भारतीय भक्तिसंस्कृतीचा अनभिषिक्त सम्राट : भगवान श्रीकृष्ण

भारतीय भक्तिसंस्कृतीचा अनभिषिक्त सम्राट : भगवान श्रीकृष्ण

– डॉ. पांडुरंग फळदेसाई
श्रीकृष्ण ही भारतीयांची आवडती विभूती. खरे तर प्रभू रामासारखा कृष्ण हा श्रीविष्णूचा अवतार; परंतु भारतीय जनमानसाला तो आपल्या कुटुंबाचाच एक घटक वाटतो, इतकी कृष्णचरित्राची विलक्षण आणि अवीट मोहिनी भारतीय लोकमानसावर आहे. श्रीकृष्णाविषयीच्या विविध कथा, भारतीय साहित्यातील कृष्णकाव्ये आणि कृष्णगीते, प्रांताप्रांतांतील कृष्णविषयक विविध चित्र-शिल्प शैली, त्याची देशभर असलेली मंदिरे यांचा विचार केला म्हणजे श्रीकृष्णाविषयीच्या प्रेमाची, भक्तीची आणि आत्मीयतेची कल्पना येते.
बालपणापासून श्रीकृष्णाच्या या भक्तिसंप्रदायाची साथ आम्हाला लाभली. गोव्यातील घराघरांतून कृष्ण-जन्माष्टमीच्या रात्री केली जाणारी या युगपुरुषाची साग्रसंगीत पूजाअर्चा ही आम्हा लोकांची श्रीकृष्णचरित्राशी पहिली ओळख होती. जन्माष्टमीनिमित्त दिवसभराचा उपवास करून ही उपासना सुरू होते आणि अष्टोत्तर तुळशीपत्रे श्रीकृष्णाला विष्णुसहस्रनामाच्या जपाबरोबर अर्पण करून मध्यरात्री तिची समाप्ती होते. समारोपाचा सोहळा हा आबालवृद्धांसाठी आनंदाचा असतो. पोह्यांचे विविध प्रकार आपल्यापुढील पानात येतात व श्रीकृष्णाचा परमेश्‍वरी प्रसाद या भावनेने प्रत्येक भाविक त्यांचा स्वीकार करून आपला दिवसभराचा उपवास सोडतो. त्यापाठोपाठ कृष्णाच्या बाललीलांची ओळख होते ती गोव्यातील पारंपरिक स्वरूपाच्या ‘कालो’ या लोकनाट्यातून. या काल्याच्या पूर्वार्धात पूतनावधाचा प्रसंग रंगविलेल्या लाकडी मुखवट्यांच्या माध्यमातून सादर केलेल्या नाट्यात येतो. पहाटेच्या प्रहरी बहुतेक मंदिरांच्या जत्रोत्सवांतून ‘दहिकाला’ होऊन उत्तरार्ध संपन्न होतो. या दहिकाल्यात मंदिराच्या प्राकारात उंचावर बांधलेले दह्याने भरलेले मातीचे मडके एखाद्या मुलाला उंचावर उचलून फोडले जाते. त्यातून ओघळलेले सर्व दही पोह्यात कालवून तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात. काही ठिकाणी दह्यात कालवलेले पोहे सभोवार शिंपडतात. त्यानंतर श्रीकृष्णाची (बाळकृष्ण) लाकडी मूर्ती एका झोळीवजा झुल्यात घालून त्याला झोके देत- ओजवत- जोजवत मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा होते. यावेळी उजाडलेले असते. त्यामुळे विविध भूपाळ्यादेखील म्हटल्या जातात. या दहिकाल्याने उत्सव संपन्न होतो. पूतनावध करणार्‍या आणि गवळणींना फसवून दह्यावर ताव मारणार्‍या बाळकृष्णाची ओळख या लोकनाट्यातून गोमंतकीय बालमनाला परंपरेने होत आली आहे. मध्य गोमंतकात ‘गवळणकाला’ नावाचे लोकनाट्य सादर होते. त्यातूनही बाळकृष्णाच्या विविध लीलांचे सादरीकरण लोकनाट्याच्या स्वरूपात सादर केले जाते. त्यामुळे कृष्णाने बालमनाला भुरळ न घातली तरच नवल! त्याशिवाय दीपावलीच्या दिवशी गावच्या मंदिरांतून सांगितल्या जाणार्‍या ‘पुराणा’द्वारे पराक्रमी कृष्णाची ओळख जनमानसाला होत आली आहे. त्याशिवाय नरकासुर वधाच्या परंपरेतूनही कृष्णपराक्रमाचे दर्शन होत असते.
