात परतणार आहेत. त्यानंतर दोन दिवस गोव्यात राहून पुन्हा प्रचारात सहभागी होऊ शकतात, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.

भाजपचे बहुतेक मंत्री, आमदार आणि प्रमुख कार्यकर्ते प्रचारात सहभागी होणार आहेत. त्यात कॉंग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचाही सहभाग आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या मागील निवडणुकीच्या वेळी भाजपचे गोव्यातील ५०० कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते. त्यावेळी कोकण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यावेळी भाजप व शिवसेना यांच्यात आघाडी नसल्याने जास्त कार्यकर्ते गेले होते. यावेळी भाजप शिवसेना यांची आघाडी असल्याने केवळ दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.