मंत्री असताना जयेश साळगावकर यांनी आक्षेप का घेतला नाही?

>> कॅसिनो स्थलांतरावर लोबोंचा सवाल

साळगावचे आमदार जयेश साळगावकर हे बंदर कप्तान मंत्रिपदी असताना मांडवितील कॅसिनोच्या वेरेच्या बाजूने स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यावेळी साळगावकर यांनी कॅसिनो जहाजाच्या स्थलांतराला आक्षेप घेतला नाही. आता, विरोधी पक्षात असल्याने कॅसिनोच्या स्थलांतराला विरोध करीत आहेत, असा आरोप बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.

बंदर कप्तान खात्याने मांडवी नदीतील तीन कॅसिनो मांडवी नदीत वेरेच्या बाजूने स्थलांतरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. साळगावचे आमदार तथा माजी मंत्री जयेश साळगावकर यांनी कॅसिनोच्या वेरेच्या बाजूने स्थलांतराला विरोध केला आहे.
या पार्श्‍वभूमीवर बोलताना बंदर कप्तान मंत्री लोबो यांनी सांगितले की, साळगावकर हे बंदर कप्तान मंत्री असताना कॅसिनोच्या वेरेच्या दिशेने स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाला होती. त्याचवेळी साळगावकर यांनी आक्षेप घ्यायला हवा होता. आता मंत्रिपदावरून हटविल्यानंतर कॅसिनोच्या स्थलांतराला विरोध करणे साळगावकर यांना शोभत नाही, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

मांडवी नदीचा कुठल्याही एका मतदारसंघात समावेश होत नाही. बंदर कप्तान खात्याकडून मांडवी नदीच्या पात्रात सुरू असलेल्या विविध व्यवसायाचे नियोजनाचे काम केले जाते. मांडवी नदीत सहा कॅसिनो जहाजे कार्यरत आहेत. नदीतील कॅसिनो जहाजाचा समतोल साधण्यात येत आहे. तीन कॅसिनो जहाजे पणजी आणि तीन कॅसिनो जहाजे वेरेच्या बाजूने स्थलांतरित केली जाणार आहेत.