मद्यविक्रीची दुकाने खुली मात्र; ‘मास्क नाही तर मद्य नाही’

कोविडसाठीच्या लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ बंद राहिलेली मद्याची दुकाने काल सोमवारपासून सुरू झाली. दरम्यान, मास्क न घालता येणार्‍यांना दारू देण्यात येणार नसल्याचे मद्य व्यापारी संघटनेने काल स्पष्ट केले. मास्क नाही तर मद्य नाही, असे धोरण आम्ही अवलंबणार आहोत, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

मद्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक म्हणाले की, सोमवारपासून मद्याची विक्री करणारी दुकाने उघडण्यात आली. मात्र, दारू विकत घेण्यासाठी ग्राहकांची विशेष गर्दी नव्हती.

दरम्यान, गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त काळ बंद असलेली मद्याची दुकाने सोमवारपासून उघडण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर अबकारी आयुक्त अमित सतिजा यांनी काही मद्याच्या दुकानांना भेट देऊन ‘सोशल डिस्टन्सिंग’सारख्या मार्गदर्शक तत्वांचा भंग तर केला जात नाही ना याची पाहणी केली. राज्यभरात सुमारे १३०० मद्याची दुकाने असून ती लॉकडाऊनमुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बंद होती.

दरम्यान, ग्राहकांना मद्यालयाच्या बाहेर दारू पिण्यास परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी मद्याचे प्राशन करण्यावर बंदी असल्याचे सांगून जर कुणी त्याचा भंग केला तर त्याच्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, असे दत्तप्रसाद नाईक यांनी स्पष्ट केले.