भिवपाची गरज आसा

गोव्यातील मांगूर हिलच्या कोरोना संक्रमणाची व्याप्ती वाढत वाढत आता जवळजवळ संपूर्ण गोवाभर पसरली आहे. गोवा हा असे संक्रमण फैलावण्यासाठी किती छोटा प्रदेश आहे ते यातून कळून चुकते. चिंतेची बाब म्हणजे राज्यामध्ये पुन्हा नवे ‘मांगूर हिल’ निर्माण होतील की काय असे वाटायला लावणारी परिस्थिती मोर्ले किंवा चिंबलसारख्या ठिकाणी झालेल्या कोरोना संक्रमणांनी निर्माण केलेली आहे. आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांमार्फत मोर्ले भागात कोरोनाचे संक्रमण पोहोचले. माजी मुख्यमंत्री व पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांच्या आग्रहामुळे आरोग्य खात्याने तेथे प्राधान्याने चाचण्या केल्या आणि आता दिवसागणिक नवे कोरोनाबाधित सापडत आहेत. चाचण्या केल्या गेल्या नसत्या, तर हे बाह्य लक्षणे नसलेले नवे बाधित सापडणेही कठीण होते.
चिंबलमध्येही असेच कोरोना संक्रमण घडले आहे, परंतु चिंबल हे अतिशय दाटीवाटीची वस्ती असलेले गाव आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राजधानी पणजीचे जणू हे उपनगर असल्याने येथील लोकांचा पणजी शहराशी नित्य संबंध येतो. पणजीच्या महापालिका बाजारातील बहुसंख्य गावठी भाजी विक्रेत्या महिला ह्या मुख्यत्वे चिंबलमधून येतात. यापैकी एका भाजी विक्रेती महिला कोविड रुग्णाशी संबंधित असल्याचे आणि शिवाय भर बाजारातील एका तावेर्नच्या चालकाचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येताच तो पळून गेल्याचे समजताच पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी अधिक धोका न पत्करता पालिका मार्केट चार दिवस बंद ठेवण्याचा तत्पर निर्णय घेतला. या मार्केटमध्ये दिवसाकाठी हजारो नागरिक येत असतात, त्यामुळे येथून खरोखरच कोरोना संक्रमण झाले तर त्याची परिणती अतिशय भयावह होऊ शकते.
पणजीतील तावेर्न चालकाच्या पलायन प्रकरणाने तर राज्य प्रशासनाच्या हलगर्जीची पुन्हा एकदा पोलखोल केली आहे. मांगूरहिलमधील संक्रमणाचा अजूनही अज्ञात असलेला स्त्रोत आणि कळंगुटमधील महिलेचा गोव्यात झालेला निर्धोक प्रवेश या दोन घटनांनंतरची प्रशासनाची बेफिकिरी दर्शवणारी ही तिसरी मोठी घटना आहे. मांगूरहिलच्या मच्छिमाराला नेमका कोणापासून संसर्ग झाला हे अजूनही सरकार सांगू शकलेले नाही आणि कळंगुटची ती महिला गोव्यात नेमकी कशी आणि कोणाच्या मदतीने आली हे शोधण्यातही सरकारला स्वारस्य दिसत नाही. दिल्लीहून हा तिसरा महाभाग गोव्यात आला. तेव्हाच्या एसओपीनुसार सक्तीच्या कोविड चाचणीसाठी त्याने अर्ज भरला, त्यामध्ये चक्क आपल्या दारूच्या गुत्त्याचा पत्ता दिला आणि अधिकार्‍यांनी तो विनातक्रार स्वीकारलादेखील! त्यावर कडी म्हणजे अहवाल येईपर्यंत विलगीकरणात राहावे असा सरकारचा एसओपी सांगत असूनही या महाभागाने आपला दारुचा गुत्ता खोलला आणि बिनदिक्कत मद्यविक्रीही केली. आता कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून तो फरार आहे. ही सतत दिसणारी प्रशासकीय बेफिकिरी कित्येक गोमंतकीयांच्या जिवावर बेतू शकते.
