ब्रेकिंग न्यूज़

मद्यपी पतीचा पत्नीनेच केला खून

>> वास्को नौदल
वसाहतीतील प्रकार

वरुणापुरी – वास्को येथे पती-पत्नीच्या भांडणात, पत्नीने पतीचा लाकडी पट्टीने डोक्यावर वार करून खून केला. पत्नीला वास्को पोलिसांनी अटक केली आहे.
वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी वरुणापुरी नौदल वसाहतीत राहणार्‍या कौशलेंद्र प्रतापसिंग चौहान (३३) व संध्या चौहान (३२) यांच्यात भांडण झाले. सदर भांडणाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले.

कौशलेंद्र चौहान हा दारू पिऊन रोज भांडण करून पत्नीला मारहाण करीत असे. शनिवारी रात्री असाच तो दारू पिऊन आला व त्याने पत्नीशी भांडण केले. या भांडणाचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी त्यांची सात वर्षीय मुलगी भांडण थांबवण्यास गेली असता कौशलेंद्र याने मुलीला ढकलून बाजूला टाकून दिले. हा प्रकार बघून पत्नी संध्या चौहान हिने एक लाकडी पट्टी घेऊन पतीवर मारली. यात पट्टीचे दोन तुकडे झाले. यावरून न थांबता पत्नीने त्या मोडलेल्या पट्टीने पतीच्या डोक्यावर १४ वेळा टोचून टोचून वार केले. यात कौशलेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडला.

पहाटे पाच वाजता पत्नी संध्या हिने पतीला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो उठत नसल्याने तिने सदर माहिती शेजार्‍यांना दिली. शेजार्‍यांनी नौदलाच्या जीवन्ती इस्पितळाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करून त्याला येथील जीवन्ती इस्पितळात हलविण्यात आले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

कौशलेंद्र चौहान हा मुळ फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) येथील असून तेथील नौदलात तो एअरक्राफ्ट हॅण्डलर म्हणून कामाला होता. वरुणापूरी येथील नौदल वसाहतीत तो आपली पत्नी व सात वर्षीय मुलीसह राहत होता. कौशलेंद्र याचा मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला असून त्याचा परिवार गोव्यात आल्यानंतर तो त्यांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. वास्को पोलीस पुढील तपास करीत आहे.