मनावर नियंत्रण आणण्यासाठी….

  • पंकज अरविंद सायनेकर

श्वासावर नियंत्रण ठेवून (कुंभक, म्हणजेच श्वास रोखून धरुन) चित्तविक्षेप नाहीसे करता येतात. प्राण जसा सबंध शरीरात व्यापून असतो तसेच मनही शरीरात संचार करीत असते. त्यामुळे जर का प्राणावर ताबा मिळवला तर मनही नियंत्रणात होईल.

आजकाल बाजारात एखादी वस्तू घेतली तर त्याबरोबर काही मोफत (फ्री) मिळते. उदा. दंतमंजन किंवा टूथपेस्टसोबत टूथब्रश फ्री, पेन घेतले तर रिफील फ्री इत्यादी इत्यादी. सांगण्याचा मुद्दा असा की मागील लेखात आम्ही चित्तविक्षेप म्हणजेच अंतराय जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ह्या चित्तविक्षेपांसोबत विक्षेप-सहभुव फ्री (मोफत) मिळतात. हे विक्षेप-सहभुव म्हणजे १. दुःख- यातना किंवा क्लेश; २. दौर्मनस्य- निराशा; ३. अंगमेजयत्व- शरीराची अस्थिरता आणि ४. श्वास- प्रश्वास- मनाची अस्थिरता. युध्द जिंकण्यासाठी सेनापती युद्धभूमी आणि शत्रू यांचे निरीक्षण करतो आणि योग्य ते डावपेच आखतो, त्याचप्रमाणे योगी माणूस आत्मविजयासाठीची मोहीम आखतो. इथे आत्मविजय म्हणजे काय, तर चित्तविक्षेपांना नाहीसे करणे, ते चित्तविक्षेप काढून टाकणे. कसे काढता येतील हे?

* ‘तत्प्रतिषेधार्थमेकतत्वाभ्यासः| (यो.द. १.३२)’
– म्हणजेच, त्या चित्तविक्षेप आणि विक्षेप- सहभुव यांचे उच्चाटन करण्यासाठी चित्ताला एक तत्वावर नियंत्रित करणे. ह्यासाठी विविध पद्धती जसे की, ओंकार जप, मंत्र जप इत्यादी. जेव्हा गुरू आपल्या साधकाला मंत्र जप देतो, तेव्हा साधकाची कुवत आणि आवड ह्याकडेही लक्ष देतो. कारण, क्षमतेपेक्षा कठीण मंत्र असेल तर साधकाला तो मंत्र समजणे अवघड जाईल आणि ह्याचा सराव नावडीचा वाटेल.

* ज्यांना हे नको असेल (किंवा कठीण वाटत असेल) ते चित्त प्रसादनाचा मार्ग अवलंबू शकतात. किंवा, श्वासावर नियंत्रण ठेवून (कुंभक, म्हणजेच श्वास रोखून धरुन) चित्तविक्षेप नाहीसे करता येतात. प्राण जसा सबंध शरीरात व्यापून असतो तसेच मनही शरीरात संचार करीत असते. त्यामुळे जर का प्राणावर ताबा मिळवला तर मनही नियंत्रणात होईल. ज्यांना हेही कठीण वाटत असेल त्यांच्यासाठी….

* विषयवती वा ‘प्रवृत्तिरुत्पन्ना मनसः स्थितिनिबन्धनी (यो.द. १.३५)’-
हे सूत्र नाद-योग सिद्धांतावर आधारित आहे. एखाद्या विशिष्ट गोष्टीवर किंवा स्थानावर मन एकाग्र करणे. त्राटकाच्या अभ्यासाने आम्ही हे साध्य करू शकतो. * योगदर्शन प्रत्येक मनाची काळजी घेतो असे म्हणण्यास हरकत नाही. ‘विषोकावा ज्योतिष्मयती (यो.द. १.३६)’ भ्रू-मध्य, म्हणजेच दोन्ही डोळ्यांच्या मध्ये जिथे टिळा लावतो, त्या बिंदूवर लक्ष केंद्रित करावे. मनाला आतील जगात डोकावून पहायला प्रवृत्त करणे, आतील जगातील प्रकाशाने अज्ञानरूपी अंधःकार दूर करणे. आणि हे करण्यासाठी ज्ञानरूपी ज्योत पेटवणे.

* अजून एक पद्धत ज्याने मन शांत केले जाऊ शकते, ती म्हणजे, अलिप्तपणा. भौतिक जगात जरी वावरत असलो तरी त्याच्याशी अलिप्तपणा बाळगणे. मनाला नियंत्रित करण्यासाठी जाणीवपूर्वक स्वप्नस्थिती (कॉन्शियस ड्रिमिंग) आणि जाणीवपूर्वक झोपेची (कॉन्शिअस स्लीप) आवश्यकता आहे.

* एखाद्या माणसाने राग-द्वेष यांचा त्याग केला असेल, किंवा भौतिक मोह मायेतून मुक्त झाला असेल तो मनुष्य चित्तविक्षेपांचे शमन करण्यात यशस्वी होतो.
वरील वेगवेगळ्या पद्धती किंवा त्यासारख्या आणखी काही पद्धतींद्वारे मन एकाग्र करता येते, शांत करता येते, चित्तविक्षेपांचे शमन करता येते.