ब्रेकिंग न्यूज़
मर्यादेबाहेर रसायनयुक्त मासळीची विक्री रोखणार

मर्यादेबाहेर रसायनयुक्त मासळीची विक्री रोखणार

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचा इशारा

>> नियमित तपासणीची दिली ग्वाही

राज्यातील मासळीची नियमित तपासणी केली जाणार असून मर्यादेबाहेरील फॉर्मेलिन असलेल्या मासळीची विक्री रोखण्यात येणार आहे, असा इशारा आरोग्यमंत्री तथा एफडीए खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिला.
दरम्यान, परराज्यांतून गोव्यात येणार्‍या मासळीमध्ये फॉर्मेलिन हे घातक रसायन असल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. फॉर्मेलिन या रसायनाच्या कमी मात्रेमुळेही कॅन्सर व इतर रोग होऊ शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे मासळीतील फॉर्मेलिनच्या विषयावर नजर ठेवून आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या पार्श्‍वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, मासळीमध्ये काही प्रमाणात फॉर्मेलिन असते. अन्न व औषध संचालनालयातर्फे मार्केटमधील मासळीच्या नियमित तपासणीवर भर दिला जाणार आहे. मर्यादेबाहेर फॉर्मेलिन असलेल्या मासळीची विक्री बंद केली जाणार आहे, असेही आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले.
मडगाव येथील मार्केटमध्ये परराज्यांतून आणण्यात येणार्‍या मासळीची तपासणी करायला गेलेल्या एफडीएच्या महिला अधिकार्‍याला प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा अधिकार दिला नव्हता. त्यांना मार्केटमध्ये आणण्यात आलेल्या मासळीची तपासणी करण्याचे काम दिले होते. मासळीमध्ये फॉर्मेलिन असल्याचे आढळून आल्यानंतर मासळीचे नमुने संचालनालयातील प्रयोगशाळेत आणून त्यांची पुन्हा तपासणी करून वरिष्ठांकडे चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

मासे खाण्यास सुरक्षित : एफडीए
दरम्यान, अन्न आणि औषध संचालनालयाने एका पत्रकातून राज्यातील मासळी खाण्यासाठी सुरक्षित आहे. मासळीतील फॉर्मेलिनच्या मुद्यावरून नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन केले आहे.

मासळी मार्केटांमध्ये शुकशुकाट
राज्यातील विविध भागातील मासळी मार्केटमध्ये विक्रीवर काल परिणाम झाला. मडगाव, पणजी, म्हापसा येथील मासळी मार्केटांमध्ये ग्राहकांची गर्दी नव्हती. यामुळे मासळी विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला आहे.

सोशल मिडियावर संतप्त प्रतिक्रिया

मासळी खराब होऊ नये यासाठी बिगर गोमंतकीय मासळी माफियांकडून मासळीवर घातक फॉर्मेलिनचा वापर करण्यात येत असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल शुक्रवारी सोशल मिडियावर गोवाभर त्याविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या.

गोमंतकीयांनी परराज्यांतून येणार्‍या मासळीवर पूर्णपणे बहिष्कार घालून या मासळी माफियांना चांगलीच अद्दल घडवावी अशी मागणी करणार्‍या पोस्टचा काल फेसबूक, वॉट्‌सऍपवर अक्षरशः पाऊस पडला. गोव्यात मासेमारी सुरू होईपर्यंत गोमंतकीयांनी मासळीला शिवू नये व परराज्यांतील या फॉर्मेलिनचा मुलामा लावण्यात आलेल्या मासळीवर पूर्ण बहिष्कार टाकण्यात यावा, अशी सूचना अनेक जणांनी फेसबूक व वॉट्‌सऍपवरील पोस्टद्वारे केली. डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी तर एक लेखच लिहून ही मासळी खाणे कसे धोकादायक आहे हे सांगतानाच कर्करोगासारख्या भयानक रोगाला बळी पडायचे नसेल तर ही मासळी खाऊ नये असे कळकळीचे आवाहनही केले. मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी मासळी माफियांवर एफडीएने कडक कारवाई करावी अशी मागणी प्रतिक्रिया देताना केली. वर्षभरात एकदा छापे मारून काहीही होणार नसून लोकांना विष खाऊ घालणार्‍या या नराधमांना अद्दल घडवायची असेल तर अन्न आणि औषध प्रशासनाला सतत सतर्क राहून त्यांच्यावर छापे मारावे लागतील, असे ते म्हणाले. सरकारने याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.