मनपा आयुक्त दबावाखाली

>> महापौर ः हॉटेल्स, रहिवासी सोसायट्यांना आयुक्तांच्या नोटिसा

महानगरपालिका क्षेत्रातील तारांकीत हॉटेल्स आणि ४० रहिवासी सोसायट्यांना कचरा विल्हेवाटीबाबत नोटीस पाठविताना आयुक्तांनी महानगरपालिका मंडळाला विश्‍वासात घेतले नाही. महानगरपालिका आयुक्तांनी कुणाच्या तरी दबावाखाली येऊन पोट निवडणुकीच्या तोंडावर नोटिसा पाठविल्या आहेत, असा आरोप महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला.

महानगरपालिकेकडून हॉटेल्स, इमारत प्रकल्पात राहणार्‍यांकडून कचरा शुल्क वसूल केले जात आहे. त्यामुळे अचानकपणे त्यांना नोटिसा पाठवून कचरा स्वीकारणार नाही, अशा प्रकारची कृती करणे योग्य ठरणार नाही. महानगरपालिका आयुक्त कुणाच्या तरी हातातील बाहुले बनले असून त्यांच्या सूचनांनुसार फतवे काढू लागले आहेत, असा दावा महापौर मडकईकर यांनी केला.

महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणार्‍या विकास कामांचा आराखडा सादर करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु, हा आराखडा सादर करण्यात आलेला नाही. येत्या पावसाळ्यात पणजी शहरात पाणी साचल्यास स्मार्ट सिटी प्रशासनाला जबाबदार धरावे लागेल, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.
महानगरपालिकेची बायंगिणी ओल्ड गोवा येथील जागा सरकारने कचरा प्रकल्पासाठी दोन वर्षापूर्वी ताब्यात घेतली आहे. परंतु, त्या ठिकाणी कचरा प्रकल्प उभारण्यास सरकारला यश प्राप्त झालेले नाही. शहरातील अनेक तारांकित हॉटेल्सना नोटिसा पाठवून कचरा विल्हेवाटीची पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. तसेच ४० निवासी इमारत संकुलांना नोटीस पाठवून कचरा विल्हेवाटीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. महानगरपालिका मंडळ कचरा उचलण्याची जबाबदारी झटकू शकत नाही. निवडणूक आचारसंहिता लागू असताना नोटिसा पाठविणे अयोग्य आहे. यामुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही मडकईकर यांनी सांगितले.