ब्रेकिंग न्यूज़

भारत की बात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पुढील महिन्यात चार वर्षे पूर्ण होतील. आता या सरकारचे एकच वर्ष राहिले आहे. पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकांना नव्याने सामोरे जायचे आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकताच इंग्लंड दौर्‍यात लंडनमध्ये तेथील भारतीयांशी जो जाहीर संवाद साधला, तो त्यांच्या एरव्हीच्या नित्य मौनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो. आपल्या सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कामगिरीबरोबरच देशातील वाढत्या बलात्कारांपासून विरोधकांकडून सतत होणार्‍या टीकेपर्यंत सर्व प्रश्नांना त्यांनी त्यात मनमोकळी उत्तरे दिली आहेत. स्वतःची एक ‘स्टेटस्‌मन’ अशी जी प्रतिमा मोदी घडवत आले आहेत, त्याचाच हा आविष्कार म्हणता येईल. त्यांची भाषा, देहबोली यातून या प्रतिमानिर्मितीच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांचा साक्षात्कार सतत घडत असतो. या संवादामधूनही ते नानाविध प्रश्नांना खंबीरपणे सामोरे गेले. वरवर पाहता हा संवाद विदेशस्थ भारतीयांशी होता, परंतु देशवासीयांनाही जणू ते अप्रत्यक्ष संबोधित करीत होेते. भाजप विरोधात असताना ज्यांना ‘मौन मोहन’ म्हणून हिणवत होते, त्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतीच ‘मोदींनी आता बोलावे’ असे खडे बोल सुनावले होते, त्या पार्श्वभूमीवर हा संवाद उठावदार ठरला तर नवल नाही. सध्या देशभरामध्ये बलात्कारांच्या अत्यंत घृणास्पद घटनांनी सामाजिक वातावरण कलुषित झालेले आहे. आपल्या एवढ्या विशाल देशात चांगले काही घडतच नाही की काय असे वाटावे असा सगळा माहौल आहे. या विषयावर पंतप्रधान का बोलत नाहीत असा टीकेचा सूर विरोधकांनी लावून धरला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी बलात्काराच्या या घटनांचा विकृती म्हणून निषेध करतानाच आपण मुलींना नेहमी तू काय करतेयस म्हणून विचारतो, तसे मुलांनाही का विचारत नाही? कोणताही गुन्हेगार हा शेवटी कोणाचा तरी मुलगा असतो. घरी त्याची आई असते याची आठवण करून दिली आहे. सरकारच्या चार वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत असल्याने सरकारच्या कामगिरीसंबंधी प्रश्न येणे स्वाभाविक होते. त्यावर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत हे सांगताना त्यात काही गैर नाही व त्यांची पूर्तता करणे हे सरकारचे काम आहे अशी कबुलीही त्यांनी दिली आहे. निराशेच्या स्थितीतून आज भारतीयांच्या मनात उमंग, आशा, अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. लोकांना गप्प करणे हे सरकारचे काम नव्हे, तर आपण कोठे चुकतो, कसे चुकतो त्यावर विचार करणे हे आपले काम आहे असा समस्त भाजपाई नेत्यांनी लक्षात ठेवावा असा संदेश पंतप्रधानांनी दिलेला आहे. टीका ही स्वागतार्ह असली पाहिजे आणि टीकेनेच लोकशाही बळकट होत असते हे मोदींचे शब्द भाजपच्या सर्व सरकारांनी आणि नेत्यांनी दगडावर कोरून ठेवावेत असे आहेत. आपल्यावरील क्षुल्लक टीकेनेही अस्वस्थ होणार्‍या समस्त नेतेमंडळींनी त्यापासून बोध घेणे जरूरी आहे. ‘‘जो करेगा, उसेही कहेंगे’’ हे मोदींचे म्हणणे खोटे नाही. आरोप बिनबुडाचे मात्र असू नयेत ही त्यांची अपेक्षाही रास्त आहे. आपल्या तंदुरुस्तीचे गमक सांगताना ‘‘गेली वीस वर्षे मी रोज एक – दोन किलो शिव्या खातो’’ असे ते विनोदाने म्हणाले. श्रोत्यांशी संवाद कसा साधावा आणि विनोदाचा आधार घेऊन त्यांना कसे जिंकावे याचा हा वस्तुपाठ म्हणावा लागेल. आपल्या सरकारवर होणार्‍या ‘सूट बूटकी सरकार’ या टीकेचेही त्यांना पुरेपूर भान असल्याचे दिसले. आपण गरीबीतून वर आलेलो आहोत, चहावाल्याचा मुलगा आहोत हे अधोरेखीत करताना आपल्याला गरीबी पुस्तकात वाचून शिकावी लागली नाही असा भीमटोलाही त्यांनी हाणला. आपण सव्वाशे करोड भारतीयांचे सेवक आहोत ही भूमिका त्यांनी येथेही मांडली. आपल्या सरकारची प्राधान्ये विशद करताना मुलांसाठी शिक्षण, तरुणांसाठी रोजगार आणि ज्येष्ठांसाठी औषधे अशी त्रिसूत्री त्यांनी सांगितली. या तिन्ही आघाड्यांवर सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा अर्थातच मांडला जाणार आहेच. सर्जिकल स्ट्राईक्सपासून शौचालयांपर्यंत विविध प्रकारचे प्रश्न मोदींना यावेळी विचारले गेले होते. दहशतवादासंदर्भात आपली नीती स्पष्ट करताना भारत शांतताप्रेमी देश आहे, परंतु दहशतवादाची निर्यात करणार्‍या देशाला कसे प्रत्युत्तर द्यावे हे आपल्याला चांगले ठाऊक आहे असेही ते म्हणाले. या सगळ्या संवादाकडे पाहिल्यास त्यातील बहुतेक विषयांवरील त्यांच्या उत्तरांत नवीन असे काही नाही. ही भूमिकाच ते सातत्याने मांडत आलेले आहेत. आपल्या सरकारप्रती होत असलेल्या टीकेबाबतची त्यांनी ठामपणे व्यक्त केलेली स्वागतार्हता अर्थात कृतीमधूनही दिसायला हवी. एकंदरीत २०१९ चे लक्ष्य समोर ठेवूनच ही ‘भारतकी बात’ घडवण्यात आली. लंडनमध्ये ती झाल्याने जागतिक पातळीवर हा संवाद पोहोचला. त्याची बातमी झाली. अर्थात, सरकारच्या एकूण कामगिरीत ‘बात’ किती आणि ‘बाता’ किती हे शेवटी या देशाची सव्वाशे करोड जनता ठरवेलच, परंतु ज्या मनमोकळेपणाने ही बातचीत झाली, तो संवादाचा सेतू या सरकारने कायम ठेवावा हीच याक्षणी जनतेची अपेक्षा आहे. सत्ता आणि जनता यामध्ये अंतर पडताना दिसत असल्याने या सेतूची आज खूप गरज आहे.