मलावरोध

वैदू भरत नाईक (कोलगाव)

मलावरोध हा विकार नव्हे तर हा सर्व विकारांचे मूळ आहे. वैद्य डॉक्टरांकडे कॉन्स्टिपेशन, मलावष्टंभ, मलावरोध, खडा होणे, शौचास साफ न होणे, खूप वेळ लागणे, दोन-दोन दिवस संडासला न होणे, संडासला जावेसे न वाटणे, जोर करावा लागणे, मलप्रवृत्ती चिकट असणे, आमांश, संडासला घाण वास मारणे, शौचाचे समाधान नसणे, जेवणानंतर संडासला जाण्याची भावना होणे. सद्य परिस्थितीला सामोरे जावून मलावरोधाची स्थूल कल्पना व त्यावरचे ढोबळ उपचार व पथ्यापथ्ये याचा विचार करणे.

कारणे –
१) वेळी-अवेळी जेवणे, २) जेवणानंतर पुन्हा जेवणे, ३) भूक नसताना जेवणे, ४) भुकेचे वेळी पाणी पिणे, ५) पचावयास जड, थंड, तेलकट, तूपकट, गोड व खूप तिखट पदार्थ खाणे, ६) तहान असताना पाणी न पिणे, ७) रात्री दूध पाणे, ८) चहा, कॉफी, पान, तंबाखू, विडी, सिगारेट, तपकीर यांचा वापर, ९) चुकीची औषधे व वारंवार रेचक घेणे.
लक्षणे –
१. मलप्रवृत्तीस वेळ लागणे, जोर करावा लागणे, जोर करूनही पुरेशी मलप्रवृत्ती न होणे
२. खाल्लेल्या अन्नाच्या प्रमाणात पुरेसा मल न होणे, वारंवार जोर लागणे.
३. मलाचे स्वरूप चिकटसर, खडा, पसरट असणे किंवा मलाला घाण वास येणे
४. मलामध्ये जंत-कृमी असणे.
५. काही खाऊ नये अशी इच्छा होणे, कमी भूक लागणे.
६. मल अडकून गुदद्वाराची कळ मारणे. मुळव्याधीची लक्षणे उत्पन्न होणे, रक्त पडणे
७. पोट फुगणे, पोट डब्ब होणे, पोटाच्या खालच्या भागात वायू धरणे, अजीर्ण होणे.
८. चक्कर येणे, डोळे दुखणे, त्वचा निस्तेज होणे, अंगाला खाज सुटणे, डोळे व लघवी पिवळी होणे.

शरीर परीक्षण
मुखापासून गुदापर्यंत संपूर्ण परिक्षणाचे तसेच मलाच्या व काही प्रमाणात मुत्राच्या परिक्षणाची गरज भासते. त्याकरिता विशेष करून जिभेखालील किटण, ठिपके, यकृत, प्लीहेची वृद्धी, बेंबीजवळ दडसपणा, पक्वाशयात व एकूण पोटात त्यामुळे स्पर्श सहत्व व आतड्यांना सूज या गोष्टी तपासाव्यात. मल रुक्ष आहे का चिकट आहे, पाण्यात बुडतो की तरंगतो, घाण वास आहे का? जंत व कृमी, मूत्राचा वर्ण, आहाराचे मानाने मलाचे प्रमाण या गोष्टी लक्षात घ्याव्यात. मोड, भगंदर, गुदपाक याकरिता परिक्षण व्हावे.