गोव्यात प्राचीन काळापासून गोपालन आणि कृषिसंस्कृती हातात हात घालून नांदताना दिसतात. त्याचे प्रत्यंतर काही विधी आणि उत्सवांमधून येते. दिवाळीनंतर येणार्‍या प्रतिपदेला अन्य ठिकाणी गोवर्धनपूजा होते; परंतु गोव्यात मात्र या दिवशी गायी-गुरांची पूजा केली जाते. त्या दिवशी गुराख्याला ‘गोपाल’ स्वरूपात पाहिले जाते आणि त्याला सन्मानाची वागणूक दिली जाते. गुरांना अर्पण केलेल्या प्रत्येक वस्तू आणि पक्वान्नाच्या अर्ध्या हिश्श्यावर त्यादिवशी गोपालाचा अधिकार मान्य केलेला असतो. याच दरम्यान गोव्यातील ग्रामीण भागात कृष्णपूजेचा विधी केला जातो. आमच्या बालपणी ही कृष्णपूजा गावाबाहेर असलेल्या उघड्या माळावर अथवा पारावर साजरी केली जायची. गावातील सगळे ‘गोपाळ’ एकत्र येऊन ही पूजा घडवून आणीत. त्यासाठी मातीची रंगविलेली कृष्णाची मूर्ती आणून सजविण्यात येते. तिची यथासांग पूजा झाल्यावर सुके पोहे आणि खोबरे प्रसाद म्हणून देतात. अलीकडे पावसाळ्याचे वेळापत्रक सतत बदलत राहिल्याने आता ही कृष्णपूजा खास उभारलेल्या कायमस्वरूपी छपराखाली होऊ लागली आहे. त्यासाठी गावागावांतून गोपाळकृष्ण मंडळे कार्यरत झाली आहेत. अनेक ठिकाणचे ‘मांगर’ आणि ‘कृष्ण-मठ’ याची साक्ष देतात. धेणलो हादेखील यासंदर्भातील गुराख्यांचाच विधी म्हणता येईल.
श्रीकृष्णचरित्रात तसा गोव्याचा उल्लेख नाही. परंतु अपवाद म्हणून एक उल्लेख सांगता येईल. जरासंधाच्या राजवटीला सतरा वेळा तोंड देऊन झाल्यावर मथुरेतील नागरिकांना नव्याने वसविलेल्या द्वारकेला पाठविताना कृष्ण त्यांना सांगतो की, आपण बलरामाबरोबर गोमन्तपर्वतावर जातो. त्यामुळे आपला पाठलाग करणार्‍या जरासंधाच्या सैन्यापासून मथुरावासीयांची सुटका होईल व त्यांचा द्वारकेला जाण्याचा मार्ग निर्विघ्न होईल. परंतु गोव्यातील नार्वे या गावी कृष्णजन्माच्या दिवशी भरणारी जत्रा सोडली आणि कुटुंबातील उपवास- उपासना सोडली तर गोव्यात विशेषत्वाने कृष्णाविषयीचा उत्सव होत नाही. गोव्यात कृष्णाची मंदिरे अगदी मोजकी आहेत. कुठ्ठाळी गावात गोपिनाथाचे (कृष्ण) प्राचीन मंदिर असल्याचा उल्लेख सापडतो. देवकी-कृष्णाचे मूळ चोडण बेटावरील मंदिर आता माशेल गावी दिसते. राधाकृष्णाचे मंदिर साखळी येथे आहे, तर गोपीनाथाचे देऊळ नेतुर्ली गावात आहे. याच गोपीनाथ मंदिरासमोरील तळी ही ‘बुडबुडतळी’ म्हणून प्रसिद्ध आहे. केशव आणि दामोदर ही कृष्णाचीच नावे. जांबावली आणि लोलये (काणकोण) येथील दामोदराची देवळे आणि लोलये गावातील केशव देऊळ सोडल्यास गोव्यात कृष्णमंदिरे अभावानेच सापडतात. नाही म्हणावयास कुंकळ्ळी येथेही कृष्णमंदिर आहे. कृष्णाची मंदिरे जरी तुलनात्मकदृष्ट्या कमी वाटली तरी गोवा कधीही कृष्णभक्तीत मागे राहिला नाही. गोव्यातील विविध काल्यांसारखी लोकनाट्ये जशी याची साक्ष आहे तसेच कृष्णदास श्यामाचे श्रीकृष्णचरितकथा हा ऐतिहासिक ग्रंथदेखील साक्ष म्हणता येईल. एकनाथांसारख्या संतकवींनी रचलेल्या गवळणी गोमंतकीय भजनगायनाचा एक महत्त्वपूर्ण घटक बनून राहिला आहे. गोव्याच्या धालो उत्सवातील अनेक गीते जशी कृष्णचरित्रावर आधारलेली आहेत, त्याचप्रमाणे शिगम्यातील गोफसारखी नृत्ये आणि तालगडीसारखे प्रकार व त्यासाठी गायली जाणारी लोकगीते ही कृष्णचरित्राची ओळख करून देणारी आहेत. शिगमोत्सवातील तालगडी प्रकारात अनेक ठिकाणी नृत्याची सुरुवात ‘गोपाळकृष्ण महाराज की जय’ या घोषणेने होते.
