ब्रेकिंग न्यूज़

भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील कालचा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला आहे. २ विजय (४ गुण) आणि १ सा’ना रद्द (१ गुण) झाल्यामुळे टीम इंडियाचे सध्या ५ गुण आहेत. तर न्यूझीलंडचे आता ७ गुण झाले आहेत.

बुधवारपासूनच या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार नाणेफेकीच्या नियोजित वेळेच्या आधीपासूनच पावसाने जोर धरला होता. पावसाच्या आगमनामुळे सामन्याची नाणेफेक पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३ वाजता पंचांनी खेळपट्टीचे परीक्षण केले. पण दुर्देवाने पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि सामना रखडला.

तासाभराने पावसाने विश्रांती घेतली पण मैदानामध्ये ओलावा राहिल्याने सामना सुरु करणे शक्य झाले नाही. पुढे साडेसात वाजता पंचांनी खेळपट्टीचे अखेरचे परीक्षण केले आणि सामना होऊ शकणार नसल्याचे जाहीर केले. बुधवारी केदार जाधवने ‘जा रे जा रे पावसा, माझ्या महाराष्ट्रात जा, तुला माझ्या महाराष्ट्रात जायची गरज आहे, अशी आर्त हाक घालणारी दहा सेकंदाची क्लिप पोस्ट केली होती. यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेमध्ये पावसामुळे रद्द होणारा हा तिसरा सामना आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. आगामी काळातही पावसाचा व्यत्यय येत राहण्याची शक्यता असल्याने चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.