अनुभवी उपचार
१) रुक्ष, कठीण मल, वरच्या पोटात वायु धरणे अशी लक्षणे असल्यास गं. रहितकी चूर्ण किंवा त्रिफळा चूर्ण झोपताना एक चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावे. सोबत चिमुटभर पाचक चूर्ण किंवा शंखवटीच्या २/३ गोळ्या तत्कालीन वायू दूर करण्याकरिता उपाय म्हणून घ्याव्यात.
२) चिकट, दुर्गंधी, आवयुक्त अशा लक्षणात आरोग्यवर्धिनी व त्रिफळा गुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या सकाळी-सायंकाळी घ्याव्यात. आम्लपित्त हे अधिक लक्षण असल्यास काढ्याबरोबर आम्लपित्तवटी तीन गोळ्या सकाळी-सायंकाळी घ्याव्यात. गं. हरितकी एक चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावे.
३) पित्तप्रधान मलावरोधाकरता जेवणानंतर गुलाब द्राक्षासव चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. झोपताना त्रिफळा चूर्ण एक चमचा कोमट पाणी व तुपाबरोबर घ्यावे.
४) कावीळ, यकृत, प्लीहा, उदरवृद्धीकरिता रिकाम्या पोटी आरोग्यवर्धिनी प्रत्येक वेळेस तीन गोळ्या दोन किंवा तीन वेळा बारीक करून घ्याव्यात. जेवणानंतर कुमारी आसव चार चमचे पाण्याबरोबर घ्यावे. रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण एक चमचा कोमट पाण्याबरोबर घ्यावे.
५) मलाबरोबर रक्त पडणे, सार्वदेहीक उष्णता असेल तर गुलाब द्राक्षासव चार चमचे समभाग पाण्याबरोबर दोन वेळा घ्यावे. प्रवाळ, कामदुधा, चंदनादिवटी, प्रत्येकी तीन-तीन गोळ्या दोन वेळा पाण्यासोबत घेणे, रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे.
६) गर्भारपणा, प्रसुति व मुळव्याध ः त्रिफळा गुग्गुळ, प्रवाळ, कामदुधा प्रत्येकी दोन-दोन रिकाम्या पोटी बारीक करून घेणे, गुदाचे जागी शतधौतघृत लावावे. झोपताना त्रिफळा किंवा गंधर्वहरितकी गरम पाण्यासोबत व तुपातून घेणे.
७) चुकीची औषधे व रेचक अतिवापर ः चुकीच्या औषधांचा परिणाम दूर होण्याकरिता गाईच्या दुधावर रहावे. प्रवाळ, कामदुधा तीन-तीन गोळ्या दुधाबरोबर घ्याव्यात. तीव्र रेचकाचा दुष्परिणाम टाळण्याकरिता एक कप पाण्याबरोबर एक चमचा तूप मिसळून घ्यावे किंवा त्रिफळा चूर्ण एक चमचा तुपाबरोबर घ्यावे व मलप्रवृत्ती होण्याची वाट पहावी.
८) आहारात कमतरता ः आहाराच्या मानाने मल कमी असल्यास मूग, उडीद, चवळी, शेंगदाणे असा आहार ठरवून वाढवावा. भरपूर मनुका खाव्यात. गरम पाण्याबरोबर तूप मिसळून रात्री घ्यावे. गरम पाणी प्यावे.

पथ्यापथ्य –
* वेळेवर व थोडी भूक ठेवून जेवावे. रात्री उशीरा जेवू नये. पोटात वायु असताना लंघन करू नये.
* जेवणात तेलकट, तुपकट, जड, खूप थंड, खूप तिखट, मसालेदार पदार्थ, शिळे अन्न असू नये.
* कठीण मल असणार्‍यांनी तूप व तेलाचे आहारातील प्रमाण वाढवावे.
* चिकट मल असणार्‍यांनी साखर, गहू, डालडा, तूप, दूध, थंड पदार्थ वर्ज्य करावेत. साखर, दूध पिऊ नये.
* आहार समतोल व सात्विक असावा. रात्री जेवण कमी असावे. मलाचे प्रमाण कमी असणार्‍यांनी मात्र भरपूर जेवावे. त्यांनी कडधान्ये भरपूर खावीत.
* रात्री झोपताना किमान अर्धा तास फिरून यावे. त्यामुळे पोटातील व डोक्यातील गॅस कमी होतो. मलावरोधाकरिता औषधे घ्यावी लागत नाहीत.
* विडी, सिगारेट, दारू, तंबाखू इ. गोष्टी टाळाव्यात.