ब्रेकिंग न्यूज़
भावनांच्या अलवार संवेदना…

भावनांच्या अलवार संवेदना…

  • कालिका बापट

आत्म्याशी आत्म्याचा झालेला संवाद आणि त्यातून सहज भाव उत्पन्न होऊन आपण न बोलताही केवळ ह्रदयाच्या भाषेतून किंवा नेत्रांतून वाहणार्‍या आसवांच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. आसवे केवळ दुख व्यक्त करणारी नसतात. आनंदाच्या क्षणीही डोळ्यांच्या कडा ओलावतात. तो सुखद आनंद व्यक्त करण्याचा भाव असतो. सकारात्मकतेचा आवेश असतो.

बोलणे, शब्दातून व्यक्त होणे याहीपेक्षा भावनांचा अलवार उमाळा किंवा संवेदना नसानसांतून जागृत होणे, किंवा अंग शहारणे, रोमांच उठणे याला काय म्हणणार आपण? शब्दातून व्यक्त होण्यापलिकडले असे हे संवेदनांचे उमाळे. आपल्याला असे अनेक अनुभव येतात. त्याक्षणी बोलता येत नाही. परंतु आत्म्याचा आत्म्याशी जडलेला संवाद आणि त्यातून सहज भाव उत्पन्न होऊन आपण न बोलताही केवळ ह्रदयाच्या भाषेतून किंवा नेत्रांतून वाहणार्‍या आसवांच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. आसवे केवळ दुख व्यक्त करणारी नसतात. आनंदाच्या क्षणीही डोळ्यांच्या कडा ओलावतात. तो सुखद आनंदानुभव व्यक्त करण्याचा भाव असतो. सकारात्मकतेचा आवेश असतो.

परवा इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझातर्फे आयोजित महिला मेळाव्यात प्रा. पौर्णिमा केरकर, विपुला प्रभू, सोनाली शेणवी देसाई यांच्या संयोजनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एकापेक्षा एक असे उत्तमोत्तम कार्यक्रम महिलांनी यावेळी सादर केले. सर्वात रोमांचकारी असा कार्यक्रम झाला तो पौर्णिमा केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेला. पहाटेच्या प्रहरी वासुदेव दारादारातून हरी घोष करीत फिरतो. त्यानंतर महिला आपआपल्या कामात कशा व्यस्त होतात आणि त्याहीपलीकडे स्त्रीची विविध रूपे दाखविणारा, महामायेचा अष्टभुजाधारी अवतार यातून दाखविण्यात आलेला. अतिशय प्रभावी असा हा कार्यक्रम होता. दोन – अडीच वर्षांची छोटी मुलगी ते साठीपर्यंत पोचलेली महिला या सादरीकरणात होती. संपूर्ण रंगमंचावर सादरीकरण चालू असतानाच प्रेक्षकांमधून निघालेली दिंडी अतिशय प्रभावी होती. काय होतं, काय नाही याची कल्पनाच प्रेक्षकांना सुखावणारी होती. सारे प्रेक्षागृह या सादरीकरणाने भारावून गेले होते. केवळ जाणवत होता आनंदानुभव. हे काहीतरी अप्रतिम, अवर्णनीय असेच काहीसे घडत होते. कार्यक्रम संपल्यावर प्रत्येकानं एकाच वाक्यात स्तुती केली. अंगावर रोमांच उठले. काय होती ही भावना? जे मी अनुभवले तेच तर इतरांनीही अनुभवले. आत्म्याशी आत्म्याचा जडलेला हा संवाद वैश्विक असल्याने प्रत्येकाला तोच अनुभव त्याक्षणी आला. काय होतं या क्षणी? केवळ नेत्रेच नाही सुखावत तर अंगांग शहारून जातं. मनाची, ह्रदयाची कवाडे खुली होतात आणि एका वेगळ्याच अशा वैश्विक आनंदाचा अनुभव आपल्याला होतो. आपल्यातीलच महिला, आपल्यातीलच माणसे अशी ह्रदयाची भाषा बोलून जातात, सांगून जातात बरंच काही. आपण केवळ आनंद तेवढा त्याक्षणी अनुभवत असतो. कालांतराने आपण ही गोष्ट विसरून जाऊही. परंतु त्या घडीचा, त्या क्षणाचा विसर तो पडणार नाही. कारण त्याक्षणी वेगळाच असा आत्मिक आनंद आपण अनुभवलेला असतो. सर्वांनी त्याक्षणी कलाकारांची, पौर्णिमा केरकरांची प्रशंसा केली. यातून त्या अप्रतिम सादरीकरणाचे आत्मभान जाणवते.

