ब्रेकिंग न्यूज़

महापौर, उपमहापौरपदासाठी भाजपचे उमेदवार आज ठरणार

पणजी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्‍चित करण्यासाठी भाजप गटाच्या नगरसेवकांच्या सोमवारी घेण्यात आलेल्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. भाजप गटाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा मंगळवारी सकाळी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महापौर व उपमहापौरपदासाठी बुधवार १४ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. मोन्सेरात समर्थक गटाने दोन्ही पदासाठी अनुक्रमे विठ्ठल चोपडेकर आणि अस्मिता केरकर यांची नावे जाहीर केली आहेत. भाजप गटाचे महापौर व उपमहापौर या दोन्ही पदासाठी उमेदवार निश्‍चित करण्यासाठी आयोजित बैठकीला भाजपच्या सर्व तेरा नगरसेवकांची उपस्थिती होती. या बैठकीला भाजपचे राज्य सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही पदांसाठी विविध नावांची चर्चा करण्यात आली आहे. बैठकीमध्ये विविध पर्याय सुध्दा ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही पदांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा भाजपचे सरचिटणीस तानावडे यांच्याकडून केली जाणार आहे.