भारत – विंडीज सामना आज

भारत व वेस्ट इंडीज यांच्यात आज गुरुवारी क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील सामना रंगणार आहे. भारताने आपले पाच पैकी चार सामने जिंकले असून विंडीजला ६ पैकी चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. विंडीजचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर गेला असून आजचा विजय भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास नक्की करणार आहे.

मँचेस्टरच्या या मैदानावर भारताने पाकिस्तानला लोळविले होते. फलंदाजी विभागात रोहित, विराट, राहुल यांनी चमकदार कामगिरी केली होती. वेस्ट इंडीजला याच मैदानावर न्यूझीलंडकडून पाच धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला होता. कार्लोस ब्रेथवेट याचे झुंजार शतक निष्फळ ठरले होते. भारत तसेच विंडीजला या मैदानावरील परिस्थितीचा पूर्ण अंदाज असल्याने सामना अटीतटीचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या सामन्यात पावसाची शक्यता नसल्याने पूर्ण खेळ अपेक्षित आहे. कडक उन पडल्यास भारतीय फिरकी गोलंदाज प्रभावी कामगिरी करू शकतात. ढगाळ वातावरणाचा वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. विंडीजने आपला प्रमुख वेगवान गोलंदाज किमार रोच याला एकाही सामन्यात उतरवलेले नाही. आज मात्र तो खेळण्याची शक्यता आहे. फलंदाजी विभागात ख्रिस गेल, हेटमायर, पूरन यांच्यावर त्यांची मदार असेल.

भारत संभाव्य ः रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल व जसप्रीत बुमराह.
वेस्ट इंडीज संभाव्य ः ख्रिस गेल, शेय होप, डॅरेन ब्राव्हो, निकोलस पूरन, सुनील अंबरिस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, कार्लोस ब्रेथवेट, किमार रोच, ओशेन थॉमस व शेल्डन कॉटरेल.