असाच अनुभव येतो, जेव्हा जगन्माता म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंधुताई सपकाळ यांना आपण त्यांच्या कार्यक्रमातून, भाषणातून ऐकतो. कार्यक्रमातून आपले दुख व्यक्त करून पदर पसरणे हे काहींना खटकतं. परंतु यामागील भावना कुणी जाणल्या? सिंधुताईंचे पुर्वायुष्य फार हलाखीचे गेले. ते ती आपल्या भाषणातून व्यक्त करते. परंतु आपल्या पुर्वायुष्यातील नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलून त्यांनी नवी आयुष्ये घडविण्याचे कार्य केले आहे, हे आपण कसे विसरून चालेल? एका नवीन जीवाला जगात आणण्याच्या वेळीच तिच्यावर ओढवलेले संकट होते ते. परंतु सिंधुताईंनी सकारात्मकतेने सारे दुख पेलले. एका नवीन जीवाला जन्म देतानाच अवघ्या विश्वाची जननी होण्याचा ध्यास त्यांनी घेतला. जेव्हा आजुबाजुला आपल्यासारखीच अनाथ वणवण फिरतात, हे दृष्य तिने पाहिले तेव्हा ती खचली नाही. उलट त्या वणव्यातून नवी आयुष्ये त्यांनी घडविली. सिंधुताई आपल्या भाषणातून आपले पुर्वायुष्य जेव्हा सांगतात तेव्हा अंगावर शहारे उठतात. डोळ्यांतून आसवांची धार वाहू लागते. हे केवळ एकाच्या किंवा दोघांच्या बाबतीत होत नाही. प्रेक्षागृहातील उपस्थित माणसे हा अनुभव घेत असतात. कारण प्रत्येकाच्या ह्रदयाला स्पर्शून गेलेली त्यांची कथा , त्यांची व्यथा सांगून जाते. ज्यांनी सिंधुताईंना ऐकलेय त्या प्रत्येकाला हीच अनुभूती आली असेल. सिंधुताईंचे आयुष्य फार कष्टात गेले, दुखात गेले. आज त्यांना मान आहे, सन्मान आहे. हजारो अनाथांची माता ती आहे. एवढेच नव्हे तर देश विदेशात जाऊन त्या जगण्याविषयीचा अर्थ सांगून लोकांना मार्गदर्शन करीत असतात. याचा अर्थ हाच की सिंधुताईंनी आपल्या पुर्वायुष्यातील नकारात्मकतेला सकारात्मकतेत परिवर्तित करून नवी आयुष्ये घडविण्याचे कसब जाणले आहे. हे सार्‍यांनाच जमत नाही. यासाठी दूरदृष्टी लागते. सिंधुताईंनी त्यांना केवळ आधार दिला नाही तर माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखविला. ही केवढी सकारात्मकता!!
अशी कितीतरी उदाहरणे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात आपल्याला अनुभवायला मिळतात. झाडे शहारताना पाहिलीत का कधी? असा अचानक पाऊस शिरशिरायला लागला की झाडेही शहारू लागतात. पानन्‌पान नाचू लागतं. नाजुकसा थेंब पानांच्या कोमलतेला स्पर्शून गेला की तीही आनंदतात. हलकासा गार वारा हलकेच स्पर्शून गेला तरीही त्यांना आनंदानुभूती प्राप्त होते. काहींना हे पटणार नाही. परंतु खरंच अनुभवायचेय तर पाहा जवळून झाडांना, वेलींना, फुलांना. पहिला पाऊस स्पर्शून गेला की का रंग बदलतात झाडे? आपण वर्षभर आपल्या दारातील, बागेतील झाडांना पाणी देतो. मग असा हिरवा रंग नसतो त्या झाडांना. पाऊस झडायला लागला की त्यांनाही रंगायचे वेड लागते. तीही शहारतात पावसासंगे आनंदाने बेभान होऊन!

झाडे माणसाळलेली असतात. खासकरून आपल्या बागेतील फुलझाडे, नारळाची झाडे. कुळागरातील पोफळी, माड बोलतात एकमेकांशी असे आमच्या येथील कुळागरात काम करणारी बाई अनेकदा सांगे. ती सतत सांगायची. अधून मधून येत चला घरी. झाडे पोरकी होतात. माडांना सहवास लागतो माणसांचा. मला तिचे बोलणे पोरकट वाटायचे. गावातली बाई. कदाचित गावाविषयी अधिक प्रेम असल्यामुळे असावे कदाचित तिला असे वाटे. पुढे कधीतरी माझ्या वाचनातही ते आलेले आणि मग विचारांना गती मिळाली. विचार करायला वाव मिळाला. वार्‍याने झावळ्या हलल्या की खरंच वाटू लागतं की माड बोलतात. आपण जवळ गेलो की आनंदाने नाचायला लागतात. काय असेल त्यातील सत्य माहित नाही. परंतु जाणीव मात्र होऊ लागते. आपल्या असण्याचा आनंद ही झाडे साजरी करतात. वर्षानुवर्षे बंद असलेल्या घरासमोरील फुललेल्या बागा आपण पाहिल्यात का? निर्जिव भासतात जणू. अशावेळी झाडांनाही माणसांचा सहवास हवा असतो, हे पटायला लागतं.
कधी कधी खरंच पटू लागतं हे सारं. प्रवेशद्वारावरील सुगंधी मोगर्‍याची वेल, कृष्णकमळाची वेल वाट काढीत खिडकीपर्यंत पोचते कशी? झाडे वाढायला लागली की आपण त्यांच्या फांद्या छाटतो झाडांना नवीन फांद्या येण्यासाठी. मुळात झाडे हात फैलावून आपल्याशी मैत्रीचे नाते जोडतात हेच तर सत्य आहे.

