मराठी, कोकणी चित्रपटांसाठी सिनेमागृहे आरक्षित ठेवणार

मराठी, कोकणी चित्रपटांसाठी सिनेमागृहे आरक्षित ठेवणार

>> मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची घोषणा
>> दशकपूर्ती गोवा चित्रपट महोत्सवाचे थाटात उद्घाटन

गोव्यात मराठी व कोकणीमधील चित्रपट दाखविण्यासाठी चित्रपटगृहे आरक्षित ठेवावीत यासाठी चित्रपटगृहांना सक्ती करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी काल केली. आपले प्रादेशिक चित्रपट दाखविण्यात चित्रपटगृहे उपलब्ध नसतात ही मोठी अडचण इथे असल्याची आपल्याला जाणीव आहे असे स्पष्ट करून मराठी चित्रपट गेल्या दशकात दर्जेदार निर्मितीच्या दृष्टीने उच्च पातळीवर पोचला असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

पस्तीसहून अधिक मराठी चित्रपट क्षेत्रातील नामवंत अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते यांच्या उपस्थितीत दशकपूर्ती गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते पारंपरिक गोव्याचे ‘दीवज’ प्रज्वलीत करून झाले. यावेळी प्रमुख पाहुणे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, सारस्वत बँकेचे सुनील सौदागर, गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे आनंद पेडणेकर, खास निमंत्रित ख्यातनाम अभिनेत्री दिव्या दत्ता यांनी दीप प्रज्वलनात भाग घेतला.
सर्वांचा कृतज्ञ : सचिन पिळगावकर
पुरस्काराबद्दलच्या भावना व्यक्त करताना सचिन पिळगावकर म्हणाले, माझ्या कामाची तुम्ही दखल घेतलीत, दाद देत आलात. त्यामुळे सर्वांबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे. मला जन्म दिलेल्या माझ्या आईच्यावतीने मी तुमचे आभार मानतो. हा महोत्सव दिमाखात, जल्लोषात साजरा केला जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मराठी चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहिल्यानंतर मराठी चित्रपट सृष्टी आपली मानणार्‍याला निश्‍चितच अभिमान वाटेल असे सांगून पिळगावकर म्हणाले, की मराठी, अमराठी असा भेद चित्रपटात करत नाही. मी दोन्हीत काम केले आहे. परदेशात असे महोत्सव व्हावेत परंतु आपल्या मातृभूमीला विसरता कामा नये असा प्रेमाच्या सल्ला त्यांनी जाता जाता दिला.
मराठी चित्रपटात भूमिका करणार : दीव्या
दिव्या दत्ता म्हणाल्या, एवढ्या सगळ्या नामवंत कलाकारांना एकत्र मंचावर पहायला मिळणे हा माझ्यासाठी आनंददायी, सुंदर अनुभव होता. गोव्यात आम्ही येतो तेव्हा सगळी विवंचना, ताणतणाव दूर ठेवतो. मराठी चित्रपटाने आज कमाल केली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सचिनने पुरस्कार पटकाविले आहेत. त्यांच्याबरोबर चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त करून मराठी चित्रपटात आपण भूमिका करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व आमदारांनी मराठी चित्रपट पहावेत : राऊत
संजय राऊत म्हणाले की, मराठी, कोकणी चित्रपट दाखविण्यासाठी काही दिवस सिनेमागृहे आरक्षित ठेवायला हवीत. गोव्याने चित्रपटसृष्टीला, महाराष्ट्राला खूप काही दिले आहे. गोव्याच्या सर्व विधानसभा सदस्यांनी मराठी चित्रपट पहावेत म्हणजे मराठी चित्रपट आज किती उंचीवर पोचला आहे हे समजेल असे आवाहन श्री. राऊत यांनी केले. अमितान बच्चन उंचीने सचिनपेक्षा मोठे आहेत. परंतु अमिताभ हिंदी सिनेसृष्टीत प्रस्थापित झाले नव्हते तेव्हा मास्टर सचिन (पिळगावकर) ने चित्रपटसृष्टीचा कब्जा घेतला होता असे गौरवाने ते म्हणाले.
सई परांजपे यांना पुरस्कार
या सोहळ्यात नामवंत अभिनेत्री सई परांजपे यांना गोदरेज नं. १चा ङ्गएव्हर फ्रेश ऑफ द ईअरफ हा यंदाचा पहिला पुरस्कार कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ब्रॅन्डेड गोदरेज प्रॉडक्टसचे विपल चोप्रा उपस्थित होते. आज खूप बरं वाटतंय अशा शब्दांत भावना व्यक्त करून सई परांजपे यांनी नव्या दमाच्या अभिनेत्यांचा आवर्जून उल्लेख केला.
सिनेमा ही चळवळ : गोविंद गावडे
गोविंद गावडे म्हणाले, सिनेमा ही सुध्दा नाट्य चळवळीप्रमाणे एक चळवळ आहे. क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टी भारतीयांना जोडतात. भिन्न भिन्न जाती धर्माचे लोक असूनही भारत देश विशाल बनला आहे ते याचमुळे असे ते म्हणाले.
गजेंद्र अहिरे, मृणाल कुलकर्णी, नागेश भोसले, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, राजेश म्हापूसकर, अनंत महादेवन, सचिन खेडेकर आदींनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्घाटन सोहळ्यात नामवंत चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते सहभागी झाले होते. त्यात रवी जाधव, परेश मोकाशी, नागेश भोसले, उपेंद्र लिमये, सुनील सुखठणकर, अंकुश चौधरी, अरूण नलावडे, अवधुत गुप्ते, प्रसाद ओक, सुनील फडतरे, लीना जगताप, तनिष्का चटर्जी, चिन्मयी राघवन, मृण्मयी गोडबोले, आदित्य जांभळे आदींचा समावेश होता.
ललिता जोशी यांनी सूत्रसंचालन तर विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये व श्रीपाद शेट्ये यांनी मान्यवरांचे स्वागत केले. उद्घाटनानंतर कुलकर्णी चौकातला देशपांडे या चित्रपटाचा प्रिमीअर शो झाला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार उपस्थित होते.

सचिन पिळगावकर यांना कृतज्ञता पुरस्कार
सारस्वत बँक प्रस्तुत व विन्सन वर्ल्ड आयोजित या महोत्सवाच्या शानदार उद्घाटन सोहळ्यात गोमंतकीय सुपूत्र ख्यातनाम अभिनेता, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी पाच दशके मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते कृतज्ञता पुरस्कार देवून गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. गतवर्षीच्या कृतज्ञता पुरस्काराच्या मानकरी लोकप्रिय अभिनेत्री गोमंतकीय सुकन्या वर्षा उसगावकर यांनी मानपत्राचे वाचन केले.