कृष्णचरित्र म्हणजे अलौकिक आणि अद्भुत प्रसंगांचा ठेवा. अद्भुताचे पारणे फिटावे असे प्रसंग कृष्णचरित्रामध्ये एकामागून एक येत असतात. त्याचा जन्म हा श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री झालेला. जन्मतःच त्याचे रूप म्हणजे चतुर्भुज असा मानवदेह धारण केलेली विष्णुमूर्ती. त्याच्या जन्माबरोबरच त्याचे आईवडील देवकी आणि वसुदेव यांच्या हातापायांतील बेड्या खळाखळा तुटून पडतात. देवकीच्या विनंतीवरून चतुर्भुज कृष्ण बाळकृष्णाचे रूप घेतो. वसुदेव धो-धो कोसळणार्‍या पावसात त्या बाळकृष्णाला एका टोपलीत घालून आपल्या डोकीवर घेतो आणि यमुनाकाठी पोचतो. दुथडी भरून वाहणारी यमुना कृष्णस्पर्शाने दुभंगते व वसुदेवाला गोकुळात जाण्याचा मार्ग मोकळा होतो. वसुदेव परत येताना नंदगोपाची तान्हुली सोबत आणतो. दुसर्‍या दिवशी त्या बालिकेला ठार करू निघालेल्या कंसाच्या हातून ती बालिका निसटते. ती बालिका शारदादेवीचे रूप घेऊन ‘तुझा शत्रू अन्यत्र वाढतो आहे’ अशी आकाशवाणीद्वारे सांगावा देते. -आणि कंस पुन्हा भीतीच्या वातावरणात चिंतामग्न होतो.
गोकुळात वाढणारा कृष्ण म्हणजे सर्वांसाठी एक अलौकिक अनुभूती. स्तनपान करून पूतना राक्षसीचा वध करणारा बाळकृष्ण, तृणावर्त दैत्याला संपविणारा, उखळाच्या जोरावर दोन अर्जुनवृक्ष भुईसपाट करणारा, उन्मत्त बैलाशी झुंज देऊन त्याला गतप्राण करणारा, उधळलेल्या घोड्याला काबूत आणून ठार करणारा, बिथरलेल्या कुलयापीड हत्तीचे निर्दालन करणारा, बलवान मल्ल चाणूराचे यशस्वी मर्दन करणारा, कंसवध करून त्याचा पिता उग्रसेन याला राज्य मिळवून देणारा, यशोदेला आपल्या बालमुखातून विश्‍वरूपदर्शन घडविणारा, गोकुळाला दावाग्नीपासून वाचविणारा, इंद्रध्वजोत्सवाऐवजी पर्वतपूजन केले म्हणून आलेल्या महापुराच्या वेळी आपल्या करंगळीवर गोवर्धन पेलून समस्त गोकुळवासीयांचे रक्षण करणारा, कालियामर्दनाचा अद्भुत पराक्रम गाजवणारा, आपल्या गुरूला (सांदिपनी ऋषी) त्यांचा मेलेला पुत्र पुन्हा जिवंत रूपात आणून देणारा आणि सदा खोडकर गोपीजनवल्लभ असा हा वनमाळी म्हणजे एक अलौकिक युगपुरुष म्हणावा लागेल.
अनेक जुलमी राज्यकर्ते, दैत्य, असुर, राक्षस यांचा योग्यवेळी वध करून कृष्णाने आपल्या अवतारकार्याला पूर्णत्व आणून दिले. शिशुपाल, पौंडूक, शाल्व, दंतवक्र, शृगाल, विदूरथ, कंस इत्यादी राजे; वत्सक, अघासुर, प्रलंब, शंखचूड, धेनुकासुर हे असुर; शकटासुर, वृषभासुर, केशी इत्यादी दैत्य-राक्षस यांचा कृष्णाने केलेला वध म्हणजे तत्कालीन समाजात स्थैर्य, शांती आणि सुराज्य स्थापनेसाठी दिलेले महान योगदान म्हणावे लागेल. मानवी आयुष्याच्या सत्यरूपाचा साक्षात्कार घडवून जीवनाच्या इतिकर्तव्याचे तत्त्वज्ञान सांगणारा कृष्ण म्हणजे वैश्‍विक जीवनपद्धतीचा आदर्श होय. युद्धभूमीवर शत्रुस्थानी स्वकीयांची उपस्थिती पाहून संभ्रमित झालेल्या अर्जुनाला भगवद्गीतेच्या रूपाने बोधामृत पाजणारा हा गीतावक्ता दैवी महामानव म्हणावा लागेल.
कृष्ण ही ऐतिहासिक व्यक्ती होती याबद्दल आता संशोधकांमध्ये दुमत नाही. सर्वसामान्यपणे कृष्णाचा काळ हा सनपूर्व तीन हजार वर्षेे मानला जातो. परंतु इतिहासकारांच्या मते तो सनपूर्व चौदावे शतक असा निश्‍चित झाला आहे. म्हणजे साडेतीन हजार वर्षांपासून ही कृष्णकथा भारतीयांसोबत आहे. त्याच्या संपूर्ण जीवनप्रणालीतून त्याची अलौकिक बुद्धिमत्ता दिसून येते. तो व्यापक अर्थाने हिंदू धर्मपरंपरांना उजाळा देणारा देदीप्यमान धर्मसुधारक होय. लोकहिताला सदैव जपणारा असा हा महामानव होता. लोकहिताला जे जे अनुकूल ते ते सत्य होय हा कृष्णाच्या जीवितकार्याचा संदेश आजच्या लोकशाहीप्रणालीचा महामंत्र बनून राहिला आहे. कृष्णाचे तत्त्वज्ञान आणि त्याचे युद्धकौशल्य बिनतोड म्हणायला हवे. स्वतः युद्धकलेत आणि विशेषतः गदायुद्ध, मल्लयुद्ध यांमध्ये निष्णात असलेला कृष्ण आपल्या मनात नसतोच मुळी. कारण वासुदेवभक्ती संप्रदाय सर्वत्र दृढ करणारा, राधेच्या मधुराभक्तीत सुखावलेला राधेश्याम, कुंजविहारी, कृष्ण आपल्या मनःचक्षूंसमोर सदैव असतो.
त्याच्या बाललीलांची असंख्य चित्रे आपल्याला भारतीय साहित्यात सातत्याने दिसतात. गोपालनात अत्यंत निपुण असलेला हा वनमाळी पोहण्यातही कमालीचा तरबेज होता. त्याची प्रचिती कालियाच्या मर्दनप्रसंगी गोकुळवासीयांनी अनुभवली आहे. तो वाद्यकलेतही पारंगत होता. त्याच्या मुरलीच्या सुरावटीवर संपूर्ण आसमंत तल्लीन होत असल्याची वर्णने भारतीय काव्यात दिसतात. मुरलीधराच्या वेणुनादाने कधीकधी संपूर्ण गोवर्धन पर्वत गाजत असल्याची अनुभूती गोकुळवासीयांनी घेतलेली दिसते. संगीत आणि नृत्यकलेचा भोक्ता आणि पुरस्कर्ता असलेल्या कृष्णाने गोपींना रासक्रीडेची दिव्य अनुभूती दिली. तो विविध कलांचा भोक्ता असल्याचे स्पष्ट दिसते. गोपींबरोबर रासक्रीडा शृंगारात रमलेल्या गोपीजनवल्लभ कृष्णाने मानवी जीवनातील शृंगाराचा साक्षात्कार घडविला आणि जीवनाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण विशेष अधोरेखित केला. निःसंदिग्ध मनोधैर्याचा मेरुमणी असा हा कृष्ण. त्याच्या बुद्धिमत्तेला धीरगंभीरतेचे साजेसे कोंदण प्राप्त झाले होते. माणसामाणसांतील कलह दूर करून परस्परांशी सख्य घडवून आणणारा आणि त्याद्वारे स्थिर असा शांतताप्रिय समाज स्थापन करण्यासाठी अंतकाळापर्यंत कार्यप्रवण असलेला कृष्ण एक सच्छील समाजकारणी आणि राजकारणी म्हणावा लागेल. खरे तर तेच त्याने आपले जीवितकार्य मानलेले पावलोपावली दिसते. आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श मित्र, आदर्श पती ही सर्व कर्तव्ये कृष्णाने जाणीवपूर्वक निभावलेली दिसतात. पुढे वेळ येताच शासनकर्ता म्हणून नरकासुराच्या बंदिवासातील सोळा हजार कुमारिकांना बंधमुक्त करण्याबरोबरच त्यांच्याशी विवाह करून त्यांना प्रतिष्ठित गृहजीवन मिळवून देणारा असामान्य आणि सहृदयी वीरपुुरुष म्हणून त्याची भारतीयांच्या मनावर कायमस्वरूपी छाप आहे. कारण त्याने ईश्‍वरी सामर्थ्य न वापरता सदैव मानवी कृत्ये केली आहेत. भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाचा महान द्रष्टा असलेल्या कृष्णाने पांडवांचा मित्र, सल्लागार आणि मार्गदर्शक या नात्याने पराकोटीची मुत्सद्देगिरी दाखविली. त्यामागे कलहनिवारण आणि शांती-प्रस्थापना ही दोन उद्दिष्टे स्पष्ट दिसतात. महाभारतातील कुरुक्षेत्रावरील युद्धानंतर कृष्ण-बलरामाला यादवीला सामोरे जावे लागले. यादवकुळाच्या संहारानंतर विषण्ण झालेल्या बलरामाने आपल्या देहाचे समुद्रात विसर्जन केले. त्यानंतर एकाकी बनलेल्या श्रीकृष्णाला आपले भविष्य स्पष्ट दिसत होते. त्याने प्रभास प्रदेशातील वनात योगसमाधी लावली. त्यावेळी एका पारध्याचा बाण लागल्यानंतर कृष्णाने देहत्याग केला आणि आपली अवतार-समाप्ती केली. पुत्रवियोगाने विव्हळ झालेल्या वसुदेव, देवकी आणि रोहिणी यांनी देहत्याग केला. कृष्णाच्या अष्टनायिकांनी अग्निप्रवेश केला. गोकुळातील नगरजनांना द्वारकेकडे अर्जुन घेऊन चालला असता द्वारका समुद्रतळाशी गेली. अशा रीतीने भगवान कृष्णाचे युग समाप्त झाले.
कृष्णाच्या एकूणच आयुष्याची विविधरंगी छाप भारतीय साहित्यकारांवर दिसते. त्यातून एक गोष्ट आवर्जून दिसते, ती म्हणजे, बहुतेक तत्कालीन साहित्यकारांनी आपल्या रचनांमधून कृष्णाला परब्रह्मस्वरूप दिले. एवढ्यावर न थांबता त्यांनी माधुर्य, सख्य, वात्सल्य आणि शृंगार यांचा साज कृष्णचरित्रावर चढविला. म्हणूनच लोककवी आणि गायकांनी कृष्णाला मानवी रूपात भेटीला आलेला साक्षात परमेश्‍वर मानले. भागवतपुराणातील वर्णने भक्तिमय धर्तीवर असल्याचे अभ्यासक सांगतात. पुढे जयदेवाचे गीतगोविंद संपूर्ण भारतवर्षात लोकप्रिय झाले ते त्यातील गोपी-कृष्ण शृंगार आणि राधा-माधवाच्या मधुराभक्तीमुळे. गाथा सप्तशती, कृष्णलीलामृत यातून जसे कृष्णचरित्र दिसते, तसेच तामिळनाडूतील अळवार संताच्या रचनांमधूनही कृष्णचरित्राची विविध रूपे दिसतात. ५ वे ते ९ वे शतक या सुमारे पाचशे वर्षांच्या कालावधीत अळवार संतानी केलेल्या रचनांमध्ये शृंगाराऐवजी भक्ती ओतप्रोत दिसते. ध्वन्यालोक, कविंद्रवचनसमुच्चय, हरिलीला, यादवाभ्युदय, संत एकनाथांची कृष्णचरित्रविषयक जवळजवळ ३०० पदे ज्यांत गवळणींचा समावेश प्रामुख्याने आहे. सूरदासाचे कृष्णचरित्र, चैतन्य महाप्रभूंची काव्ये या काही काव्यरचनांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्याशिवाय बंगालमधील माधव आचार्य, कृष्णदास, चंडीदास यांची बंगालीतील कृष्णमंगलकाव्ये ही आजही लोकमानसात जपलेली दिसतात.