काही वर्षांपूर्वी आम्ही मिरामार येथील धेंपे कॉलेजच्या मागे असलेल्या कॉलनीत वास्तव्याला होतो. तिथे पिवळ्या फुलांची गुलमोहरासारखी मोठाली झाडे आहेत. संपूर्ण परीसर या झाडांनी व्यापलेला. आमच्या कॉलनीत मोठी बाग होती आणि कॉलनीचा मागचा परीसर या मोठाल्या झाडांनी वेढलेला. तर आमच्या गॅलरीत ही झाडे सतत डोकावत. फुलांचा सडा टाकत. खुप छान वाटे त्यावेळी. पावसाळा जवळ आला कि महानगरपालिकेचे कामगार या झाडांच्या फांद्या छाटत असत. मग पाऊस सुरू झाला की ही झाडे पुन्हा आमच्या गॅलरीत डोकावत. माझा सवडीचा वेळ या झाडांसोबत जायचा. झाडे माणसाळतात हे कळल्यापासून मी खरोखर झाडांशी बोलत असे आणि झाडांना हलकेच एखादी झुळूक स्पर्शून गेली की त्या फांद्या हलायच्या. मी मानून चालले होते, की झाडे माझ्याशी बोलतात. आपणासही हे खरेच पटेल. आमच्या या गॅलरीत वेळ असेल तेव्हा खुर्ची टाकून मी बसत असे माझ्या, इतरांच्या कविता मोठ्याने वाचत. आणि आश्चर्य म्हणजे गॅलरीभर पसरलेल्या फांद्या जणू त्यांना ऐकू येत असल्यागत डोलत असत. पुढे एकदा पावसाळा यायच्या आधी महानगरपालिकेच्या कामगारांनी इमारतीला वेढलेल्या फांद्या छाटल्या. त्यात आमच्याही गॅलरीतल्या फांद्या गेल्या. खुप वाईट वाटलं खरं. परंतु वाढलेली झाडे कापणे हा नियम असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पावसाळा मध्यावर पोचेपर्यंत पुन्हा त्या झाडांच्या फांद्या हळुहळु आमच्या गॅलरीत झेपावू लागल्या. मी रोज अंदाज घ्यायचे. इतक्या भराभर त्या वाढत होत्या की त्यांना माझ्यापर्यंत पोचण्याचा जणू ध्यासच लागला होता. माझ्या कविता ऐकण्याचा छंद त्यांना लागला होता. तर अशी असतात ही प्रेमळ झाडे आणि त्यांच्या अलवार मृदू भावना.

आपण ब्रम्हकमळाला कळ्या आल्या की भारावून जातो की नाही? त्यांच्या फुलण्याची वेळ आली की मग रात्रभर त्यांच्या फुलण्याचा आनंद साजरा करीत असतो. आपल्याला एखादे नवीन फुल दिसले की आपण ते बाजारातून विकत आणतो किंवा मैत्रिणीकडे असलेले झाड आवडल्यास ते मागून आणून लावतो. त्या झाडाची सुश्रुषा करतो. पाणी, खत घालून त्याला वाढवतो. मग कधीतरी त्या झाडाला कळ्या आल्यायेत हे आपल्या लक्षात आल्यावर आपण शहारून जातो. आणि एकेदिवशी सकाळचा चहा घेता घेता बागेत नजर फिरवल्यावर आपल्या दृष्टीस पडते उमललेली कळी. त्या फुलाला पाहून वेगळ्याच आनंदाचा अनुभव आपण घेतो. आपण जे जसे फूल पाहिले होते अगदी तसेच फूल आपल्या दारात पाहिल्यावरचा आनंद तो काय वर्णावा? आत्मिक सुखाची कल्पना याहून वेगळी ती काय? अंग शहारतंच. मनही शहारतं. त्याक्षणी आपल्याला लाभलेला आनंद काही औरच असतो. म्हणूनच ह्रदयाची कवाडे खुली करून आपण त्या नवीन फुलाचे बहरणे साजरे करतो. माहीत असते आपल्याला की संध्याकाळपर्यंत हे फुल कोमेजणार. तरीही त्या फुलाला येता जाता न्याहाळत त्या फुलातील सौंदर्य आपण भरभरून न्याहाळत तो आनंद ह्रदयात साठवून ठेवतो. असे भावनांचे अलवार उमाळे येतात आणि जातात. परंतु त्या भारलेल्या क्षणांना आपण आपल्या ह्रदयाच्या नाजुकशा कप्प्यात दडवून ठेवतो. कधीतरी पुन्हा त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी.