ब्रेकिंग न्यूज़

मतमोजणीपूर्वी सभापती निवडीस कॉंग्रेसची हरकत

सभापतीची निवड करण्यासाठी गोवा सरकार येत्या २० मे रोजी गोवा विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलावू पाहत असल्याची माहिती आम्हांला मिळाली आहे. मात्र, चार विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल २३ मे रोजी जाहीर होण्यापूर्वी हे अधिवेशन भरवण्यास कॉंग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

गोवा विधानसभेचे चार मतदारसंघ रिक्त झालेले असल्याने सध्या विधानसभा सदस्यांची संख्या ३६ वर गेलेली आहे. चार विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल २३ रोजी जाहीर होणार आहेत. ते जाहीर झाले की गोवा विधानसभेच्या सदस्यांची संख्या पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यानंतरच सभापतींची निवड करणे हे संयुक्तिक ठरणार असल्याचे कवळेकर व चोडणकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडेही मागणी
दरम्यान, हे एक दिवसीय अधिवेशन २३ मे नंतर घेण्यात यावे, अशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांच्याकडेही आमची मागणी आहे. कारण ४० आमदारांनी मिळूनच नव्या सभापतींची निवड करणे हे योग्य ठरणार असल्याचे कवळेकर व चोडणकर म्हणाले.

राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा ह्या भाजप पक्षाच्या पदाधिकारी असल्याप्रमाणे वागतात. भाजप सरकार जे सांगेल ते त्या ऐकतात. विरोधकांनी काही सांगितले की कानावर हात ठेवतात. त्यांचे वागणे हे त्यावेळीही पक्षपाती होते व आताही तसेच आहे. त्यामुळे हे एक दिवशीय अधिवेशन २३ मे नंतर घेण्याची आमची मागणी त्यांनी मान्य केली नाही तर आम्ही त्यांच्या कृतीविरुद्ध आंदोलन छेडणार असून त्यांना परत बोलावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करू, असेही चोडणकर व कवळेकर यांनी नमूद केले.

खास अधिवेशन ही अफवा : मुख्यमंत्री

गोवा विधानसभेच्या सभापतींची निवड करण्यासाठी २० मे रोजी खास अधिवेशन घेणार ही निव्वळ अफवा आहे. सरकारी पातळीवरून सभापतींची निवड करण्यासाठी अधिवेशन घेण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, सभापतींची निवड करण्याबाबत चर्चा सुरू करण्यात आलेली आहे. परंतु, निवडणूक घेण्यासाठी कोणतीही तारीख निश्‍चित केलेली नाही.