ब्रेकिंग न्यूज़
मंदाताई बांदेकर स्मृती ‘नक्षत्रांचे देणे’

मंदाताई बांदेकर स्मृती ‘नक्षत्रांचे देणे’

मंदाताई या स्वतः शास्त्रीय संगीत शिकल्या होत्या. त्यांना शास्त्रीय , उपशास्त्रीय, अभिजात गीतांच्या मैफलींचा आस्वाद घेण्यात आनंद वाटायचा. वास्को येथे षड्‌ज गंधार संगीत अकादमी स्थापन करुन त्यांनी होतकरु तरुणांना शास्त्रीय गायन – वादन शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्याची स्मृती जागविण्यासाठी ‘सूरईश’ ही संस्था २०१७ पासून अशा प्रकारची मैफल आयोजित करते व मंदा व नारायण बांदेकर चॅरिटेबल ट्रस्ट ती प्रस्तुत करते. यंदाच्या मैफलीत रसिकांचे भावविश्‍व ज्या गीतांनी समृद्ध केले, अनेक पिढ्यांनी या गीतांवर प्रेम केले. अशी गीते सादर होणार आहेत. झी मराठी सारेगमपच्या २०१८ च्या १३व्या पर्वातील टॉपचे दोन उमेद गायक कलाकार केतकी चैतन्य व अभिषेक तेलंग (मुंबई)तसेच ईटीव्ही (कलर्स) च्या गौरव महाराष्ट्राचा कार्यक्र्रमाची ‘टॉप’ ची मानकरी प्रेरणा दामले वझे (मुंबई) रसिकांना आपल्या गान विष्काराने शब्दसूरांचा मनमुराद आनंद देणार आहेत. वक्तृत्त्व, निवेदन, मुलाखत, अशा प्रांतात आपली स्वतःची नाममुद्रा उमटवलेला ‘सुसंवादिका’ प्रा. संगीता अभ्यंकर यांचे निवेदन कार्यक्रमाला लाभणार आहे. तर नितीन कोरगावकर (तबला), दत्तराज सुर्लकर (संवादिनी), बाळकृष्ण मेस्त (सिंथेसायझर), योगेश रायकर (तालवाद्य) झी व युवा वाहिनीवरील ‘संगीत सम्राट’ चे मानकरी विवेक कुडाळकर (ऑक्टोपॅड, तालवाद्य) हे नामवंत कलाकार आपल्या साथसंगतीने मैफलीत रंग भरतील.
मंदा व नारायण बांदेकर चॅरिटेबल ट्रस्टची स्व. मंदाताई बांदेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही मैफल रसिकांसाठी खर्‍या अर्थाने पर्वणी असेल व रसिकांनी त्यांचा मनसोक्त आनंद लुटायला हवा.
सौ. केतकी चैतन्य
संगीत विषयात एम्. ए. पदव्युत्तर परीक्षेत सुवर्ण पदक पटकाविलेल्या व अ. भा. नाट्य परिषदेचा गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार, उस्ताद अल्लादिया खान समिती, चेंबुरचा संगीत सम्राट अल्लादिया खान पुरस्कार, मुंबई मराठी सााहित्य संघाचा दाजी भाटवडेकर पुरस्कार, असे प्रतिष्ठेचे पुरस्कार संपादन केलेल्या केतकी चैतन्य यांना भारत सरकारची राष्ट्रीय युवा कलाकार शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. त्यांनी प्रसिद्ध गायिका मुग्धा भट सामंत यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले व सध्या त्या बुजुर्ग गायक पं. अरुण कशाळकर यांच्याकडे तालीम घेत आहेत. ‘पावला गणराज’ व चैत्र पावली अल्बमसाठी त्या गायिल्या आहेत. सध्या संगीत विषयात पी.एच्.डीचा त्यांचा अभ्यास सुरु आहे. ईटीव्ही गौरव महाराष्ट्राचा कार्यक्रमाच्या त्या मानकरी आहेत.
अभिषेक तेलंग
झी २४ तासचे शिर्षकगीत गायिलेले व कर्लस वाहिनीवरील गौरव महाराष्ट्राचा कार्यक्रमाचे विजेते ठरलेले अभिषेक तेलंग हे उमदे युवा गायक हिन्दी सारेगमपचेही अंतिम फेरीचे मानकरी ठरले. त्यांचे सुरवातीचे गायनाचे शिक्षण त्यांच्या मातोश्री सौ. अंजली तेलंग यांच्याकडे झाले. त्यानंतर दहा वर्षे त्यांनी पराग जोशी यांच्याकडून शास्त्रीय व सुगम गायनाचे शिक्षण घेतले व गेली पाच वर्षे ते पं. ऋषिकेश बोडस यांच्याकडे शास्त्रीय व नाट्यगीत गायनाचे शिक्षण घेत आहेत. दूरदर्शनवरील एम्‌टूजीटू कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. २०१४ च्या आकाशवाणीच्या अ. भा. सुगम व भजन गायन स्पर्धेत भारतात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.
प्रेरणा दामले वझे
प्रसिद्ध गायिका मुग्धा भट सामंत यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतलेल्या प्रेरणा दामले या कलर्स वाहिनीवरील ‘गौरव महाराष्ट्राचा’’ च्या ‘‘टॉप’’ च्या मानकरी आहेत. दादर- माटुंगा कल्चरल सेंटरची नाट्यसंगीतासाठी त्यांना शिष्यवृत्ती लाभली आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या संगीत नाटक स्पर्धेत सलग तीन वर्षे सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्री म्हणून त्यांनी रौप्यपदक पटकाविले आहे. मानापमान, कट्यार, सुवर्णतुला, ययाती देवयानी यातील प्रमुख भुमिकासाठी त्यांना अ. भा. नाट्य परिषदेचे छोटा गंधर्व गुणगौरव व माणिक वर्मा हे प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभलेत.