मंत्री गावडेंच्या निषेधार्थ सुदिन ढवळीकरांचा सभात्याग

मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी खासदार आझम खान यांनी भाजप खासदार रमा देवी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा काल गोवा विधानसभेत निषेध केला. तसेच कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी जानेवारी २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वापरलेल्या जातिवाचक शब्दाचा निषेध करून काल सभात्याग केला.

आमदार ढवळीकर यांनी शून्य तासानंतर हा मुद्दा उपस्थित केला. सदस्यांनी सभागृहाचे पावित्र्य राखण्याची गरज आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्री गावडे यांनी आपल्याविरोधात जातिवाचक शब्द वापरला होता. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन चौकशी करण्याची गरज आहे, असे ढवळीकर म्हणाले.
आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. असा खुलासा मंत्री गावडे यांनी विधानसभेत केला. तथापि, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित हस्तक्षेप केला. आमदार ढवळीकर यांनी हा विषय आत्ता उपस्थित करणे बरोबर नाही. त्यांनी यापूर्वीच हा विषय उपस्थित करायला हवा होता, असे सावंत यांनी स्पष्ट केले.