मतमोजणीवेळी इव्हीएमवर नजर ठेवणार ः कॉंग्रेस

लोकसभेसह विधानसभा पोटनिवडणुकांच्या आज २३ मे रोजी होणार्‍या मतमोजणीच्या वेळी आमची मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) करडी नजर असेल, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल सांगितले. मतदान यंत्रे तसेच व्हीव्हीपॅट मोजणीवरही आमचे बारीक लक्ष असेल, असे चोडणकरम्हणाले.
पत्रकार व छायापत्रकार यांनाही मतमोजणीच्या सभागृहात प्रवेश देण्यात यावा, अशी कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे.

जर सरकारला काहीही लपवायचे नाही व पारदर्शकता बाळगायची आहे तर पत्रकार व छायापत्रकार यांना मतमोजणीच्या सभागृहात प्रवेश देण्यास काय हरकत आहे, असा सवालही चोडणकर यांनी केला.

व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी अगोदर करण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. ही मागणी पूर्ण व्हायला हवी, असेही चोडणकर यांनी स्पष्ट केले.