राज्याच्या तालुक्या – तालुक्यांतून आढळू लागलेले नवनवे कोरोना रुग्ण आणि त्यांनी गोमंतकीय जनतेच्या मनामध्ये निर्माण केलेली भीती आणि राज्याच्या आरोग्य सचिवांच्या रोज हसत खिदळत चालणार्‍या ‘गुडी गुडी’ पत्रकार परिषदा यांची संगती लागत नाही. राज्याची जनता भीतीच्या सावटाखाली आहे आणि प्रशासन मात्र सारे काही आलबेल आहे असे गोंडस चित्र रंगवण्याच्या धडपडीत सतत दिसते आहे. कोविडसंदर्भातील सरकारी पत्रकार परिषदांतून प्रकर्षाने लक्षात येणारी बाब म्हणजे कळंगुटची घटना असो, नाही तर पणजीच्या गुत्तेवाल्याची, सरकारी प्रवक्त्यांनी सरकारच्या वतीने स्वतःहून कधीच या घडलेल्या चुकांची कबुली माध्यमांना दिलेली नाही. पत्रकारांनीच अन्य मार्गांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सवाल उपस्थित केले, तेव्हा उलट त्यावर सारवासारव करणारी उत्तरे दिली जाताना दिसतात. ही सततची सारवासारव काही आता हळूहळू हाताबाहेर जाऊ लागलेल्या परिस्थितीला सावरू शकणार नाही. प्रशासन अजूनही गोव्याच्या विविध भागांत आढळू लागलेले रुग्ण हे मांगूरशीच संबंधित असल्याचे सांगते आहे. त्याचा सविस्तर तपशील मात्र अजूनही देत नाही. ही लपवाछपवी कशासाठी? आज गावोगावी लोक स्वेच्छेने लॉकडाऊन करीत आहेत, याचाच दुसरा अर्थ सरकार आपले यापुढे कोरोनापासून रक्षण करील यावर जनतेचा भरवसा राहिलेला नाही असाही होतो. त्यामुळे हा गेल्या काही दिवसांत प्रशासनाने गमावलेला विश्वास पुनःप्रस्थापित करण्यासाठी कसोशीने पावले उचलण्याची आता वेळ आलेली आहे. समाजमाध्यमांवरून दिवसागणिक पसरणार्‍या अफवांना आळा घालायचा असेल तर कोरोनासंदर्भात साचेबद्ध आकडेवारी प्रसृत करण्याऐवजी जनतेच्या मनातील भीतीचे निराकरण करणारी गावनिहाय रुग्णांची संख्या आणि त्यांच्या संक्रमण स्त्रोतांसंबंधी सविस्तर माहिती जनतेला नियमितपणे दिली गेली पाहिजे. मांगूर हिलच्या संक्रमणाने आतापर्यंत २९५ चा आकडा गाठला आहे. मात्र, अजूनही त्याचा नेमका स्त्रोत कोण होता याचे उत्तर सरकारपाशी नाही. राज्याच्या विविध भागांत सापडणार्‍या रुग्णांचा मांगूरशीच संबंध जोडला जात असल्याने मांगूरहिलची सतत बदनामी चालली आहे. मांगूरशी संबंधित नवनवी रुग्णसंख्या आता पहिला रुग्ण सापडल्याला बारा दिवस झाले तरी अजूनही थांबताना दिसत नाही. मांगूरमध्ये सेवा बजावलेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या माध्यमातून ज्या ज्या गावांमध्ये संक्रमण जाऊन पोहोचले तेथे आता नवे ‘मांगूर’ निर्माण होणार नाहीत याकडे प्रशासनाने कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्थातच व्यापक चाचण्या व्हाव्याच लागतील. केवळ लक्षणयुक्त व्यक्तींनाच रुग्ण मानून त्यांच्याच चाचण्या करणार ही भूमिका आता चालणार नाही. गोमेकॉतील व्हायरोलॉजी लॅबमध्ये नवे आरटीपीसीआर चाचणी यंत्र आलेले आहे. त्यामुळे चाचण्या करण्याची क्षमता वाढली आहे. त्याचा लाभ घेत, नवे ‘मांगूर’ निर्माण होऊ नयेत यासाठी युद्धपातळीवर व्यापक चाचण्या करून हा वाढता फैलाव रोखला जावा हीच आज जनतेची अपेक्षा आहे.