कृष्णभक्तीची ही छाप विसाव्या शतकातील आधुनिक साहित्यातदेखील तेवढ्याच तीव्रतेने दिसते. धर्मवीर भारतींचे ‘अंधायुग’ हे नाटक म्हणजे कृष्ण-जीवनाच्या इतिकर्तव्यतेचा नेमका संदेश देणारे नाटक आहे. त्यात रेखाटलेली कृष्णाची भूमिका पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येते. सर्वनाश झाल्याने विदीर्ण झालेली गांधारी जेव्हा तळतळाट करीत कृष्णाला त्याच्या कुलक्षयाचा शाप देते, त्यावेळी कृष्णाची अत्यंत धीरगंभीर परंतु शरण्य भूमिका त्याच्या जीवितकार्यातील शांतीस्थापनेचा तसेच मानवी आयुष्याच्या नश्‍वरतेचा संदेश देणारी ठरते. रामानंद सागरांची महाभारत मालिका म्हणजेदेखील विभूती ठरलेल्या कृष्णाच्या जीवनकर्तृत्वाचे भक्तिमय आणि चिंतनशील सादरीकरण. काही वर्षांमागे आपल्या गोव्यात निर्माण केलेल्या ‘संभवामि युगे युगे’ या महानाट्याचा संदेश म्हणजेदेखील कृष्णाच्या महान जीवनकर्तृत्वाचे अभिरूप होय.
बालकृष्णापासून मूलतः तत्त्वज्ञ आणि महापराक्रमी म्हणून भारतभर जनमानसात अढळ स्थान मिळविलेला कृष्ण हा भाविकांसाठी भगवान होय. कृष्ण म्हणजे भारतीय इतिहासातील दैवी विभूती. जगाच्या इतिहासात इतके विविधांगी, सर्वांगीण आणि समृद्ध चरित्र अन्य विभूतींत दिसत नाही. भारतीय लोकमानसात दिव्य स्थान प्राप्त झाल्याने कृष्ण म्हणजे जनसामान्यांसाठी एक अनभिषिक्त सम्राट आहे. सर्वार्थाने तो पूर्णावतार आहे.
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे!
कृष्णभक्तीच्या रासलीलेचे तीन प्रकार
रासलीला हा कृष्णाच्या गोपक्रीडेचा उत्तर भारतात प्रचलित असलेला नृत्यप्रकार. त्यातील काव्याची मूळ प्रेरणा ही भागवतातून घेतलेली. ब्रजभूमी ही कृष्णजन्मभूमी. त्या भूमीत सुरू झालेले हे नृत्य प्रांतपरत्वे भेद करून स्वीकारले गेले. रासलीलेचे तीन प्रकार प्रचलित आहेत. ब्रजभूमीतील रास नांदी, संगीत आणि लीला या तीन भागांत सादर करून, चक्राकार भ्रमरी हे नृत्य करून रास संपवितात. दुसरा प्रकार मणिपुरी रास. हा नृत्यप्रकार मणिपूरचे महाराजा भाग्यचंद्र जयसिंह यांनी अठराव्या शतकात सुरू केला. भागवतातील अनेक कथांची गीते गाऊन रासनृत्य सादर करतात. त्याला ‘महारास’ असेही म्हणतात. तिसरा प्रकार म्हणजे गुजराती रासनृत्य. हे नवरात्रात खेळतात. त्यात रास गरबा हा टाळ्या वाजवून फक्त स्त्रियाच खेळतात. रासगरबी हे नृत्य पुरुष खेळतात. आणि दांडियारासमध्ये टिपर्‍या वाजवून रास खेळला जातो. प्रत्येक प्रांतातील रासप्रकारात स्थानिक वाद्यांची व गीतांची साथ असते.
कृष्णाच्या अष्टनायिका
रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा या कृष्णाच्या अष्टनायिका. यातील बहुतेकजणी श्रीकृष्णाच्या पराक्रमावर तर काही त्याच्या सौंदर्यावर भाळलेल्या. म्हणूनच कृष्णाला भुवनसुंदर आणि रूपसुंदर अशी विशेषणे प्राप्त झाली.

Leave a Reply